19 November 2017

News Flash

कशी करायची मेथी – मटार मलाई? | How to make Methi Matar Malai

मेथी-मटारचा वेगळा, चमचमीत पदार्थ

पुणे | Updated: January 21, 2017 3:42 AM

Methi Matar Malai : मेथी मटार मलाई

मेथी आणि मटार यांच्यात श्रेष्ठ कोण, अशी चढाओढ लागली होती. मटारचं म्हणणं होतं, त्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे. परदेशातही त्याची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व मिळालं पाहिजे. मेथीचा मुद्दा वेगळा होता. तिच्या मते मटार आत्तापर्यंत कधी स्वबळावर लढला नव्हता. त्याला सतत कुणा ना कुणाची साथ लागतच होती. या दोन्ही भाज्यांनी अशा प्रकारे समोरासमोर येऊन एकमेकांशी वाद घालण्याची ही पहिलीच वेळ होती. `तुझ्यात माझ्यासारखे काही औषधी गुणधर्म नाहीयेत, शरीराला तुझा काही उपयोग नाही, फक्त जिभेचे चोचले!` असं म्हणून मेथीनं मटारला डिवचलं. आपल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तिचं तिलाही माहिती नव्हतं. मटारही गप्प बसला नाही. `तुझं बोलणं, वागणं आणि तुझी चव, सगळंच कडू आहे. तुला नुसतं खाण्याचा कुणी विचारही करू शकत नाही!` असं म्हणून मटारनं मेथीची परतफेड केली. दोघांचे मुद्दे वाढत गेले, तसं चर्चेचं रूपांतर वादात, वादाचं वादविवादात आणि वादविवादाचं रूपांतर भांडणात झालं. फरक एवढाच होता, की एकमेकांच्या पूर्वजांचा उद्धार करण्याऐवजी त्यांनी एकमेकांच्या पूर्व इतिहासाचा उद्धार केला. मग तू कुठला, मी कुठली वगैरे झालं. एकमेकांची किंमत, घरात त्यांना असलेली किंमत, याच्यावरून लठ्ठालठ्ठी झाली. `मला तुझी गरज नाहीये, पुन्हा कधी तुझं तोंड दाखवू नकोस,` इथपर्यंत मजल गेली. आपल्याला एकमेकांशिवाय राहता येत नाही, हे खरं नसलं, तरी आपण एकत्र आल्यानंतर वेगळ्या चवीचं काहीतरी करून दाखवू शकतो, याच्यावर दोघांचं एकमत झालं आणि त्यांनी युती जाहीर केली.

साहित्य


 • १ वाटी हिरवे मटार
 • १ मेथीची जुडी
 • ४ हिरवी मिरच्या
 • एक टोमॅटो
 • २ चमचे साखर
 • २ चमचे क्रीम
 • १ कप दूध
 • थोडी हळद
 • थोडा गरम मसाला
 • १२ ते १५ काजू
 • १०० ग्रॅम खवा
 • पाव वाटी खरबूज बी
 • ४ चमचे तेल
 • ४ लवंग
 • ४ छोटे वेलदोडे
 • ४ काळे मिरे
 • २ तमालपत्र
 • २ चमचे आले लसणाची पेस्ट

पाककृती


 • काजू आणि खरबूज बी एक तास गरम पाण्यात भिजवावे. नंतर मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक पेस्ट करावी.
 • मटार उकडून घ्यावेत. मेथी साफ करून निवडून त्याला मीठ लावून १० मिनिटे ठेवावे. १० मिनिटांनी सुटलेले पाणी काढून टाकावे.
 • कढईत तेल टाकून लवंग, वेलदोडे, तमालपत्र, काळीमिरी आणि आले-लसणाची पेस्ट टाकून परतावे. यात १०० ग्रॅम खवा टाकून व्यवस्थित मिक्स करावे.
 • एक ग्लास पाणी, काजू-खरबूज पेस्ट आणि एक कप दूध घालावे.
 • १०-१५ मिनिटे सतत हलवत शिजवावे म्हणजे मिश्रण फाटणार नाही.
 • चांगले उकळ्ल्यावर चवीनुसार त्यात मीठ टाकावे. मंद आचेवर अर्धा तास शिजवावे. काजू ग्रेवी तयार होईल.
 • पुन्हा कढईत तेल गरम करून त्यात जिरं, हळद, टोमॅटो पेस्ट, थोडा गरम मसाला, मटार, मेथी घालून हलवावे.
 • या मिश्रणात काजू ग्रेव्ही घालून ५-१० मिनिटे शिजवावे.
 • दोन चमचे क्रीम घालावे. लज्जतदार, चमचमीत मेथी-मटार मलाई तयार!

पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

एकूण वेळ : ५० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : जेवणातील पदार्थ

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

First Published on January 21, 2017 1:15 am

Web Title: how to make methi matar malai maharashtrian recipes