15 August 2020

News Flash

साथीतले ब्लॉकचेन प्रयोग..

फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवडय़ांत चीनने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित कमीत कमी २० अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहेत

संग्रहित छायाचित्र

 

गौरव सोमवंशी

करोना साथप्रसाराच्या आकडेवारीचे विश्लेषण असो वा अन्नपुरवठा साखळी किंवा विमा योजना असो, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करोना साथीशी लढताना विविध पातळ्यांवर सुरू आहे. त्यातील काही प्रयोगांची ही ओळख..

२८ मार्चला आलेल्या एका बातमीने लक्ष वेधून घेतले. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने करोनाचा प्रसार किती प्रमाणात आणि कुठे होतोय, हे तपासण्याकरिता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘प्लॅटफॉर्म’ बनवण्यास सुरुवात केली आहे, असे ती बातमी सांगते. त्याआधी, १९ मार्चला अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाकडून एक सूचना यादी काढण्यात आली. ज्यात करोना साथीच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी अत्यावश्यक व्यवसाय आणि सेवांची नावे होती. त्यात अन्नपुरवठय़ामध्ये कार्यरत असलेले ‘ब्लॉकचेन मॅनेजर’ यांचीसुद्धा नोंद आहे. त्याही आधी, म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवडय़ांत चीनने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित कमीत कमी २० अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहेत. आपत्तीला विविध पद्धतींनी सामोरे जाण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल. जसे की, आपण जे पैसे दान करू त्यांचा वापर नक्की कुठे आणि कसा होतो, याचा पाठपुरावा करण्यासाठी चीनमधील एका नवउद्यमी गटाने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ‘हायपरचेन’ नामक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) बनवली असून, आतापर्यंत २० लाख डॉलर इतक्या देणगी रकमेचा त्यावरून पाठपुरावा घेतला जात आहे. करोनाबाधित रुग्णांसाठी विमाआधारित कामे तात्काळ आणि कमीत कमी वेळात व्हावीत यासाठीदेखील एक ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञावर आधारित  ‘ब्ल्यू क्रॉस इन्शुरन्स’ नावाची यंत्रणा बनवली गेली आहे.

आजच्या लेखात हे सारे सांगण्याचे कारण काय, असा प्रश्न काहींना पडला असेल. तर करोना विषाणूच्या जागतिक प्रादुर्भावामुळे ज्या अनेक अभूतपूर्व आणि अनाकलनीय घटना घडत आहेत, त्यामध्ये ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानसुद्धा काही प्रमाणात लक्ष वेधून घेत आहे; त्याची नोंद ठेवावी म्हणून ‘साखळीचे स्वातंत्र्य’ या लेखमालेतील इथवरच्या क्रमाला फाटा देत आजच्या विशेष लेखात माहिती पाहू..

लेखमालेतील आजवरच्या लेखांमध्ये  ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी आपण एक विशिष्ट मार्ग निवडला होता. खरे तर या तंत्रज्ञानाचा आविष्कार काही मोजक्या समस्यांचे निवारण करण्यासाठी झाला होता आणि या समस्या संगणकशास्त्राशी कमी, तर अर्थशास्त्र, इतिहास आणि समाजव्यवस्थेशी अधिक निगडित होत्या/ आहेत. म्हणून आपण आधी पैशाचा इतिहास पाहिला, बँकिंग क्षेत्राची घडण थोडक्यात पाहिली, आणि नव्वदच्या दशकात उदयास आलेल्या ‘सायफरपंक’ चळवळीची वाटचाल थोडक्यात जाणून घेतली. मागील लेखापासून आपण ‘ब्लॉकचेन’मधील तांत्रिक संकल्पना समजून घेण्याची सुरुवात करत ‘हॅशिंग’बद्दल माहिती घेतली. आजच्या विशेष लेखानंतर आपण हाच मार्ग पुढे सुरू ठेवून इतर तांत्रिक संकल्पना समजून घेत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे गुणधर्म जाणून घेणार आहोत.

तर.. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेने करोना साथीचा प्रसार नीट आणि अचूक पद्धतीने कळावा यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान वापरण्याचे ठरवले आहे. म्हणजे नेमका कसा उपयोग होणार आहे? रुग्णांची माहिती ही कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित नसून विखुरलेली असते आणि अनेकदा कोणती माहिती विश्वसनीय आहे, हे कळायलाही मार्ग नसतो. अशा वेळी विकेंद्रित पद्धतीने चालणाऱ्या प्रणालीचे महत्त्व ध्यानात येते. अशा प्रणालीत कोणत्याही दूरच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या वैद्यकीय चाचण्या आणि त्यांचे निष्कर्ष एका विश्वसनीय प्रणालीद्वारे जतन केले जातील आणि हे करताना गोपनीय माहिती कायम गोपनीयच राहील आणि अनधिकृत व्यक्तींना ती माहिती बघण्याची वा बदलण्याची परवानगी नसेल. अशा पद्धतीने चालणाऱ्या प्रणालीमुळे अनेक कामे सोपी होतील. वैद्यकीय माहिती झपाटय़ाने गोळा करता येईल आणि त्यानुसार काही निर्णय घेऊन करोनाच्या प्रसाराला आळा बसेल. खरे तर वैद्यकीय माहिती ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीत जतन करणे हा काही नवा प्रकार नाही; पण करोनासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून चालविण्यात येणारा हा प्रयोग नक्कीच नवा आहे!

दुसरे उदाहरण अमेरिकेतील ‘ब्लॉकचेन मॅनेजर’चे आहे. अमेरिकेत अन्नपुरवठा साखळीत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली वापरून नक्की काय साध्य होणार आहे? वास्तविक अन्नपुरवठा साखळीत अनेक घटक अंतर्भूत असतात. आपण जे खातो ते नक्की कुठून येते, त्याचे उत्पादन कोणी घेतले, त्यासाठी कोणत्या प्रक्रिया किंवा औषधे वापरली गेली, शेतकऱ्याला आणि पुरवठा साखळीतील अन्य मंडळींना किती मोबदला मिळाला, अन्नाचा साठा किती, कुठे आणि कोणाकडे उरला आहे किंवा किती गरज आहे, या साऱ्या बाबींचा विचार आपण दैनंदिन जीवनात क्वचित करतो. पण अन्नपुरवठा  सुरळीत राहील याची आणि आपल्या आरोग्याचीही हमी तेव्हाच देता येईल, जेव्हा आपण या पडद्यामागे कार्यरत यंत्रणेला पारदर्शक करू शकू.

नेमके हेच काम करण्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान वापरण्याची मोहीम सुरू आहे. काही प्रमाणात त्या दिशेने प्रगतीसुद्धा झाली आहे. गोपनीयता हा ‘ब्लॉकचेन’चा एक गुणधर्म आहे. म्हणजे या तंत्रज्ञानात तुम्हाला जी गोष्ट गोपनीय ठेवायची आहे ती गोपनीयच राहते (जसे की, ‘बिटकॉइन’मध्ये सातोशी नाकामोटो याची ओळख गोपनीय आहे!); पण त्याचवेळी ज्या गोष्टी पारदर्शक ठेवायच्या आहेत, त्या काही केल्या पारदर्शकच राहतील (उदा. ‘बिटकॉइन’मध्ये सातोशी नाकामोटोच्या खात्यात किती ‘बिटकॉइन’ आहेत हे सगळ्यांना दिसते!). ‘ब्लॉकचेन’च्या याच गुणधर्माचा वापर अन्नपुरवठा साखळीत करण्यासाठी आता प्रयत्न सुरू आहेत. प्रस्तुत लेखकसुद्धा महाराष्ट्रातील एका शेतकी गटाच्या अन्नपुरवठा साखळीसंदर्भातील ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित एका अनोख्या प्रकल्पात कार्यरत आहे. त्याविषयी लेखमालेत पुढे सविस्तर जाणून घेऊच!

आता चीनमधल्या उदाहरणाबद्दल.. चीनने फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवडय़ांतच ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित कमीत कमी २० अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहेत. करोना आपत्तीशी सामना करण्यासाठी त्यांचा वापरही सुरू झाला आहे. त्यातील एक उदाहरण हे देणगी दिलेल्या पैशांबद्दल आहे. आपण एखाद्या संस्था-संघटनेला एकदा देणगी दिली की त्याचे पुढे काय होते, हे सहसा पाहत नाही. दान-देणगी या संकल्पनेभोवती असलेल्या सांस्कृतिक-धार्मिक चौकटींमुळे ते होते. परंतु आपत्तीजनक परिस्थितीशी लढण्यासाठी आर्थिक बळ मिळावे म्हणून दिलेल्या देणगीबाबत असे दुर्लक्ष करणे गैर ठरू  शकते. मात्र, पैशाच्या उलाढालींत पारदर्शकता आणणे हे तसे सोपे काम नाही. परंतु चीनमधल्या एका नवउद्यमी गटाने ते करून दाखवले आहे. त्यांनी चीनमधील जनतेच्या मनात ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या पारदर्शकतेबद्दल रुजवलेल्या ज्ञानामुळे जवळपास २० लाख डॉलर इतकी रक्कम विविध लोकांकडून दान करण्यात आली आहे. या साऱ्यात पारदर्शकता आणि विश्वसनीयता राखली गेली आहे. चीनमधील दुसरे उदाहरण आहे विमा कंपन्यांचे. यात दोन कंपन्या लक्ष वेधून घेत आहेत. एक आहे ‘ब्ल्यू क्रॉस इन्शुरंस’, जी बँक ऑफ ईस्ट एशियाकडून चालवली जाते. तर दुसरी तिथल्या एका बडय़ा कंपनीची ‘शियांग हू बौ’ नावाची विमा योजना. ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही योजना राबवल्या जात आहेत. ‘शियांग हू बौ’ या योजनेत दहा कोटींहून अधिक विमाधारक आहेत. प्रत्यक्ष कागदपत्रीय व्यवहारांना फाटा देत डिजिटल पद्धतीचा अवलंब करणाऱ्या या योजना विमाधारकांसाठी सुसह्य़ ठरत आहेत. इथे कोणाला प्रश्न पडेल की, ऑनलाइन व्यवहारांतही हीच पद्धत अवलंबली जाते, तर मग ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञाना’ने नेमका काय फरक आणला आहे? आतापर्यंत डिजिटल व्यवहार केले जाताहेत हे खरे; पण ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान त्यात पारदर्शकता, हवी तिथे गोपनीयता, विश्वसनीयता आणि विकेंद्रितता आणते.

तात्पर्य हे की, इनमीन १२ वर्षे जुने असलेले ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान सध्याच्या करोना साथीतसुद्धा आपली छाप उमटवत आहे. लेखाच्या मर्यादेत त्यातील साऱ्याच उपयोजनांची ओळख इथे करून देणे अशक्य आहे. मात्र, ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान कुठे आणि कसे वापरले जाते आहे, याविषयी ‘गूगल’वर नक्कीच जाणून घेता येईल.

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 12:19 am

Web Title: article on blockchain experience in companion abn 97
Next Stories
1 हॅशिंग.. हॅशकॅश ते ब्लॉकचेन!
2 क्रांतीचे वाहक होताना..
3 सातोशी नाकामोटो कोण आहे?
Just Now!
X