पुण्यातील हडपसर येथे शनिवारी एका २५ वर्षांच्या तरूणाने एकतर्फी प्रेमातून आत्मदहन केल्याची घटना घडली. आज सकाळी हडपसरच्या गाडीतळाजवळ धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कार चालक अजित आत्माराम इंगळेचा होरपळून मृत्यू झाला होता. सुरूवातीला हा अपघात गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचा सर्वांचा समज झाला. मात्र तपास सुरू असताना अजितने एकतर्फी प्रेमातून स्वत:ला गाडीत कोंडून आग लावून घेतल्याचे निष्पन्न झाले.
हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित याचे हडपसर येथील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र तिचा विवाह २० डिसेंबर २०१५ रोजी दुसऱ्या व्यक्तीसोबत झाला. मुलगी पाडव्यानिमित्त हडपसरला आई-वडिलांकडे आली होती. अजित त्या विवाहित महिलेला वांरवार फोन करून तू माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या दारासमोर येवून मी मरणार आहे, अशी धमकी देत होता. विवाहित महिलेला शुक्रवारी देखील अशाच प्रकारे त्याने फोन केला होता. मात्र मुलीने लग्नास नकार दिला. शेवटी एकतर्फी प्रेमातून आलेल्या वैफल्यातून त्याने सासवड रस्त्यावर ओमनी कारची दारे बंद करून गाडी पेटवून दिली. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकली. या घटनेत तो गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2016 रोजी प्रकाशित
पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाची कारमध्ये स्वत:ला पेटवून आत्महत्या
अजित याचे हडपसर येथील एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-04-2016 at 16:11 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth suicide himself by burning his car in pune