Makar Sankranti 2024: मकरसंक्रांत हा वर्षाचा पहिला सण आहे. मकरसंक्रांत हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. मकरसंक्रांतीला गुळाची पोळी, चिक्की, तिळाचे लाडू असे अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तर यावर्षी तुम्हाला मकरसंक्रांतीला एखादा वेगळा पदार्थ करून पाहायचा असेल तर तुम्ही ‘भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या’ बनवून पाहू शकता. तर आज आपण भोपळा, तिळाच्या गोड घाऱ्या बनवण्याची रेसिपी पाहू.

साहित्य :

  • पाव किलो भोपळा
  • अर्धा किलो चण्याच्या डाळीचं पीठ
  • पाव किलो गूळ
  • वेलची पावडर
  • तीळ (५० किंवा १०० ग्रॅम)
  • हळद
  • मीठ
  • तेल

हेही वाचा…Makar Sankranti 2024: तिळाचे लाडू कडक होतात? ‘ही’ ट्रिक वापरून संक्रांतीला बनवा कडक न होणारे मऊ तिळाचे लाडू…

कृती :

  • भोपळा धुवून घ्या आणि त्याचे साल काढून घ्या.
  • गूळ बारीक करून आणि भोपळा किसून घ्या आणि दोन्ही कुकरमध्ये शिजवून घ्या. (कुकरमध्ये एक किंवा दोन शिट्ट्या करून घ्या)
  • (टीप : कुकरमध्ये पाणी घालू नये)
  • नंतर चण्याच्या डाळीचं पीठ घेऊन त्यात हे मिश्रण आणि हळद, वेलची पावडर, चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि मिक्स करा आणि पीठ मळून घ्या.
  • पीठ १५ ते २० मिनिटे किंवा अर्धा तास तसेच ठेवा. (टीप : पिठात अजिबात पाणी घालू नका)
  • त्यानंतर हाताला पाणी लावून पीठ थापून पुरीसारखा आकार द्या आणि त्यावर तीळ लावून घ्या.
  • नंतर कढईत तेल घ्या आणि या पुऱ्या तळून घ्या.
  • अशाप्रकारे ‘भोपळ्याच्या तीळ लावलेल्या गोड घाऱ्या तयार.’
  • तुम्ही या गोड घाऱ्या रव्याच्या किंवा तांदळाच्या खिरीसोबत खाऊ शकता.