How to make Chakali Bhajni at home : दिवाळीचा फराळ करण्याची वेळ झाली आहे. दिवाळसणाला खमंग, खुसखुशीत चकलीची आठवण सगळ्यांनाच येते. चकलीची भाजणी आणि कधीही बिघडणार नाही, अशी चकली करायची असेल तर ही कृती नक्की फॉलो करा. चुकीचं प्रमाण किंवा नीट न भाजलेलं पीठ चकलीची चव आणि पोत दोन्ही बिघडवू शकतं. भाजणीची चकली परफेक्ट होण्यासाठी तांदूळ, डाळी आणि मसाल्यांचे नेमके प्रमाण किती असावे? कोणते जिन्नस कसे भाजून घ्यावेत जेणेकरून पिठाचा सुगंध आणि पोषणमूल्ये टिकून राहतील यासाठी काही खास टिप्स पाहूयात. उत्तम चकली भाजणी तयार करण्याचे पारंपरिक आणि अचूक प्रमाण आणि त्यामागील योग्य पद्धत समजून घेतली, आणि हे ‘परफेक्ट’ गणित एकदा जमले की, चकली कधीही बिघडणार किंवा फसणार नाहीच! चकलीची भाजणी तयार करण्याचे योग्य प्रमाण, लागणारे साहित्य आणि परफेक्ट भाजणी तयार करण्याची सोपी पद्धत, ज्यामुळे तुमची चकली होईल अगदी विकत सारखी कुरकुरीत आणि स्वादिष्ट.
साहित्य – (१ किलोची भाजणी बनवण्यासाठीचे प्रमाण)
- तांदूळ – ६०० ग्रॅम
- चण्याची डाळ – २०० ग्रॅम
- पिवळी मूग डाळ – १२५ ग्रॅम
- पांढरी उडदाची डाळ – ७५ ग्रॅम
- पोहे – १०० ग्रॅम
- साबुदाणा – ५० ग्रॅम
- जिरे – २० ग्रॅम
- धणे – २० ग्रॅम
कृती –
१. भाजणी करण्याआधी तांदूळ, पिवळी मूग डाळ, पांढरी उडदाची डाळ हे तिन्ही वेगवेगळे पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत. धुवून घेतल्यानंतर ते एका स्वच्छ सुती कापडावर वाळत घालावेत. (आपण हे २ ते ३ तास फॅनखाली किंवा संपूर्ण रात्रभर व्यवस्थित वाळवून घेऊ शकतो.)
२. आता एका कढईत हे तांदूळ, पिवळी मूग डाळ, पांढरी उडदाची डाळ तिन्ही जिन्नस वेगवेगळे कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर चण्याची डाळ, पोहे, साबुदाणा देखील भाजून घ्यावा.
३. हे सगळे जिन्नस कोरडे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर गॅस बंद करुन कढई गरम असतानाच धणे व जिरे एकदम एकाचवेळी भाजून घ्यावेत.
४. आता हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावेत. त्यानंतर ही भाजणी थोडीशी थंड होऊ द्यावी. भाजणी थंड झाल्यानंतर ही भाजणी गिरणीतून दळून आणावी.