News Flash

कशा बनवायच्या सुरळीच्या वड्या? | How to make Suralichya Vadya

बेसनाचा चटपटीत आणि लज्जतदार पदार्थ

Suralichya Vadya : सुरळीच्या वड्या

तरीही विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा स्मशानाच्या दिशेने चालू लागला. वठलेल्या वृक्षापाशी जाऊन त्याने भयानक दिसणारे ते कलेवर खांद्यावर घेतले आणि काहीही न बोलता तो चालू लागला. त्या प्रेतामधला वेताळ जागा होऊन त्याला म्हणाला, “राजा, काहीही झालं तरी तू हार मानणार नाहीस. पण मीसुद्धा एवढ्या सहजासहजी तुझ्याबरोबर येईन, असं तुला वाटतंय का?“ विक्रमादित्याने काहीच उत्तर दिले नाही. चल, तुला एक गोष्ट सांगतो, असं म्हणून वेताळाने गोष्ट सांगायला सुरुवात केली, “तुझ्यासारखाच एक दानशूर, पराक्रमी राजा होता. तो दाराशी आलेल्या याचकाला कधीच निराश करून पाठवायचा नाही. एकदा त्याच्या दरबारात एक बैरागी आला. तो अनेक दिवसांचा भुकेला होता. राजाने त्याला त्याची इच्छा विचारली. तो म्हणाला, त्याला बेसनाचा एखादा चमचमीत पदार्थ खायचा आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, तुमच्यासाठी पिठलं करून देण्याची व्यवस्था करतो. बैरागी म्हणाला, पिठलं नको, भजी नको. मला बेसन शिजवून केलेला असा पदार्थ हवाय, जो चटपटीत आणि खमंग असेल आणि कधीही, कुठल्याही वेळी खाता येईल. राजाला पेच पडला. त्यानं सगळ्या दरबारींना कामाला लावलं, की असा पदार्थ शोधून काढा, पण कुणालाच ते जमलं नाही. शेवटी राज्यातल्या एका गरीब बाईनं तो पदार्थ त्याला सांगितला आणि बैराग्याची भूक भागली. राजा, सांग बरं, असा कुठला पदार्थ त्या गरीब बाईनं सांगितला असेल? तुला उत्तर माहीत असतानाही तू ते दिलं नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन तुझ्याच पायाशी लोळण घेतील. राजाचा नाइलाज झाला. त्याला पदार्थ माहीत होता, कारण कालच त्यानं तो खाल्ला होता. तो म्हणाला, `सुरळीच्या वड्या.` राजाच्या या उत्तरावर वेताळ खूश झाला, पण त्याचवेळी त्याच्या खांद्यावरून उडून पुन्हा स्मशानाच्या दिशेने वेगाने निघून गेला.

साहित्य


 • १ वाटी बेसन
 • १ वाटी आंबट ताक
 • १ वाटी पाणी
 • पाउण चमचा मिरचीचा ठेचा
 • १ लहान चमचा हळद
 • १/२ लहान चमचा हिंग
 • फोडणीसाठी : २-३ चमचे तेल, मोहोरी, चिमूटभर हिंग, थोडीशी हळद, खोवलेले खोबरे
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ

पाककृती


 • बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. त्यात मिरचीचा ठेचा, हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे.
 • कढईत सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत न थांबता ढवळत राहावे. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
 • मिश्रण दाटसर झाले की गॅस बंद करावा.
 • गरम असतांनाच मिश्रणाचा पातळ थर स्टीलच्या ताटांच्या मागच्या बाजूला पसरावा
 • गार होईपर्यंत दुसऱ्या कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ही फोडणी पातळ थरावर चमच्याने पसरावी.
 • त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर सुरीने साधारण ५ इंचाच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी/गुंडाळी करावी आणि मग त्या सुरळीचे ३-४ भाग करावेत.
 • सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून सजवावे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे

एकूण वेळ : ३० मिनिटे

पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स

किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

लेखक : अभिजित पेंढारकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:15 am

Web Title: how to make suralichya vadya maharashtrian recipe
Next Stories
1 कसा बनवायचा खजूर केक? | How to make Khajoor Cake
2 कसा बनवायचा मसाला पराठा? | How to make Masala Paratha
3 कसे बनवायचे पायनॅपल रायता? | How to make Pineapple Raita
Just Now!
X