भारतीयांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहानेच होते, यात काही शंका नाही. मग दिवसभरात काम करताना सुस्ती येऊ नये म्हणून चहा हा होतच असतो. तुम्हाला कधीही आणि कुठेही चहा प्यायची इच्छा झाली तर प्रत्येक नाक्यावर चहाची टपरीसुद्धा पाहायला मिळते. आता व्यक्तीनुसार चहाच्या प्रकरांमध्येदेखील बदल होतात. काहींना कोरा चहा आवडतो, काहींना बिना साखरेचा; तर काही पद्धतशीर दूध व साखर घातलेल्या चहाचा आनंद घेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण, चहाचे एवढे वेगवेगळे प्रकार असूनसुद्धा त्यांच्यात राजा ठरतो, तो म्हणजे आपला ‘मसाला चहा’. चहा, साखर, दूध व मसाले घालून बनवलेला मसाला चहा म्हणजे चहा प्रेमींसाठी स्वर्गसुख म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण, प्रत्येकजण मसाला चहा बनवताना आपल्या आवडीनुसार त्यातल्या मसाल्यांची निवड करतो. तसंच ही मसाला चहाची रेसिपी, खास गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवली आहे. पण, रेसिपी बघण्याआधी मसाला चहाचे काही फायदे आहेत ते सुद्धा पाहू.

हेही वाचा : घरीच बनवायचेत हॉटेलसारखे कुरकुरीत मंचुरियन; मग तुम्हाला मदत करतील ‘या’ पाच टिप्स….

मसाला चहाचे होणारे फायदे

१. मसाला चहात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि अँटीइंफ्लामेंटरी घटक असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

२. वातावरणात बदल होत असताना मसाला चहा हा आरोग्याच्या किरकोळ समस्यांसाठी लाभदायक ठरू शकतो.

३. मसाला चहामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमधले घटक पोटासाठी चांगले असतात. या मसाल्यांनी पचनास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यासदेखील मदत होऊ शकते.

४. गरमागरम मसाला चहा थंडीच्या दिवसांमध्ये प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते.

५. चहाच्या पानांमध्ये कॅफीन आणि अँटी- ऑक्सिडंट्स असल्याने व्यक्तीला तरतरीत राहण्यास मदत होते.

गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवू मसाला चहा

१. दालचिनी, काळी वेलची, मिरे, बडीशेप, हिरवी वेलची, लवंग, जायफळ या सगळ्या पदार्थांना खलबत्त्यात कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक करा.

२. एक कप पाणी गॅसवर ठेवा, त्यामध्ये २ चमचे चहा पावडर, २ चमचे साखर घालून उकळून घ्या.

३. चहाला हलकी उकळी आल्यानंतर त्यामध्ये चहाचा मसाला व दूध घालून पूर्ण उकळी येऊ द्या.

४. आता त्यामध्ये दोन लहान चमचे वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका व गॅस बंद करा.

तयार आहे हा खास गुलाबाच्या पाकळ्या वापरून तयार केलेला मसाला चहा.

या खास मसाला चहाची रेसिपी शेफ अजय चोप्रा यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर केली आहे. अजय चोप्रा यांनी, हा गुलाबाच्या पाकळ्या वापरुन तयार केलेला मसाला चहा कसा बनवायचा हे दाखवलं असून, सोबत काही टिप्सदेखील दिल्या आहेत. तर या गुलाब मसाला चहाला एकदा नक्की बनवून पहा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make tasty and comforting rose masala tea with this unique recipe dha
First published on: 30-10-2023 at 13:27 IST