03 August 2020

News Flash

प्राचीन भारत : उत्कृष्ट संदर्भग्रंथ

लयस्थापत्याचासुद्धा अशाच प्रकारे धावता आढावा त्यांनी घेतला आहे.

डॉ.गो. बां. देगलुरकर हे एक सर्वमान्य अभ्यासक आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात मूर्ती व मंदिर स्थापत्याच्या अनुषंगाने मौलिक लेखन केले आहे. िबबब्रह्म आणि वास्तुब्रह्म, सूरसुंदरी, विष्णुमूर्ती, नमस्तुभ्यम्, शिवमूर्तये नम: यांसारख्या त्यांच्या ग्रंथांमुळे ते लोकप्रियसुद्धा आहेत. आता ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’ यांची ओळख करून देणारा त्यांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. आजपर्यंत या क्षेत्रात विविध मान्यवरांनी केलेल्या कामांचा आढावा घेणे व त्या आधारे नव्याने हा विषय स्पष्ट करणे ही त्यांच्या या ग्रंथलेखनामागची भूमिका आहे. सर्व अभ्यासक व स्पर्धापरीक्षेचे विद्यार्थी यांनी हाताशी ठेवावा असा हा ग्रंथ आहे. या पुस्तकात त्यांनी प्राचीन भारताची भौगोलिक पाश्र्वभूमी, गंगेचे खोरे, दख्खनचे पठार, समुद्रकिनारा व त्यालगतच्या परिसराची भौगोलिक वैशिष्टय़े व त्याचे इतिहासाच्या जडणघडणीत असलेले स्थान स्पष्ट करून भारतीय इतिहासाची भौतिक साधने यामध्ये उत्किर्ण शिलालेख, ताम्रपट, नाणे, वास्तू व शिल्पे याबरोबर लिखित साधनांत परकीय प्रवाशांची इतिवृत्ते यांचा परिचय करून दिला आहे.

आजपर्यंतच्या इतिहासविषयक पुस्तकात प्रामुख्याने ज्याचा फारसा उल्लेख नाही किंवा अगदी थोडक्यात उल्लेख आहे असा, प्रागैतिहासिक कालखंड सिंधू- सरस्वती संस्कृती, आर्य संस्कृती, ब्राह्मणके व उपनिषदिक काल यांचा विस्तृत आढावा त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. महाजनपदे व मगध साम्राज्य यानंतर येणारी परकीय आक्रमणे, त्याचा भारतीय संस्कृतीवर होत गेलेला परिणाम याची चर्चा करीत असताना राजकीय इतिहासाचे तपशील, मौर्य साम्राज्य, अशोकाचे धार्मिक धोरण यातील तपशील ते नोंदवतात. शृंग-सातवाहन कालखंडाचा आढावा घेऊन क्षत्रप आक्रमण, कनिष्क विजय व त्याचे साम्राज्य, बौद्ध धर्म परिषदा व या राजसत्तेने महायान पंथाच्या प्रसारासाठी लावलेला हातभार याविषयीची चर्चा त्यांनी केली आहे. आजपर्यंत गुप्त कालखंड असा उल्लेख करून चंद्रगुप्त, समुद्रगुप्त याच्या विषयीचे तपशील साधारणपणे आपणांस पाहायला मिळतात. इथे डॉ. देगलूरकर गुप्त वाकाटक काळ असा स्पष्ट उल्लेख करून वाकाटकांचे सांस्कृतिक योगदान जाणीवपूर्वक नोंदवतात. एकूणच लेखनामध्ये राजकीय इतिहासाबरोबर सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेणे हा हेतू दिसतो व तत्कालीन अभ्यासाच्या दृष्टीने ही बाब अधिक चांगली व आवश्यक त्या पद्धतीने मांडली आहे. स्वाभाविकपणे हूण आक्रमण, त्यांचा पराजय, हर्षवर्धन यांच्या काळातील ग्राम प्रशासन, तत्कालीन चिनी प्रवासी युआन श्वांग याने केलेले वर्णन मुळातून वाचावे असे आहे. बदामीचे चालुक्य, राष्ट्रकुट, कल्याणीचे चालुक्य, कलचुरी घराणे या राजवंशाबरोबर त्यांनी दक्षिण भारतातील पल्लव चोल राजवंश, सेन व प्रतिहार राजवंश या विषयीचे तपशील नोंदविलेले आहेत. या राजसत्तांचा अन्य राजसत्तांबरोबर झालेला संघर्ष आणि समन्वय यांचीही चर्चा ते करतात.

या पुस्तकाचे आणखी एक विशेष म्हणजे बृहत् भारतातील भारतीय संस्कृती, तिचा प्रचार, व्हिएतनाम, जावा, बालीद्वीप, कंबोडिया, थायलंड, सिलोन (श्रीलंका), ब्रह्मदेश(म्यानमार) येथील तत्कालीन राजवंश व या काळात निर्माण झालेल्या स्थापत्याची त्यांनी ओळख करून दिली आहे. यामुळे भारतीय संस्कृतीचा भारताबाहेर होणारा प्रचार जसा अशोकाच्या काळात बौद्ध धर्म प्रचाराच्या अनुषंगाने झाला तसाच उत्तर काळात िहदू धर्माचाही झालेला प्रभाव स्पष्ट होतो.

या ग्रंथाचे लक्षात घ्यावे असे वैशिष्टय़ म्हणजे ‘भारताच्या संस्कृतीची ठळक वैशिष्टय़’ या शीर्षकाखाली जवळपास शंभर पानांचा मजकूर आला आहे. खरेतर स्वतंत्र ग्रंथ म्हणूनसुद्धा त्यांना तो देता आला असता. या भागात तत्कालीन समाजरचनेची वैशिष्टय़े चातुर्वण्र्य पद्धती, स्त्रियांचे समाजातील स्थान याची चर्चा करताना ओझरते का होईना, स्मृतिग्रंथांचे संदर्भ दिले आहेत. प्राचीन भारतातील महत्त्वाची विद्यापीठे, तक्षशीला, वाराणसी, नालंदा यांविषयीचे तपशील, तेथील शिक्षणपद्धती, तेथे असलेले मान्यवर अध्यापक आणि उत्खननातून स्पष्ट झालेले अवशेष यांची चर्चा केली आहे. याचाच आनुषंगिक भाग म्हणून युआन-श्वांग या चिनी यात्रेकरूने केलेला प्रवास व त्याच्या नोंदीतून स्पष्ट होणारा तत्कालीन भारत, त्याचे थोडक्यात जीवन चरित्र यांचीही नोंद त्यांनी केली आहे. यासारख्या नोंदी सहजपणे या ग्रंथामुळे उपलब्ध होतात. या नोंदीच्या अनुषंगाने हर्षवर्धनाच्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थिती यांचीही माहिती मिळते. प्राचीन भारतीय स्थापत्य व कला यांचा विस्तृत आढावा त्यांनी आपल्या ग्रंथात घेतला आहे. तत्कालीन भारतामध्ये निर्माण झालेल्या

शिल्पस्थापत्याची स्वत:ची अशी वैशिष्टय़े होती आणि म्हणूनच मौर्य स्थापत्य, गुप्त स्थापत्य, चालुक्य किंवा नागर शैली यासारखी नावे रूढ झाली. ज्यांना ‘स्कूल’ असे मानले जाते, गांधारशैली किंवा शृंगशैली यांची ठळक वैशिष्टय़े व त्यातील फरक स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न उपयुक्त आहे. किंबहुना या क्षेत्रात स्टेला केंब्रिश, कुमारस्वामी, स्मिथ, वॉटरिस्पक या व अशा अनेक मान्यवरांनी केलेल्या कामाचा आढावा घेऊन सर्वसामान्यांसाठी आणि अभ्यासकांसाठी मराठीतून त्यांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न उल्लेखनीय आहे.

डॉ. देगलूरकरांना मंदिर स्थापत्याची विशेष ओढ असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांनी उत्तरेकडील नागर शैलीमध्ये भारतातील मंदिर शैलीत पडत गेलेला फरक, पश्चिम भारतीय मंदिरे यांच्यावर स्वतंत्रपणे व उदाहरण देऊन नोंद करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकार महाराष्ट्रातील मंदिरे, होयसळ व चालुक्य यांची मंदिरे या पद्धतीने पल्लव, चोल, पाण्डय़ अशा प्रत्येक शैलीची ओळख करून दिली आहे.

लयस्थापत्याचासुद्धा अशाच प्रकारे धावता आढावा त्यांनी घेतला आहे. अशोकाच्या काळात निर्माण झालेली लोमष-ऋषी या नावाने ओळखली जाणारी लेणी व त्यापूर्वीही बाराबर व नागार्जुन टेकडय़ांवरील याजिवक पंथीयांच्या उपयोगासाठी कोरलेली लेणी इथपासून बाराव्या शतकापर्यंत सष्टय़ाद्रीच्या प्रस्तरात विकसित झालेल्या लयस्थापत्याचा आढावा घेतला आहे. या विषयीची नोंद करताना ‘हिनयान काळातील सर्वोत्कृष्ट चत्यगृह पुण्याजवळील काल्रे येथे आहे’ असे सांगून त्याचे वस्तुनिष्ठ तपशील ते नोंदवतात. स्तुपाची उंची, त्याचे अधिष्ठान, चत्य गवाक्षाच्या वर असलेली मूळ लाकडी छत्री, गजपृष्ठाकृती छताच्या फासळ्या इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील असून त्या लाकडी आहेत याची ते जाणीवपूर्वक नोंद करतात. महायान चत्यगृहाची वैशिष्टय़े सांगताना अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांचे तपशील ते स्वाभाविकपणे नोंदवितात. तर ब्राह्मणी लेणी स्थापत्याचा आढावा घेताना इसवी सनाच्या आठव्या शतकात राष्ट्रकुटांच्या प्रथम कृष्ण राजाने वेरूळ येथे खोदलेल्या कैलास लेण्याविषयीचे तपशील त्यांनी दिले आहेत. जवळपास ६१ मीटर लांब व ४८ मीटर रुंदीचे कैलास मंदिर

खोदताना २० लक्ष घनमीटर दगड कोरून काढला यासारखे तपशील त्यांनी नोंदविले आहेत. मंदिराच्या प्रगत अवस्थेतील सर्व टप्पे वेरुळ येथे पाहता येतात. कैलासनाथ व पट्टदकल येथील विरुपाक्ष मंदिराच्या व त्याही आधी असलेल्या महाबलीपूरम् येथील पल्लवांनी कोरलेल्या मंदिर स्थापत्याची आठवण कैलास पाहताना होते हे ते सांगतात. पल्लव काळात महाबलीपूरम् येथे धर्म, भीम, अर्जुन, सहदेव व द्रौपदी यांच्या नावाने ओळखली जाणारी विविध तलविन्यास असलेली मंदिरे व त्यांना रथ ही असलेली संज्ञा यांचा परिचय देताना धर्मरथास लहान लहान होत जाणाऱ्या पायऱ्यांचे चौकोनी शिखर आहे तर सहदेवाच्या रथाला गजपृष्ठाकृती छत आहे. शिवाय चतन्यगृहाप्रमाणे त्याचा मागचा भाग अर्धगोल आहे. द्रौपदी रथाला एखाद्या झोपडीचे असावे तसे छत आहे. काही रथांचे छत पुढे लोकप्रिय ठरलेल्या गोपुरांसारखे आहे हे विशेष. या रथात प्रारंभी सोपान व मग गर्भगृह आहे. या रथांशिवाय काही मंडपही महाबलीपूरम् येथे कोरले आहेत. हे सर्वच मंडप जवळपास सारख्या आकाराचे आहे. महिषासुर मंड, कृष्ण मंडप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंडपात पल्लवकालीन शिल्प आढळते.

याचप्रकारे मंदिर स्थापत्याचा आढावा त्यांनी घेतला आहे व त्या त्या काळात विकसित झालेल्या मंदिरांची नोंद करताना गुप्तपूर्व काळात तेर (जिल्हा उस्मानाबाद), चेसर्ली (जिल्हा कृष्णा, आंध्र प्रदेश) येथील मंदिरांची नोंद त्यांनी केली आहे. मंदिराशिवाय शिल्पशैलीचाही त्यांनी आढावा घेतला आहे. उदाहरणार्थ शुंगकालीन शिल्पांची नोंद करताना त्यात वैशिष्टय़पूर्ण कथानके दिसतात, असे सांगून शुंग शिल्पे अत्यंत उठावदार आहेत, त्यांचे व भारहुत येथील मानवी प्रतिमांचे चेहरे सपाट आहेत यासारखी टिपणी ते करतात. शुंग शैलीमध्ये प्राण्यांचे व वृक्ष लतांचे असलेल्या प्राचुर्याचे आनंदकुमार स्वामी सारख्यांनी केलेले ‘प्लान्ट स्टाइल’ वर्णन पाहता कलादृष्टय़ा आणि तंत्रदृष्टय़ा शुंग शिल्पशैली पूर्णत: निर्दोष आहे असे म्हणता येत नाही असे नोंदवून त्यांनी या विषयीच्या मर्यादाही नोंदविलेल्या आहेत.

त्रिमितीचा आभास उत्पन्न करण्यात हा शिल्पकार असमर्थ ठरतो, मानवी आकृतीची रेखाटने, ताठर आणि सपाट वाटतात हे भारहुत शिल्पात आढळणारे वैगुण्य ते नोंदवितात. तर सांची येथील शिल्पात शरीर आकृतीची रेखा अधिक लयदार व जिवंत होते. ती समभंगातून त्रिभंगात जाण्याच्या प्रयत्नात दिसते यासारखी नोंद त्यांनी केलेली आहे. याच प्रकारे गांधार शैली व परिपूर्ण स्थितीत असलेली पुढील काळात पूर्णपणे भारतीय म्हणता येईल अशी मथुरा व गुप्त शैलीची वैशिष्टय़े त्यांनी नोंदविली आहेत. राष्ट्रकुट शिल्पशैलीची विशेषता वेरूळ येथील प्रत्येक ठिकाणी विजिगीषु वृत्ती दर्शविणारी आक्रमकता प्रतीकात्मतेने प्रत्ययास आणणारी व चेहऱ्यावरील स्मितहास्ये, विजयाच्या खात्रीविषयीचा आत्मविश्वास प्रकट करणारी शिल्पशैली या व अशा अनेक बाबींमुळे ‘प्राचीन भारत – इतिहास आणि संस्कृती’ हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. मात्र या ग्रंथास सूची नाही, तसेच संदर्भ सामग्री जेवढी वापरली आहे, त्या तुलनेत अतिशय निवडक ग्रंथांची सूची दिली आहे.
प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती, डॉ. गो. बां. देगलुरकर, अपरांत प्रकाशन, पुणे, पृष्ठसंख्या – ४४१, मूल्य – ५०० रुपये

मणी भौमिक या ‘एक्झायमर लेसर’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञामुळे डोळ्याचा चष्मा न वापरताही दृष्टिदोषावर मात करता आली. अशा या शास्त्रज्ञाने विज्ञानाच्या आधारे परमेश्वराचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर मानणाऱ्यांना तो विज्ञानापेक्षा श्रेष्ठ वाटत असतो आणि विज्ञानाची कास धरणारे परमेश्वर नाकारू पाहात असतात. एक शास्त्रज्ञ आपल्या अनुभवांच्या आणि वैचारिक प्रवासाच्या आधारे या दोन्हीची कशी सांगड घालू पाहतो ते या पुस्तकातून वाचायला मिळते. आणि विज्ञान या दोन परमेश्वर – एक सांकेतिक नाव- एका शास्त्रज्ञाची आध्यात्मिक शोधयात्रा.
मूळ लेखक- मणी भौमिक, अनुवाद- अशोक पाध्ये, मेहता पब्लिशिंग हाउस, मूल्य- २५० रुपये, पृष्ठे- २३४

पुराण या शब्दात काहीसा पाल्हाळीकपणा, रंजकपणा हा अर्थ आपल्याला अपेक्षित असतो. पूर्वी देवळांमध्ये वेगवेगळी पुराणे लावली जायची. कीर्तनकाराच्या रसाळ विवेचनामुळे ती ऐकणारे खिळून जायचे. पुराणाचा फॉर्म असा लक्ष वेधून असणारा असल्यामुळे लेखकाने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मांडण्यासाठी त्याचा वापर केला आहे. आणि या माध्यमातून मुंगी, कावळा, पाल, राजहंस, मांजर, कोल्हा, कुत्रा, गाढव, साप आणि माणूस या सगळ्यांविषयी रंजक पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
विज्ञान पुराण, प्रा. डॉ. शंभुनाथ कहाळेकर, मुक्तरंग प्रकाशन, मूल्य- १३५ रुपये, पृष्ठे- ११२
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:09 am

Web Title: book review 85
Next Stories
1 सूर्याला गवसणी
2 मध्ययुगीन काळाचे
3 मधुमेह मुठीत ठेवण्याचा मंत्र
Just Now!
X