[content_full]

`जिभेला जे चांगलं लागतं, ते शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे तुम्ही जिभेचे चोचले अजिबात पुरवू नका!` असा सल्ला शैलाला तिच्या नव्या आयुर्वेदाचार्यांनी दिल्यापासून ती जरा बिथरलीच होती. जगात कारलं, लाल भोपळा, दोडका, तोंडली, एवढ्याच भाज्या अस्तित्त्वात आहेत, असं तिचं ठाम मत झालं होतं. त्यातून, या भाज्या पारंपरिक पद्धतीने न करता, त्यांच्यावर रोज वेगळे अत्याचार करण्याचा तिनं चंगच बांधला होता. कारल्याची कोशिंबीर, भोपळा रायता, तोंडलीची चटणी, दोडक्याची शिकरण, असे एकेक भयानक खाद्यपदार्थ तिच्या तथाकथित पाककौशल्यातून साकार होत होते आणि घरातल्या सगळ्यांची उपासमार सुरू होती. बरं, शैला तिच्या गुरूंच्या बाबतीत अगदी संवेदनशील होती. काश्मीर प्रश्नावरून एखादा पेटून उठणार नाही, एवढी ती गुरूंबद्दल एकही अपशब्द निघाला तर पेटून उठत होती. पतिराजांना तर लग्नापासूनच तिची भीती वाटत होती, पण एवढे दिवस कधी आयशीस न घाबरणारी मुलं आता `आयसिस`एवढीच तिला घाबरू लागली होती. शैलाचा हा पाक-दहशतवाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. बरं, तिची नजर चुकवूनही काही खाणं शक्य नव्हतं, कारण तसं सांगून पोट भरल्याची कारणं दिली, तरी घरी आल्यावर तिनं केलेल्या पाक-अत्याचारांपासून सुटका नव्हती. काय करावं हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत होता. तिच्या या वेडापासून सुटकेची सगळ्यांनाच आस होती. शेवटी एके दिवशी वडिलांनीच हिंमत गोळा केली आणि ती आयुर्वेदाचार्यांकडेच अनुग्रहासाठी गेलेली असताना घरी सोयाबीन वड्यांचा घाट घातला. घरी आल्यावर ती खमंग वास पाहून घर डोक्यावर घेईल, अशी अपेक्षा होती, पण आज तिचा पवित्रा सौम्य झाला होता. तिनंही ते सोयाबीन वडे आनंदानं चापले. पौष्टिक आणि चविष्ट, असा संगम त्यात झाल्याचं कबूल केलं. तिच्या अचानक हृदयपरिवर्तनाचं रहस्य थोडं उशिरानं लक्षात आलं. स्वतः आयुर्वेदाचार्यांना तिनं कांदाभजी खाताना पाहिलं होतं, त्यामुळे आता त्यांची पायरी चढायची नाही, असं तिनं ठरवून टाकलं होतं. त्याचबरोबर दुसऱ्या गुरूच्या शोधात असल्याचंही जाहीर केलं, तेव्हा मात्र, सगळ्यांच्या तोंडाची चव पुन्हा उतरली!

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • दोन वाट्या सोयाबिनचे पीठ
  • अर्धी वाटी तांदुळाची पिठी
  • अर्धी वाटी बेसन पीठ
  • प्रत्येकी एक छोटा चमचा  धने-जीरे पावडर
  • एक छोटा चमचा हळद
  • एक चमचा लाल मिरचीचे तिखट
  • अर्धा चमचा हिंग
  • दोन चमचे तीळ
  • चवीपुरते मीठ
  • दोन बारीक़ चिरलेले कांदे
  • एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • सर्व प्रथम एका परातीत सगळी पीठे एकत्र करून घ्यावीत. मग त्यामध्ये अर्धी वाटी कढत तेलाचे मोहन घालावे.
  • धने जिरे पावडर, हळद, लाल तिखट, हिंग, तीळ, कांदा, कोथिंबीर घालून किंचित कोमट पाण्यात हे पीठ घट्ट शिजवावे.
  • अर्ध्या तासानंतर तेलाच्या हाताने थोडे थोडे पीठ मळावे. त्याचे थापून वडे बनवावे.
  • हे वडे सर्व बाजूंनी सोनेरी ब्राऊन रंगावर मध्यम आचेवर तळून टिश्यू पेपरवर काढावेत.
  • हे गरम वडे दही, आवडती चटणी किंवा सॉस बरोबर खायला मस्त लागतात.

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]