How to make crispy imarti: भारतीय मिठाईंची ओळखच वेगळी आहे. लग्नसमारंभ असो, सणवार असो किंवा एखाद्या खास प्रसंगी घरात गोड पदार्थाची मागणी नेहमीच असते. भारतातील प्रत्येक राज्याला, प्रत्येक गावाला आपापल्या खास मिठाईंचा वारसा आहे. महाराष्ट्रात श्रीखंड- पुरणपोळी, बंगालमध्ये रसगुल्ला, उत्तर प्रदेशात जिलेबी तर दक्षिणेत मैसूर पाक अशी गोड पदार्थांची परंपरा आहे. याच गोड परंपरेत एक खास नाव आहे इमरती.

इमरतीचा उल्लेख झाला की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण तिच्या लच्छेदार आकारामध्ये, कुरकुरीत पोतामध्ये आणि गोडसर चवीमध्ये अशी काही जादू आहे की कोणालाही मोह पडल्याशिवाय राहत नाही. जिलेबी प्रमाणेच दिसणारी पण जरा जाडसर, गुलाबीसारखी लालसर-नारिंगी रंगाची ही इमरती खायला जितकी स्वादिष्ट असते, तितकीच बनवताना थोडी कौशल्याचीही गरज असते. साधारणपणे ही मिठाई हलवायांच्या दुकानात मिळते. पण, अनेक जणांना आपल्या घरी हलवाईसारखी इमरती बनवण्याची इच्छा असते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने हलवाईसारखी इमरती कशी तयार करायची. फक्त योग्य साहित्य आणि थोडीशी टीप्स लक्षात घेतल्या तर ही चविष्ट मिठाई तुम्ही घरच्या स्वयंपाकघरातही बनवू शकता.

इमरतीसाठी लागणारे साहित्य

तूप – तळण्यासाठी

उडीद डाळ – अर्धा कप (३-४ तास भिजवलेली)

मक्केचे पीठ – २ मोठे चमचे

साखर – दीड कप

केशर – चिमूटभर

हिरवी वेलची – ३-४ दाणे (ठेचलेले)

खाद्य रंग (ऑरेंज/पिवळा) १-२ थेंब

इमरती बनवण्याची कृती

१. डाळ भिजवणे व पीठ तयार करणे

सर्वप्रथम उडीद डाळ स्वच्छ धुवून ३-४ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजल्यानंतर ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना पाणी कमी वापरा म्हणजे मिश्रण घट्टसर होईल. या मिश्रणात मक्केचे पीठ आणि दोन थेंब खाद्य रंग घाला. नीट फेटून घ्या. पीठ खूप घट्ट किंवा खूप पातळ नसावे, मध्यमसर घट्टपणा असला पाहिजे.

२.साखरेचा पाक बनवा

एका भांड्यात दीड कप साखर व अडीच कप पाणी घालून उकळी आणा. त्यात ठेचलेली वेलची व केशर टाका. साधारण १० मिनिटांत दोन तारा होईल असा पाक तयार करा. झाल्यावर गॅस बंद करा.

३.इमरती तळणे

कढईत तूप गरम करून घ्या. तयार केलेले डाळीचे मिश्रण पेस्ट्री बॅग किंवा प्लास्टिकच्या पिशवीत भरून घ्या. आता गरम तेलात गोल गोल फेऱ्या मारत आतमध्ये पाकळ्यांसारखा आकार द्या. हलक्या हाताने फुलासारखे डिझाईन तयार होईल. इमरतींना मंद आचेवर सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या.

४.पाकात भिजवणे

गरमागरम इमरती तयार झाल्यावर लगेचच त्या गरम पाकामध्ये २-३ मिनिटांसाठी टाका. चांगली गोडी शोषून घेतल्यावर बाहेर काढा आणि गोड गोड इमरतीचा आस्वाद घ्या.