[content_full]

आजोबा आणि राजू आज भल्या पहाटे मटार सोलायला बसले होते. रविवारच्या सुटीनिमित्त आईनं काहीतरी खास बेत करायचं ठरवलं होतं. राजूच्या बाबांना भल्या पहाटे उठवून, मंडईत पिटाळून तिनं भाज्या आणि मुख्य म्हणजे मटार आणायला लावले होते. सकाळी उठून भाज्या आणायला जायचा त्यांना कंटाळाच आला होता, पण नंतर मटार सोलायला बसवणार नाही, या बोलीवर त्यांनी मंडईत जाण्याचा पर्याय मनाविरुद्ध का होईना, स्वीकारला. मटार घेऊन आल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे पुढच्या सगळ्या सोपस्कारांमधून निवृत्ती स्वीकारली आणि आजोबांनी ती जबाबदारी आनंदानं स्वीकारली. आजीला कौतुक वाटलं. `माझ्या घाईच्या वेळी अशी कधी मदत करत नाहीत मला! सूनबाईनं काम सांगितल्यावर लगेच मदतीला तयार!` अशी एक भावना आजीच्या मनात आणि ओठांतही येऊन गेली, पण ते जाहीरपणे बोलून दाखवायचं आजीनं मोठ्या प्रयत्नांती टाळलं. आजोबांनी राजूलाही आग्रहानं मटार सोलायला बसवलं होतं. आजीला बाहेर सोसायटीतल्या महिला मंडळाच्या एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचं होतं, पण तरीही त्यांनी थोडाफार हातभार लावायची तयारी दाखवली. आजोबांनी मात्र आजीलाही मटारांपाशी फिरकू दिलं नाही. आज आजोबा स्वतःहून एवढ्या कामाची तयारी का दाखवत आहेत आणि राजूचंही त्यांच्याशी एकदम जास्तच कसं पटतंय, याचं उत्तर घरातल्या सगळ्यांनाच खूप उशिरा मिळालं. उशिरा म्हणजे, बाबांनी आणलेला दोन किलो मटार सोलून झाल्यानंतर जेमतेम अर्धा किलो उरला, तेव्हा. शेंगा जास्त वजनाच्या होत्या, दाणे कमी होते, हे कारण काही आईला, आजीला पटण्यासारखं नव्हतं, त्यामुळे आजोबांनी आणि राजूला मटार मटकावल्याचं पाप कबूल करावं लागलं. त्याची दोघांना शिक्षाही मिळाली. आईनं उरलेल्या मटारचेच ग्रीन पीज पॅटिस केले, पण त्यातला आजोबा आणि राजूचा वाटा मात्र कमी झाला.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • ५-६  उकडलेले बटाटे
  • दोन वाट्या ताजा कोवळा मटार
  • एक वाटी किसलेले चीज
  • एक वाटी नारळाचे खोवलेले खोबरे
  • एक वाटी कोथिंबीर
  • एक टेबलस्पून आले-मिरची पेस्ट
  • दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • एक टेबलस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ आणि साखर
  • फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग व हळद.

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी व जिरे टाकून दोन्ही चांगले तडतडल्यावर त्यात मटार घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
  • मग त्यात खोवलेले ओले खोबरे, मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट व लिंबाचा रस घालून पुन्हा परतून घेणे
  • मटार जास्त कडक होऊ देऊ नका. त्यात किसलेले चीज घालून पुन्हा थोडेसे परता. गॅस बंद करा.
  • उकडलेल्या बटाट्यात मीठ व कॉर्नफ्लोअर घालून मळून गोळा तयार करा.
  • त्यात मटार व चीजचे सारण भरा. पारीचे तोंड बंद करून त्याला गोल चपटा आकार देऊन गरम तेलात तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]