09 August 2020

News Flash

व्यवहार, विश्वास आणि सुरक्षा

हरेक क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रत्येक गुणधर्म त्याच पद्धतीने वापरता येतो असेही नाही.

संग्रहित छायाचित्र

 

गौरव सोमवंशी

‘ब्लॉकचेन म्हणजेच बिटकॉइन’ हा पूर्वग्रह त्यागून ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे पाहिले, तर हे नवतंत्रज्ञान नेमके काय आहे आणि काय नाही, याचा उलगडा होईलच; पण त्यातून निर्माण झालेल्या नव्या शक्यतांचेही आकलन होईल..

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाकडे केवळ एक नवे तंत्रज्ञान म्हणून न पाहता, त्यातील तांत्रिक संकल्पनांसोबत आपण इतिहास, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अनुषंगाने ते समजून घेत आहोत. या लेखात या लेखमालेतील मागील १९ लेखांचा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे; कारण या लेखांत ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान अर्थशास्त्र, इतिहास आणि तांत्रिक संकल्पनांच्या संदर्भात पाहिले, तर यापुढील लेख हे ‘बिटकॉइन’ आणि ‘क्रीप्टोकरन्सी’ यांवर विशेष भर देणारे असतील. त्यामुळे- ब्लॉकचेन म्हणजेच बिटकॉइन आणि बिटकॉइन म्हणजेच ब्लॉकचेन, असा गैरसमज होऊ नये. लेखमालेतील चौथ्या (‘पैशाचा इतिहास’, २३ जानेवारी) ते आठव्या (‘साखळीतील पहिली कडी’, २० फेब्रुवारी) लेखापर्यंत पैसा आणि चलन यांचे स्वरूप ऐतिहासिकदृष्टय़ा समजून घेतले. पैशाला नक्की मूल्य कशामुळे प्राप्त होते, हे आपण पाहिले. ‘पैशाची स्मृती..’ (३० जानेवारी) या लेखात आपण यॅप बेटांवरील महाकाय दगडी चलनांच्या उदाहरणावरून ‘पैसे हे मालकी हक्क आणि व्यवहारांची नोंदवहीच’ आहेत, हे पाहिले. यॅप बेटांवर चलनांसाठीचे विशिष्ट दगड आढळत नाहीत म्हणून खूप श्रम आणि जोखीम पत्करून ते दूरच्या बेटावरून आणावे लागतात, आणि या श्रम किंवा जोखिमेचे मूल्य त्या दगडाला दिले जाते. तसेच आपण मागील लेखात (‘संदेशांची साखळी’, ७ मे) ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही तांत्रिक संकल्पना पाहिली. यॅप बेटांवरील शेकडो वर्षे जुनी अर्थव्यवस्था आणि काही दशकांपूर्वी आलेली ‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना यांमध्ये काही साम्य आढळते का?

तसेच आपण ‘पोलोने पाहिलेला पैसा..’ (६ फेब्रुवारी) या लेखात कागदी चलनाची सुरुवात कशी झाली, याची माहिती घेतली. या कागदी चलनाला मूल्य कसे मिळाले? तर व्यापाऱ्यांना मोठे व्यवहार करताना चलनी नाणी बाळगणे शक्य नसे. त्यामुळे त्यांना व्यवहारांसाठी कागदी चलन देऊन त्याच्या मोबदल्यात तितक्या किमतीचे सोने किंवा धातू चीनमधील ते साम्राज्य आपल्या खजिन्यात ठेवून घेत असे. ही कागदी चलनाची ढोबळ सुरुवात. परंतु काही वर्षांनी चीनच्या सम्राटांना वाटले की, यात एकाच वेळी सगळे लोक खजिन्यातून सोने वा चांदी तर काढणार नाहीत ना? मग थोडे आणखी कागदी चलन छापले तर त्याचा उपयोग करून बरेच व्यवहार करता येतील, असा विचार त्यांनी केला. परंतु या नव्याने छापल्या जाणाऱ्या नोटांना कोणताच आधार नव्हता; म्हणजे असे की, त्यांच्या बदल्यात खजिन्यात कोणते सोने किंवा नाणे घेऊन ठेवलेले नसे. त्यामुळे जर एकाच वेळी चीनमधील त्या सगळ्या नोटधारकांनी नोटा परत करत आपापले सोने किंवा चांदीचे नाणे मागितले तर? या उदाहरणात शेवटी येणाऱ्यांना काहीच मिळाले नसते, कारण खजिन्यातील सोन्या-चांदीहून अधिक नोटा छापल्या गेल्या आहेत. तरीही हे रूढ झाले, कारण पुढील काळात चलनाला सोन्या-चांदीपेक्षा ‘विश्वास’ हा आधार मिळाला. हा आधार आजच्या चलनालासुद्धा लागू होतो. आजचे चलन किंवा बँकिंग प्रणाली अथवा अर्थव्यवस्था सोन्या-चांदीच्या साठय़ावर अवलंबून नसून ‘विश्वासा’वर आधारित आहे.

याच विश्वासाचा घात कसा होतो, हे आपण ‘साखळीतील पहिली कडी..’ या लेखात २००८ च्या जागतिक आर्थिक मंदीच्या उदाहरणावरून पाहिले. यातून एक बाब ध्यानात येते, ती म्हणजे- ‘विश्वास’ या गोष्टीला ग्राह्य़ धरून किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर लादून चालणार नाही. मग या विश्वासाची शाश्वती येणार कुठून, ती कोण देणार? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण ‘सायफरपंक’ या चळवळीकडे वळलो. या चळवळीतूनच ‘बिटकॉइन’चा जनक सातोशी नाकामोटो उदयास आला, त्याचसोबत ‘विकिलिक्स’कर्ता ज्युलियन असांजदेखील ‘सायफरपंक’चेच अपत्य! गणित, संगणकशास्त्र आणि कूटशास्त्र (क्रीप्टोग्राफी) यांच्या साहाय्याने पैसे आणि चलनामध्ये ‘विश्वास’ हा आधारभूत मुद्दा राजकीय पैलूऐवजी एक तांत्रिक गुणधर्म म्हणून कसा आणता येईल, याबाबत ‘सायफरपंक’ चळवळीने प्रयत्न केले. ‘बिटकॉइन’ हा त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणता येईल.

आता विचार करा, मागील दोन लेखांत आपण जी उदाहरणे पाहिली ती याच ‘विश्वासा’बद्दल होती की नाही? आलिशान हॉटेलमधील बंदिस्त कैदी ‘विश्वासा’ने पुढे संदेश कसे पाठवू शकतील, हे सायमन देदेओ यांनी दिलेल्या उदाहरणावरून पाहिले. त्याआधी एका वितरित प्रणालीचे उदाहरण घेऊन आपण हे कोडे सोडवायचा प्रयत्न केला की, जर कोणतीही केंद्रीय संस्था नसेल तर अनेक लोकांच्या व्यवहारांमध्ये सत्य काय आहे हे कसे ओळखायचे? म्हणजे इथे ‘विश्वास’ हे मूल्य त्या प्रणालीचा मूलभूत भागच बनवायचे आहे. यात काही लोक खोटे बोलणारे किंवा लबाडी करणारे अथवा चुकीचे काम करणारे असतील, तर त्यांच्यामुळे सत्य पुसून जायला नको याची तरतूद कशी करावी, हाही प्रश्न आपण चर्चिला. यासाठी दोन लेखांमध्ये (‘गोष्ट छोटीच, पण..’, २३ एप्रिल आणि ‘बहुमताचे कोडे’, ३० एप्रिल) ‘क्रूर राजा आणि त्याच्यावर आक्रमण करण्यास आलेले अनेक सेनापती’ या उदाहरणावरून पाहिले की, कोणतीही विशेष संस्था किंवा व्यक्तीला काही विशेषाधिकार न देताही आपण एक विश्वासपूर्ण प्रणाली रचू शकतो.

तरीही अशा प्रणालीचा गैरवापर करण्याचा कोणी प्रयत्न केलाच, तर सुरक्षा कुठून मिळेल? त्याचे उत्तर गणित आणि कूटशास्त्रात मिळते. त्याबद्दल ‘सही रे सही’ (९ एप्रिल) आणि ‘आकडय़ांचे सुरक्षाकवच’ (१६ एप्रिल) या दोन लेखांत- माहितीच्या प्रचंड साठय़ाचे लहान प्रारूप (म्हणजे ‘हॅशिंग’) व त्या माहितीत फेरफार होऊ नये यासाठी डिजिटल स्वाक्षरीचे कवच कसे दिले जाते, तसेच ‘एसएचए-२५६’ या संगणकीय प्रणालीविषयीची माहिती घेतली.

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचा उपयोग कुठे कुठे होतोय आणि त्या दृष्टीने कशा प्रकारे प्रयत्न होत आहेत, याविषयी आपण या लेखमालेत स्वतंत्रपणे जाणून घेऊच. त्यात शेतीपासून वित्तव्यवस्थांपर्यंत, कला क्षेत्रापासून सरकारी यंत्रणांपर्यंतचे ‘ब्लॉकचेन’चे प्रयोग पाहू. पण त्याआधी आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे; ती म्हणजे- ‘बिटकॉइन’ नक्की कसे काम करते? त्यासाठी यातील तांत्रिक संकल्पना माहीत हव्यात. त्यामुळे पुढील काही लेख हे फक्त आणि फक्त ‘बिटकॉइन’बाबत असतील. ‘बिटकॉइन’ हे ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे एक विशिष्ट उपयोजन आहे. फेसबुक आणि इंटरनेट यांच्यात ज्या प्रकारचा संबंध आहे, तसाच या दोहोंत आहे. ‘बिटकॉइन’ हे आभासी चलन समजून घेतल्यानंतर आपण तांत्रिक अनुषंगाने ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाचे इतर काही गुणधर्म जाणून घेऊ. त्यातील काहींची माहिती आपण ‘क्रांतीचे वाहक होताना..’ (१९ मार्च) या लेखात घेतली. दुसरे म्हणजे, हरेक क्षेत्रात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा प्रत्येक गुणधर्म त्याच पद्धतीने वापरता येतो असेही नाही. म्हणजे समजा, ‘ब्लॉकचेन हॉटेल’मध्ये एकाच टेबलावर अनेक ‘क्षेत्रे’ जेवण्यास बसली आहेत आणि त्यांच्यासमोर ‘ब्लॉकचेन हॉटेल’चे सर्व ‘गुणधर्मा’ची यादी असलेले मेन्यू कार्डसुद्धा दिले आहे. प्रत्येक क्षेत्र आपल्या गरजेनुसार हवे ते गुणधर्म ‘ऑर्डर’ करून आपली भूक भागवेल. हेही शक्य आहे की, एखाद्या क्षेत्राला त्यातील कोणत्याच गुणधर्माची भूक नाही; त्यामुळे ते उठून दुसरीकडेही जाऊ शकते. त्यामुळे ‘ब्लॉकचेन’चे भविष्य हे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांइतकेच इतर क्षेत्रांतील मंडळीसुद्धा घडवतील. मात्र, त्यासाठी ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञान नक्की काय आहे आणि काय नाही, हे सोप्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 12:09 am

Web Title: article on blockchain transactions trust and security abn 97
Next Stories
1 संदेशांची साखळी..
2 बहुमताचे कोडे..
3 गोष्ट छोटीच, पण..
Just Now!
X