News Flash

कसा बनवायचा मुगाच्या डाळीचा हलवा? | How to make Moong Halwa

बनवायला सोपा, जरा वेगळा गोडाचा पदार्थ

Moong Halwa : मूगडाळ हलवा

[content_full]

नक्की काय निमित्त घडलं कुणास ठाऊक, पण एके दिवशी वेलची, बेदाणे, बदामांचं दुधाशी कडाक्याचं भांडण झालं. तशी या सगळ्यांची अनेक वर्षांपासूनची गट्टी. कुठलाही गोड पदार्थ करायचा म्हटला, की सगळे एकत्रच यायचे. आपण एकत्र असलो की, कुठल्याही पदार्थाला जास्त रंगत येते, याची त्यांना कल्पना होती. म्हणूनच सगळे गुण्यागोविंदानं एकत्र नांदत होते. त्या दिवशी मात्र मोठे इगो प्रॉब्लेम झाले होते. दुधाला कदाचित थोडा अहंकार चढला होता. गोडाचे पदार्थ माझ्याशिवाय बनूच शकत नाहीत, असा त्याचा दावा होता. श्रीखंड, बासुंदी, खीर, रसमलाई, गुलाबजाम, तुम्ही काहीही घ्या. माझ्याशिवाय तुमचं पान हलू शकत नाही, असं दुधानं म्हटल्यामुळे वेलची, बदाम, बेदाणे खवळले होते. `उरलो फक्त सजावट आणि सुवासापुरते` अशी त्यांची अवस्था झाली होती. दुधाच्या या मनमानीबद्दल त्यांनी गायीम्हशीकडेही तक्रार करून पाहिली, पण त्यांनी शेपटी उडवून त्यांना एका मिनिटात झटकून लावलं. यापुढे कुठल्याही गोड पदार्थाची रंगत वाढवण्यासाठी दुधाच्या अजिबात हातापाया पडायचं नाही, असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. साखरेनं मध्यस्थी करून पाहिली, कारण तीसुद्धा पहिल्यापासून या दोस्त मंडळींबरोबर कुठल्याही मोहिमेवर असायचीच. पण यावेळी तिचीही मात्रा चालली नाही. दुधाला धडा शिकवण्यासाठी काय करावं, असा विचार सुरू असताना साखरेनंच तोडगा सुचवला. मुगाच्या डाळीचा हलवा करण्याचा. `मुगाच्या डाळीचा हलवा?` वेलची, बदाम आणि बेदाणे एकाचवेळी ओरडले. `हो, मी शिकवते तुम्हाला!` साखरेनं तोऱ्यात सांगितलं. लगोलग मुगाच्या डाळीच्या हलव्याची कृतीही सांगून टाकली. हलवा तयार झाला आणि त्यावरची सजावट करायला वेलची, बेदाणे, बदाम ही मंडळी सज्ज झाली, तेव्हाच त्यांना लक्षात आलं, की साखरेनं आपल्याला गंडवलंय. वरून दिसत नसलं, तरी मुगाच्या डाळीशी दुधाची आधीच मांडवली झाली आहे!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


 • दोन वाट्या मूगाची डाळ
 • दोन वाट्या साखर
 • चार वाट्या दूध
 • दीड वाटी साजूक तूप
 • छोटा चमचा वेलदोडे पावडर
 • बदामाचे काप, बेदाणे
 • केशर अथवा केशरी रंग

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


 • मूगाची डाळ चार ते पाच तास पाण्यात भिजत घाला.
 • डाळ भिजल्यावर चाळणीत उपसून निथळत ठेवा. डाळीतील पाणी पूर्ण निघून गेल्यावर  डाळ बारीक वाटून घ्या.
 • जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यावर वाटलेली मूगाची डाळ घाला आणि मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजा. भाजत आली की तूप सुटू लागते.
 • दुसरीकडे एका पातेल्यात  दूध उकळून घ्या आणि खमंग भाजलेल्या डाळीत घालून मंद आचेवर वाफ येऊ द्या. डाळ चांगली शिजू द्या.
 • आळत आले की साखर घालून चांगले परता. तूप सुटायला लागले की त्यात वेलची पूड, बेदाणे, बदामाचे काप घालून उतरवा आणि मनसोक्त आस्वाद घ्या.

[/one_third]

[/row]

पाककृतीसाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे

एकूण वेळ : ४५ मिनिटे

पदार्थाचा प्रकार : गोड पदार्थ

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2016 10:13 am

Web Title: how to make moong halwa maharashtrian recipes
Next Stories
1 कसे बनवायचे मक्याचे कटलेटस?
2 कशी बनवायची कोफ्ता करी? | How to make Kofta Curry
3 कसं बनवायचं रगडा पॅटीस? | How to make Ragda Patties
Just Now!
X