पुणे : पानटपरीवर झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली. आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक) याला अटक करण्यात आली.
आर्यन साळवे हा मूळचा नाशिकमधील सटाण्यातील आहे. त्याचे मामा धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत. पंधरा दिवसांपूर्वी तो मामाकडे राहण्यासाठी आला होता. तो एका केशकर्तनालयात काम करत होता. शुक्रवारी (११ जुलै) रात्री तो साडेदहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपी धैयेशीर्ल मोरे पानपट्टीवर सिगारेट ओढत होता.
धैर्यशीलने आर्यनकडे पाहिले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले. आर्यनने कोयत्याचा वार हातावर झेलाल. त्याची बोटे तुटली. त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आला. या घटनेत आर्यन गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी दिली. पोलिसंनी धैर्यशीलला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहेत.