उन्हाळा सुरू झाला की उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आपण थंडगार पदार्थ आवर्जून खातो किंवा पितो. त्यामध्ये थंडगार ताक, सरबत, मिल्क शेक, कोल्ड कॉफी, कुल्फी, आइस्क्रीम यांसारख्या कितीतरी पदार्थांचा समावेश होतो. मात्र, आइस्कीम हा सगळ्यात झटपट उपलब्ध होणारा आणि मनाला आराम देणारा पदार्थ आहे, असे म्हणता येऊ शकते. विविध चवी अन् रंगांचे आइस्क्रीम आपल्याला दुकानात मिळतात. मात्र, कधी कधी असे बाहेरचे आइस्क्रीम खाऊन नंतर त्यामध्ये घातल्या गेलेल्या पदार्थांचा त्रास आपल्या घशाला होऊन, घसा बसणे किंवा सर्दीसारख्या कुरबुरी सुरू होतात.

मात्र, कोणताही त्रास न होऊ देता अत्यंत चविष्ट असे आइस्क्रीम खायचे असेल, तर सर्वांत सोपा उपाय म्हणजे ते स्वतः घरी बनविणे. अनेकांना आइस्क्रीम बनविणे अवघड वाटत असेल; पण तसे नाहीये. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर nehadeepakshah नावाच्या अकाउंटवरून पेरू आइस्क्रीमची एक अत्यंत भन्नाट अशी रेसिपी शेअर केली गेली आहे. त्यानुसार घरच्या घरी फळापासून तयार होणारे ‘चटपटीत’ आइस्क्रीम कसे बनवायचे ते पाहू.

हेही वाचा : Recipe : कलिंगडाच्या सालींपासून बनवा ‘हा’ स्वादिष्ट पदार्थ! मुलांच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त

पेरूच्या थंडगार आइस्क्रीमची रेसिपी :

साहित्य

पेरू
मिल्क पावडर
फ्रेश क्रीम
साखर
लाल तिखट
काळे मीठ

कृती

  • सर्वप्रथम मध्यम आकाराचे दोन पेरू स्वच्छ धुऊन घ्या.
  • धुतलेल्या पेरूच्या केवळ देठाकडील भाग सुरीने कापून घ्यावा.
  • आता एका चमच्याच्या मदतीने पेरूच्या आतमधील गर काढून घ्या. गर काढल्यानंतर पेरू अगदी रिकाम्या कुल्फीच्या मडक्याच्या आकारासारखे दिसेल.
  • पेरूचा काढून घेतलेला गर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यावा.
  • आता त्याच मिक्सरच्या भांड्यात १/३ कप मिल्क पावडर, १/३ कप फ्रेश क्रीम व दोन मोठे चमचे साखर घालून घ्या.
  • आता हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये छान बारीक व एकजीव होईपर्यंत वाटून घ्या.
  • तयार झालेले मिश्रण मघाशी गर काढून घेतलेल्या दोन पेरूंमध्ये वरपर्यंत भरेल इतके ओतून घ्या.
  • आता आइस्क्रीमचे मिश्रण घट्ट होण्यासाठी दोन्ही पेरू फ्रिजरमध्ये ठेवून द्यावेत.
  • पेरू आणि त्यामधील मिश्रण पूर्णतः गोठल्यानंतर ते फ्रिजरमधून बाहेर काढून घ्यावेत.
  • आता सुरीच्या मदतीने हा पेरू चिरून घ्यावा.
  • चिरल्यानंतर पेरूच्या या आइस्क्रीमवर लाल तिखट, काळे मीठ भुरभुरवून ते खाण्यासाठी घ्यावे.

हेही वाचा : Recipe : थंडगार चटपटीत ‘मसाला पन्हे’! कैरीच्या सरबताला ‘असा’ द्या मिरचीचा ठसका…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात अत्यंत थंडावा देणारे आणि घरी तयार केलेले हे स्वादिष्ट असे पेरू आइस्क्रीम यंदा नक्की करून पाहा. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah या अकाउंटद्वारे पेरू आइस्क्रीमच्या रेसिपीचा हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २.६ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत.