गौरव सोमवंशी

कूटशास्त्र (क्रिप्टोग्राफी), गणित व संगणकशास्त्रातील विद्यमान संकल्पनांचा नव्या पद्धतीने उपयोग, हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे वैशिष्टय़. त्या जोरावरच येत्या काळात शेतीपासून कला क्षेत्रापर्यंत क्रांतिकारी बदलांस हे तंत्रज्ञान कारणीभूत ठरेल. त्या क्रांतीचे निव्वळ ‘प्रेक्षक’ बनायचे की तिला दिशा देणारे ‘वाहक’ व्हायचे?

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला समजून घेऊन त्याचा पुढे काय उपयोग होऊ शकतो, कोणकोणत्या क्षेत्रांत हे तंत्रज्ञान मूलभूत बदल घडवून आणू शकते, तसेच या तंत्रज्ञानाच्या मर्यादा काय आहेत, हे जाणून घेणे हा या लेखमालेचा मुख्य उद्देश आहे. पण असे करताना आपण याकडे नुसते एक तंत्रज्ञान म्हणून पाहायला लागलो, तर यातील काही अत्यंत महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होऊ शकते. कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे केवळ संगणकशास्त्रापुरतेच मर्यादित नाही, तर त्यापलीकडे जाऊन व्यक्ती, व्यवस्था, संघटना आणि त्यांच्यातील शक्ती-अधिकारांच्या द्वंद्वाचादेखील त्यात विचार करण्यात आला आहे. उदा. आर्थिक प्रणाली आणि बँकिंग हा यामधील एक मोठा घटक. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने आपले पहिले पडसाद याच क्षेत्रात उमटवले. लेखमालेच्या सुरुवातीच्या काही लेखांमधून आपण ब्लॉकचेन त्या अनुषंगाने समजून घेण्याचा प्रयत्न केला. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ‘बिटकॉइन’ ज्या पशाला, चलनाला किंवा बँकांना बाजूला सारू पाहते, त्याविषयी जाणून घेण्याआधी- या साऱ्यांची सुरुवात का आणि कशी झाली, हेही पाहणे गरजेचे होते. त्याबद्दलही लेखमालेतील काही लेखांत ऊहापोह झाला आहे. आधीच्या आर्थिक प्रणालींमध्ये कोणत्या त्रुटी होत्या, हेही आपण पाहिले. या त्रुटींवर मात करण्यासाठी थेट संगणकशास्त्राचा उपयोग झाला असेही नाही. जसे जसे संगणकशास्त्र विकसित होत गेले आणि विशेषत: इंटरनेट भवताल व्यापू लागले, तसे तसे अनेकांच्या मनात गोपनीयते(प्रायव्हसी)बद्दल प्रश्नचिन्हे निर्माण होऊ लागली. त्याबद्दल काही मंडळींनी एकत्र येत १९९२ च्या सुमारास ‘सायफरपंक’ नावाने तंत्रचळवळ सुरू केली.

या चळवळीत अनेक विचारधारांच्या संगणकशास्त्रज्ञांचे योगदान होते. परंतु या सगळ्यांमध्ये एक सामाईक धागा होता; तो म्हणजे- जवळपास सगळेच जण हे कूटशास्त्र (क्रिप्टोग्राफी), गणित आणि संगणकशास्त्राचा संगम घडवून सामान्यजनांना गोपनीयतेचा अधिकार कसा मिळेल, यासाठी प्रयत्नशील होते. त्यातूनच अनेक आविष्कारांचा जन्म झाला, ज्यांचा उपयोग आजही संगणक-सुरक्षेसाठी होतोच. कूटशास्त्र, गणित आणि संगणकशास्त्राचा उपयोग करून आधी शक्य नव्हती अशी अनेक कामे करता येतात, हे यातील काहींनी दाखवून दिले. अमेरिका आणि इतर देशांच्या सरकारांचे पितळ उघडे पाडण्यास कारणीभूत ठरलेल्या ‘विकिलीक्स’चा जनक ज्युलियन असांज हा याच चळवळीतून पुढे आलेला एक अवलिया. या चळवळीने सुरुवातीच्या काळात गोपनीयतेच्या मुद्दय़ावर अधिक लक्ष केंद्रित केले. परंतु पुढील काळात पशाचे वा चलनाचे काम करेल आणि त्यातील त्रुटीही दूर करेल असा आर्थिक पर्याय देण्याचा विचार या चळवळीने सुरू केला. सायफरपंक चळवळीच्या काही दिग्गजांसाठी हाच महत्त्वाचा मुद्दा बनला. काहींनी नवे आविष्कार घडवून त्यावर आधारित यंत्रणा सामान्यांसाठी उपलब्धदेखील करून दिल्या; परंतु काही ना काही तांत्रिक त्रुटींमुळे ते यशस्वी पर्याय ठरू शकले नाहीत. पण हे सारे प्रयत्न महत्त्वाचे होते, कारण त्यांचा उपयोग पुढे सातोशी नाकामोटो याने ब्लॉकचेन तंत्रज्ञान घडवण्यासाठी केला. याच तंत्रज्ञानावर बिटकॉइन आधारलेले आहे.

हा बिटकॉइन किंवा त्यामागील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आता यातील तांत्रिक बाबींकडे वळू या. त्यासाठी दोन मुद्दे ध्यानात ठेवू या :

(१) ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे संगणकशास्त्रापासून फारसे वेगळे नाही.

(२) ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये संगणकशास्त्र आणि कूटशास्त्रात वापरल्या गेलेल्या अनेक विद्यमान संकल्पनांचा वापर झाला आहे. फरक इतकाच की, विद्यमान संकल्पनांचा वापर अगोदर काही वेगळ्या कामासाठी केला जायचा आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानात त्याचा वापर काही नावीन्यपूर्ण उपयोजनासाठी केला गेला आहे. याचा अर्थ, ब्लॉकचेनचे वेगळेपण नवीन संकल्पनांमध्ये नसून, आधीपासून विकसित असलेल्या संकल्पनांचा नावीन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करून एक नवीन मिश्रण जगासमोर मांडण्यात आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे स्वरूप विविधांगी आहे. बिटकॉइनपासून सुरू झालेले ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे आज एका हॉटेलच्या मेन्यू कार्डप्रमाणे काम करते. ज्यात स्वादिष्ट पदार्थाऐवजी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे काही गुणधर्म आलेले आहेत. एखाद्या क्षेत्रातील त्रुटींचा विचार करून किंवा गरजेप्रमाणे त्या ब्लॉकचेन मेन्यू कार्डमधील निवडक गुणधर्माना एकत्र करत एक नवीन उपयोजन निर्माण करता येते. सध्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात हेच सुरू आहे. अनेक क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील विविध गुणधर्माना एकत्र करत काही प्रयोग करून पाहिले जात आहेत. येणाऱ्या काळात हे स्पष्ट होत जाईल की, कोणकोणत्या क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञान खरेच फरक आणू शकते आणि कोणत्या क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला मर्यादा आहेत. उदाहरणार्थ, आज हे ध्यानात आले आहे की, दशकभरापासून सुरू असलेल्या ‘बिटकॉइन’मध्ये आर्थिक जगतात बदल घडवण्याची प्रचंड क्षमता आहे. नजीकच्या भविष्यात अनेक क्षेत्रांमधील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या शक्यता स्पष्ट होत जातील. अर्थात, यामध्ये सहभाग घ्यायची इच्छा असल्यास (भले संगणकशास्त्राशी तुमचा काहीच संबंध नसेल!) तुम्हाला त्यात योगदान देता येईल. तुम्हाला तुमचे क्षेत्र नीट माहीत असेल आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या गुणधर्माची मूलभूत समज असेल, तर तुम्हीदेखील काही नवीन उपाय आखू शकता! ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत –

(अ) विकेंद्रीकरण

(ब) विश्वासार्हता

(क) अपरिवर्तनीय क्रिया

(ड) स्वयंस्पष्टता

(इ) पारदर्शकता

जसा एक अणू प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन यांनी बनलेला असतो, तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे गुणधर्म काही संकल्पनांच्या आधारावर निर्माण झालेले आहेत. त्या संकल्पना आधी नीट समजून घेतल्या तर त्यांवर आधारित गुणधर्मही सहजगत्या आत्मसात करता येतात. प्रस्तुत लेखकाने अमेरिका, युरोपमधील काही संस्था, भारतातील आयआयएम आणि अभियांत्रिकी संस्था, सरकारी अधिकारी वर्ग आणि मिश्र क्षेत्रांत काम करणारी सामान्य जनता यांच्यासमोर ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजावून सांगताना, हीच पद्धत अवलंबली आहे. ही पद्धत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे गुणधर्म समजून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरते, असा अनुभव आहे.

त्यामुळे पुढील काही लेखांत आपण संगणकशास्त्रातील आणि कूटशास्त्रातील मूलभूत संकल्पना समजून घेऊ. त्या संकल्पनांच्या आधारावर ब्लॉकचेन तंत्रज्ञान कसे तयार होते आणि बिटकॉइनची घडण कशी होते, हे जाणून घेऊ. तिथून पुढे बिटकॉइनपासून दूर होऊन आपण ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे इतर क्षेत्रांतील- शेतीपासून ते कला क्षेत्रापर्यंत होणारे संभाव्य फायदे पाहू या. इंटरनेट आज जसे सगळ्यांसाठीच आहे, तसेच ब्लॉकचेन हे येणाऱ्या काळातील क्रांतिकारक तंत्रज्ञान ठरेल असे भाकीत आहे. म्हणून सर्वानाच याची समज काही प्रमाणात तरी असावी, जेणेकरून या क्रांतीचे आपण नुसते ‘प्रेक्षक’ नव्हे, तर तिला दिशा देणारे क्रांतीचे वाहक ठरू शकू..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io