Moong Dal Ladoo Recipe: मधुमेह असलेल्या रुग्णांना त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक असतं. शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणं आणि आरोग्य टिकवणं यासाठी त्यांना योग्य आहाराचं सेवन करणं खूप महत्त्वाचं ठरतं. मात्र, अनेक वेळा मदुमेहींना गोड खाण्याची इच्छा होऊ लागते; परंतु साखरेमुळे ते सहजपणे गोड खाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मन शांत ठेवणं आणि आहारात शरीरासाठी लाभदायक पदार्थांचा समावेश करणं फार आवश्यक ठरतं. सद्य:स्थितीत अनेक प्रयोगांमुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही काही स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ तयार केले गेले आहेत. त्यापैकी एक खास पदार्थ म्हणजे मूग डाळीचे लाडू. हा लाडू नुसताच चविष्ट नसून, डायबेटीस रुग्णांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायीही आहे.

मूग डाळ लाडूसाठी लागणारे साहित्य:

१ कप मूग डाळ

१ कप मेथी दाणे

१ छोटी वाटी गूळ

गरजेपुरते तूप

१ कप सुका मेवा

१ चमचा वेलची पूड

१ चुटकी केशर

मूग डाळीचे लाडू कसे बनवायचे?

मूग डाळीचे लाडू तयार करण्यासाठी आधीच एक रात्र मूग डाळ आणि मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर मूग डाळ आणि मेथी दाणे स्वतंत्रपणे मिक्सरमध्ये पिठाप्रमाणे बारीक करून घेणे. नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करून, त्यात दळून घेतलेले हे दोन्ही जिन्नस भाजावेत.

त्यानंतर गूळ गरम करून, त्यात भाजलेली डाळ, मेथी दाणे, सुका मेवा, वेलची पूड व केशर मिसळून घ्यावे. हे मिश्रण नीट मिक्स करून गॅसवरून उतरवावं आणि थोडं थंड होऊ द्यावं. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लहान लहान लाडू तयार करता येतात. हे लाडू तुम्ही हव्या त्या वेळेस खाऊ शकता आणि हव्या त्या बंद डब्यात साठवून ठेवू शकता.

आरोग्यासाठी फायदे

मूग डाळ प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असल्याने त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच, मेथी दाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे पदार्थ पचनास मदत करतात, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात आणि शरीरातील चरबी कमी करण्यातही साह्य करतात. त्यामुळे मूग डाळीची लाडू फक्त गोडाची तळमळ शांत करीत नाहीत, तर वजन कमी करण्यासही मदत करतात.

मधुमेहींनी आहारात कोणत्याही नवीन पदार्थाचा समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याशी संबंधित जोखमीपासून बचाव होतो.

सारांशरूपाने असे सांगता येईल की, मूग डाळीचे लाडू हा मघुमेहाच्या रुग्णांसाठी एक स्वादिष्ट, पौष्टिक व सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे मधुमेहींनी आहारात या लाडूचा समावेश योग्य प्रमाणात केल्यास त्यांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करता येते आणि आरोग्यही टिकवता येते. म्हणूनच मधुमेह झालेल्या लोकांना गोड खाण्याची इच्छापूर्ती आणि आरोग्य राखणे या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी हा लाडू सेवन करण्याचा आनंद घेता येतो.