19 November 2017

News Flash

कसे करायचे छोले भटुरे? | How to make Chole Bhature

सगळ्यांच्या आवडीचा, मसालेदार, चमचमीत पदार्थ

पुणे | Updated: December 31, 2016 1:15 AM

Chole Bhature : छोले भटुरे

“तुझ्या हातची चवच सॉलिड आहे. असं वाटतं, की तू आयुष्यभर स्वयंपाक करत राहावंस आणि मी ते गरमागरम खात राहावं!“ या कौतुकानं शैला भारावून गेली होती. शिरीष हा तिचा नवरा नाही, तर मित्रच होता. दोघांचा संसार अगदी सुखानं चालला होता. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिच्या स्वयंपाकाचं त्याला फार कौतुक. तिनं कुठलाही पदार्थ केला, तरी तो मुक्तकंठानं तिचं कौतुक करत असे. आईच्या हातच्या जेवणाची एवढ्या वर्षांची सवय असतानाही त्यानं तिच्या चवीचे सगळे पदार्थ अगदी मनापासून स्वीकारले होते. आईच्या सारखं तू करत नाहीस किंवा आईकडून शिकून घेऊन तिच्यासारखं कर, अशा प्रकारचे अन्यायकारक टोमणे त्यानं कधी मारले नव्हते. तिला खरंच आपल्या नवऱ्याचा अभिमान होता. आपल्या हातची चव घरातल्या सगळ्यांना आवडते, यापेक्षा तिच्या आयुष्यात दुसरं सुख काय असणार? त्या दिवशी मात्र वेगळंच काहीतरी घडणार होतं. आज सुटीनिमित्त सासरचे बरेच नातेवाईक घरी येणार होते. छोले भटूरे करायचा बेत होता. मात्र, स्वयंपाकघरात काहीतरी करत असताना अचानक तिच्या हातांना मुंग्या आल्यासारखं झालं. तिला हातांनी काहीच करता येईना. घरातली तयारी आणि सगळ्यांचा मूड वाया जाऊ नये म्हणून तिनं शिरीषलाच सगळा स्वयंपाक करण्यासाठी तयार केलं. शिरीषला नाइलाजानं हो म्हणावं लागलं. तिनं सांगितलेल्या प्रमाणात आणि सूचनेनुसार त्यानं सगळी प्रक्रिया केली आणि मस्त चमचमीत छोले भटूरे तयार झाले. तिनंही शक्य तेवढी मदत केलीच. सगळ्यांनी चापून खाल्लं आणि शैलाच्या हातच्या चवीची पुन्हा एकदा प्रशंसा केली. रात्री झोपताना ती म्हणाली, आज तुझ्यामुळे आपण वाचलो. त्या थकलेल्या अवस्थेतही त्याला बरं वाटलं. “आता कळलं ना, चव हाताला नसते, तर प्रमाणाला असते. योग्य प्रमाणात सगळे घटक घातले, मनापासून केलं, तर कुठलाही स्वयंपाक चांगलाच होतो. अमक्याच्या हातची चव वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत.“ तिच्या हाताला अचानक मुंग्या येण्याचं कारणही तेच होतं. पुढच्या वेळेपासून छोले भटूरे किंवा कुठलीही स्पेशल डिश असेल, तर स्वयंपाक त्यानंच तिच्या मार्गदर्शनाखाली करायचा, हेही तिनं सांगून टाकलं आणि त्याची झोप खाडकन उडाली!

साहित्य


 • पाव किलो काबुली चणे
 • २ ते ३ कांदे, (किसून)
 • ४ ते ५ टोमॅटो
 • चवीपुरता चिंचेचा रस
 • दोन तमालपत्र
 • तीन टेबल स्पून तेल
 • एक टेबल स्पून जिरे
 • दोन चमचे पादेलोण (काळं मीठ)
 • दोन चमचे तिखट
 • अर्धा चमचा गरम मसाला
 • १ टिस्पून आले पेस्ट
 • ३ लसूण पाकळ्यांची पेस्ट
 • १ टिस्पून आमचूर पावडर
 • १ टिस्पून धणेपूड
 • पाव चमचा हळद
 • अर्धा चमचा कसूरी मेथी
 • कोथिंबीर
 • एक चमचा आले-लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • भटूरे
 • मैदा ४ वाट्या
 • रवा अर्धी वाटी
 • दही अर्धी वाटी
 • मीठ चवीनुसार
 • साखर एक छोटा चमचा
 • बेकिंग सोडा पाऊण चमचा
 • तळण्यासाठी तेल

पाककृती


 • आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत.  दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये चणे नरम शिजवून घ्यावेत.
 • जिरे, काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी.
 • तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा.   आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे.
 • बारीक चिरलेला टोमॅटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे.  कांदा-टोमॅटो एकजीव झाला पाहिजे.
 • त्यात हळद, तिखट, थोडे मीठ, जिरे व काळे मीठ, धनेपूड टाकून परतून घ्यावे. नंतर शिजवलेले चणे टाकावे.
 • चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे.  कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .
 • भटुरा
 • एका भांड्यात मैदा आणि रवा चाळून घ्यावा.
 • मैद्यात 2 चमचे तेल, मीठ, बेकिंग सोडा, दही आणि साखर घाला.
 • कोमट पाणी घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे.
 • भिजवलेले पीठ 2 तास उबदार जागी झाकून ठेवा.
 • दोन तासांनी कढईत तेल गरम करून घ्या.
 • लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या करून गरम तेलात तळून घ्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ४५ मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

एकूण वेळ : एक तास १५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : जेवण

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on December 31, 2016 1:15 am

Web Title: how to make chole bhature maharashtrian recipes