कोणत्याही भाषेतील प्रेमकथा म्हटली की ती वास्तवापासून थोडी दूर नेणारीच असते. कदाचित वास्तवातून दूर नेण्यासाठीच प्रेमकथा घडत असतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ‘भेटली तू पुन्हा’मधील आलोक आणि अश्विनी यांची कथाही थोडीशी अशीच आहे. प्रत्येकाला हवीशी वाटणारी पण वास्तवापासून दूर असलेली. आलोकला कोणती मुलगी पसंत नसल्यामुळे त्याच्या घरचे अरेंज मॅरेजमध्ये मुलगी शोधायला सुरूवात करतात. कांदे- पोह्यांच्या एका कार्यक्रमात एकदा आलोक आणि अश्विनीची भेट होते.
आलोकला आपली पत्नी कशी असावी याच्या व्याख्या काही ठरलेल्या असतात. त्याला त्याच धाटणीची मुलगी हवी असते. पण अरेंज मॅरेजमध्ये त्याला ती शोधूनही सापडत नाही. तेवढ्यात त्याच्या आयुष्यात अश्विनी येते. त्याच्या अपेक्षांच्या यादीत न बसणारी. त्या पहिल्या कांदे- पोह्यांच्या भेटीत अश्विनीला तो फार आवडतो मात्र आलोकला तिच्यात फारसं काही चांगलं न वाटल्यामुळे तो तिला नकार देतो.पण एकदा गोव्याला जाताना दोघं दुसऱ्यांदा भेटतात. या प्रवासात आलोकला अश्विनी आवडत जाते. पण दुसऱ्यांदा तिला भेटल्यानंतर त्यांच्यात नेमकी प्रेम होतं का, ते नंतर लग्न करतात की वेगळे होतात हे पाहण्यासाठी हा सिनेमाच पाहणं गरजेचं आहे.
अरेंज मॅरेजमध्ये आजही असणाऱ्या काही चुकीच्या गोष्टींवर हा सिनेमा अगदी अलगद बोट ठेवतो. मुला- मुलींना काही भेटींमध्ये आपला भावी साथीदार निवडायचा असतो. पण त्या भेटीत प्रत्येकजण आपण किती चांगले आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यातला खरा माणूस ओळखूच येत नाही. लव्ह मॅरेजमध्ये जसा एकमेकांना ओळखायला वेळ मिळतो तसा तो अरेंज मॅरेजमध्येही मिळायला हवा असा विचार या सिनेमात मांडण्यात आला आहे. तुम्हीही जर अरेंज मॅरेज करत असाल तर या विचारासाठी हा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही.
सिनेमाची कथा चांगली असून ती उगाच लांबवली गेली असे सिनेमा बघताना प्रकर्षाने जाणवते. सिनेमाचा पूर्वार्ध चांगला वाटतो. पण एक साधी सरळ गोष्ट सांगताना त्याला विनाकारण फाटे फोडत गेल्यामुळे उत्तरार्धात सिनेमा पाहण्याचा उत्साह निघून जातो. त्यात अनेक प्रसंगांवर कात्री मारता आली असती तरी चालले असते असे वाटते.
सतत बडबड करणारी अभिनेत्री, टीसीने पकडणे, ट्रेन सुटणे अशा प्रसंगातून आपण ‘जब वी मेट’चे काही दृश्य मराठी सिनेमात पाहतोय हे वाटत राहते. सिनेमातील काही दृश्य फार मजेशीर आहेत. वैभव आणि पूजाने त्यांच्यापरिने चांगले काम केले आहे. चिनार महेश यांनी संगीत दिलेली सिनेमातील गाणी श्रवणीय आहेत. पण सिनेमा पाहताना गाण्यांचा भडीमार होतो असे जाणवत राहते.
अनेकदा परिस्थिती, आपल्या अपेक्षा किंवा विचार यांच्यामुळे आपण योग्य त्या व्यक्तीला वेळच देत नाही. शेवटी जुळणाऱ्या गोष्टी या जुळून येतात त्यासाठी वेळ देणं गरजेच आहे हा सुंदर मेसेज या सिनेमातून सांगण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही जर अरेंज मॅरेज करणार असाल तर स्वतःला आणि दुसऱ्याला एक संधी देऊन बघाच…
– मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com