शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी नितीन भुजबळ (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर बुधवारी सकाळी दोन व्यक्तींनी वडगाव शेरीत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात भुजबळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ बुधवारी सकाळी त्यांच्या मोटारीतून विठ्ठलांजन मंगल कार्यालयाच्या रस्त्याने निघाले होते. मोटारीच्या पुढे अचानक हल्लेखोरांनी एक दुचाकी आडवी घातली आणि त्यांनी चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी भुजबळ मोटारीतून खाली उतरले. त्यांनी दुचाकीचालकांकडे विचारणा केली. याचवेळी हल्लेखोरांनी कोयता काढून भुजबळ यांच्या डोक्यात वार केले. भुजबळ यांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्या हातावर, पायावर वार केले आणि मोटारसायकलवरून ते पळून गेले. त्यानंतर चालक आणि भुजबळ हे दोघे शास्त्रीनगर पोलीस चौकीत गेले. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर भुजबळ यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, भुजबळ यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेची पथकेही समांतर तपास करीत आहेत.
भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करा – डॉ. नीलम गोऱ्हे
वडगाव शेरी येथे नितीन भुजबळ यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. हल्लेखोरांना त्वरित अटक करण्यात यावे म्हणून त्यांनी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोऱ्हे यांना घटनेची त्वरित दखल घेण्याची सूचना दिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2014 रोजी प्रकाशित
युवा सेनेचे नितीन भुजबळ यांच्यावर वडगाव शेरीत प्राणघातक हल्ला
शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी नितीन भुजबळ (वय ३३, रा. वडगाव शेरी) यांच्यावर बुधवारी सकाळी दोन व्यक्तींनी वडगाव शेरीत कोयत्याने हल्ला केला.
First published on: 06-11-2014 at 03:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuva sena shiv sena nitin bhujbal attack