पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणाच्या आत्महत्येची घटना रोखली गेली. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी समाजमाध्यमात संदेश प्रसारित केला होता. त्याच्या मित्राने संदेश वाचला आणि त्वरित या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांच्या तत्परतेने घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
हेही वाचा >>> ३० लाख परत मागितले म्हणून चाकूने भोकसून हत्या; पुण्याच्या ताम्हिणी घाटात टाकला मृतदेह
भारतीय जनता पक्षाचे कसबा भागातील कार्यकर्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी रात्री समाजमाध्यमात संदेश पाहिला. त्यावेळी जवळचा एक मित्र आत्महत्या करण्याच्या तयारीत होता. त्याने समाजमाध्यमात संदेश पाठविलेला संदेश तुळजापूरकर यांनी पाहिला आणि त्वरित सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा >>> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष कोरडेच
दरम्यान, तुळजापूरकर यांनी एका मित्रामार्फत आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या मित्राशी संपर्क साधला. मात्र, मित्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तुळजापूरकर यांनी मित्राचा पत्ता दिला. त्यानंतर अलंकार पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. एरंडवणे भागात राहत असलेल्या मित्राच्या घरी अलंकार पोलीस पाेहाेचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहायक निरीक्षक करीश्मा शेख यांनी पोलिसांच्या पथकाला सूचना दिल्या. आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला पोलिसांनी रोखले आणि त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे अनुचित घटना टळली आणि तरुणाचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया तुळजापूरकर यांनी व्यक्त केली.
