Rava kurdai recipe: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, या दिवसांत वर्षभरासाठी लागणारे पदार्थ बनवले जातात. पापड, लोणची, मसाले, कुरडया असे अनेक पदार्थ महिला आवडीने बनवतात. आज आम्ही तुम्हाला खास रव्याच्या कुरडया कशी बनवायच्या ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ रेसिपी…

रव्याच्या कुरडया बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ किलो रवा
  • कुरडईचा साचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

रव्याच्या करडया बनविण्याची कृती :

  • सर्वांत आधी रवा किमान दोन वेळा पाण्यातून धुऊन घ्या.
  • रवा धुतल्यानंतर त्यात दोन पट पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवा. परंतु, भिजत ठेवताना त्यातील पाणी न चुकता दररोज बदलत राहा.
  • तीन दिवसांनंतर त्यातील जास्तीचे पाणी काढून टाका. हे पाणी काढल्यानंतर जेवढा रवा आहे, तेवढे पाणी एका कढईत गरम करण्यासाठी ठेवा.
  • पाणी गरम झाल्यावर त्यात मीठ टाकून, त्यात तीन दिवस भिजवलेला रवा घालून चमच्याने मिश्रण ढवळत राहा.
  • त्यानंतर त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा.
  • १५ मिनिटांनंतर चिक शिजला की नाही हे तपासून घ्या.
  • चिक शिजला असेल, तर त्याची कुरडई पाडण्यासाठी एका स्वच्छ प्लास्टिकवर तेल लावून घ्या.
  • तयार मिश्रण कुरडईच्या साच्यात भरून, प्लास्टिकवर कुरडई पाडून घ्या.
  • कुरडई पाडून झाल्यावर त्या कडक उन्हात वाळवण्यासाठी ठेवा.
  • तीन-चार तासांनी त्या दुसऱ्या बाजूने सुकण्यासाठी उलट्या करा.
  • पुढील दोन ते तीन दिवसांसाठी कुरडई उन्हात सुकवून घ्या आणि डब्यात भरून ठेवा.
  • अशा पद्धतीने रव्याच्या कुरडया तयार झाल्या आहेत.