25 September 2020

News Flash

‘अदृश्य’ ईथिरियम!

वयाच्या सतराव्या वर्षी त्याला बिटकॉइनचा परिचय झाला. मग त्याने त्यावर काही लेखन सुरू केले, बिटकॉइनला वाहिलेले स्वत:चे नियतकालिकही काढले

संग्रहित छायाचित्र

 

गौरव सोमवंशी

वयाच्या सतराव्या वर्षी त्याला बिटकॉइनचा परिचय झाला. मग त्याने त्यावर काही लेखन सुरू केले, बिटकॉइनला वाहिलेले स्वत:चे नियतकालिकही काढले. पुढे दोनच वर्षांत औपचारिक शिक्षण सोडून ‘ब्लॉकचेन’विषयी जाणून घेण्यासाठी त्याने जगभ्रमंती सुरू केली.. आणि या साऱ्यातून आकारास आला एक तंत्रक्रांतिविचार!

इ.स. १७९४ या वर्षी अमेरिकेत प्रकाशित झालेल्या ‘द एज ऑफ रीझन’ या आपल्या अजरामर पुस्तकात थॉमस पेन म्हणतात की, ‘जे अतिशय अप्रतिम आहे आणि जे अतिशय हास्यास्पद आहे, यामधे असणारा फरक सुरुवातीला बऱ्याचदा फार धूसरच असतो.’ म्हणजे एखादी गोष्ट ऐकण्यास खूप प्रभावी वाटते; तसेच ती कितपत खरी आहे, असे संशयी विचारसुद्धा मनात येऊ लागतात. देशांच्या सीमा, सरकार, बँक, न्यायालये आणि अनेक केंद्रीय संस्थांना वगळून जगातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कुठल्याही कोपऱ्यात पैसे पाठवता यावे, हे ‘बिटकॉइन’चे ध्येय आधी अतिशयोक्तीच वाटे, अगदी ते वापरात आल्यानंतरसुद्धा. बिटकॉइनचे काम नुकतेच सुरू झाले, तेव्हा एका व्यक्तीने याच स्वप्नाला फक्त पैसे किंवा चलन यापुरते मर्यादित न ठेवता आणखी कुठे कुठे ते अमलात आणता येईल, याचा विचार सुरू केला. बिटकॉइनला अनुसरून असे एखादे व्यापक व्यासपीठ- ज्याचा वापर कोणीही कोणत्याही क्षेत्रात विकेंद्रीकरण घडवून आणण्यासाठी करू शकेल- बनवावे, असे त्याला वाटले. त्या व्यक्तीचे नाव आज ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या दुनियेत इतके प्रसिद्ध आहे, की त्याच्यापुढे फक्त बिटकॉइनचा निर्माता सातोशी नाकामोटोच उरतो!

ती व्यक्ती म्हणजे- व्हिटालिक ब्युटेरिन! वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्याने बिटकॉइनविषयी काही लिखाण सुरू केले आणि कॉलेज अर्धवट सोडून वयाच्या १९व्या वर्षीच जगासमोर ‘ईथीरियम’ या व्यापक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मची संकल्पना मांडली. ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने विविध स्रोतांकडून जवळपास १३७ कोटी रुपये इतका निधी उभारला. आजच्या घडीला व्हिटालिक ब्युटेरिनची संपत्ती ७४६ कोटी इतकी आहे आणि त्याच्या संकल्पनेवर आधारित ‘ईथिरियम’चे व्यापार बाजारमूल्य काही लाख कोट रुपयांत आहे!

पण अशा आकडय़ांनी व्हिटालिक ब्युटेरिनची कहाणी सांगणे उचित ठरणार नाही. त्याने बिटकॉइनवरून जी भव्य दूरदृष्टी मांडली आहे, ती समजून घेणे गरजेचे आहे. तर.. ब्युटेरिनचा जन्म १९९४ साली रशियात झाला. तो सहा वर्षांचा असताना त्याचे कुटुंब कॅनडात स्थित झाले. तिथे कॅनडाच्या प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांसमवेत तो शिक्षण घेऊ लागला. तिथे त्याच्याबद्दल काही गोष्टी लोकांमध्ये चर्चिल्या जात होत्या. उदा. त्याने काही आठवडय़ांतच मँडरिन भाषा प्रभावीपणे अवगत केली, तो स्वत:साठी इतके कमी वस्तू-सामान घेतो की ते सगळेच फक्त एका लहानशा सुटकेसमध्ये सहज सामावू शकते, तो अलौकिक बुद्धिमत्तेने संपन्न आहे.. इतकेच नव्हे, तर तो लिंबू सालासकट अख्खा खातो वगैरे..

२०११ साली त्याला बिटकॉइनबद्दल समजले. त्याचे वडीलसुद्धा बिटकॉइनवर तेव्हा विशेष लक्ष ठेवून होते. वॉटर्लू विद्यापीठात असताना त्याने एका नियतकालिकात बिटकॉइनविषयी लेख लिहायला सुरुवात केली. तेव्हा बिटकॉइन जगासमोर येऊन दोनच वर्षे झाली होती आणि ब्युटेरिनचे वय होते अवघे १७! तेव्हा बिटकॉइनचे मूल्य फारच कमी असले, तरी प्रत्येक लेखासाठी ब्युटेरिनला तेव्हा पाच बिटकॉइन मिळत, म्हणजे तेव्हाच्या किमतीनुसार एकूण चार डॉलर. नंतर ब्युटेरिनने स्वत:चे ‘बिटकॉइन मॅगझीन’सुद्धा सुरू केले. त्यासाठी लेख लिहितानाच त्याचे लक्ष ब्लॉकचेन तंत्रज्ञानाकडे वेधले गेले. त्याने ब्लॉकचेनचा सखोल अभ्यास सुरू केला. याच काळात त्याने विद्यापीठीय शिक्षण सोडून देण्याचा निर्णय घेतला. बिटकॉइन वा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून, जगभर प्रवास करीत लोकांशी चर्चा करण्याचा आपला मानस त्याने वडिलांना सांगितला. त्याचे वडील म्हणाले, ‘‘तू शिक्षण पूर्ण करून मोठय़ा कंपनीत नोकरीला लागलास तर बरेच पैसे कमावशील. पण आता शिक्षण सोडून तू जगभर प्रवास करीत लोकांशी भेटून तुझ्या या विषयावर चर्चा केलीस, तर तुला जितके शिकायला मिळेल तितके कुठेच वा कधीच मिळणार नाही!’’ ..आणि त्याने तसे केलेसुद्धा. ब्युटेरिनने मग पुढे युरोप, अमेरिकेच्या अनेक शहरांत जाऊन बिटकॉइन वा ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या मंडळींशी चर्चा केली. या अभ्यासासाठी त्याला ‘थील फेलोशिप’ मिळाली. मूळचे जर्मन असलेले अमेरिकी उद्योगपती पीटर थील यांच्या थील फाऊंडेशनकडूनही सुमारे ७५ लाख रुपयांची अभ्यासवृत्ती दिली जाते. ‘पेपॅल’ या कंपनीचे सहनिर्माते व जगविख्यात गुंतवणूकदार असलेल्या पीटर थील यांचे ‘झिरो टू वन’ प्रत्येक नवउद्यमीने वाचावे असे पुस्तक आहे.

तर.. या साऱ्यातून ब्युटेरिनच्या लक्षात आले की, सायफरपंक चळवळीपासून सुरू झालेला तंत्रक्रांतीविचार बिटकॉइनपर्यंत येऊन थांबला आहे. हा तंत्रविचार फक्त पैसे किंवा चलन यापुरता मर्यादित न ठेवता, तो कोणत्याही क्षेत्रात वापरता येऊ शकतो. बिटकॉइन हे सर्वासाठी खुले आहेच आणि त्यात लोकशाही मार्गाने कोणीही बदलसुद्धा सुचवू शकतो. पण हे बदल आणि बिटकॉइनचे पूर्ण ध्येय हे पैसा वा चलन याभोवतीच फिरतात. स्वत:हून नवीन उपक्रमांसाठी ब्लॉकचेन बनवणे म्हणजे एक अतिशय कठीण काम. अशा वेळी ब्युटेरिनने विचार केला की, जर आपण एक नवी प्रोग्रामिंग भाषा वा त्याभोवती लागणारी एक व्यापक प्रणाली बनवली, तर कोणीही स्वत:च्या मर्जीप्रमाणे स्वत:च्या क्षेत्रात लागणारे ब्लॉकचेन अ‍ॅप्लिकेशन बनवू शकेल असे व्यासपीठ त्याद्वारे तयार करता येईल. उदाहरणार्थ, उद्या कोणास फेसबुकसारखे समाजमाध्यम बाजूला सारून लोकशाही मार्गाने वा पारदर्शक गुणधर्मावर आधारित समाजमाध्यम बनवावेसे वाटले, तर थेट ब्युटेरिनने रचलेल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून त्यावर एक विकेंद्रित समाजमाध्यम त्यांना बनवता येईल. असे करण्यासाठी ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ नावाची एक योजना राबवायची ब्युटेरिनने ठरवले. (‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’ ही संकल्पना सर्वात आधी निक झाबो यांनी १९९६ साली मांडली होती, पण ती कधी पूर्ण स्वरूपात अमलात आणली गेलीच नाही. निक झाबो यांच्याबद्दल आपण १२ मार्चच्या ‘सातोशी नाकामोटो कोण आहे?’ या लेखात जाणून घेतले आहे.)

तर.. अशा नवीन प्रोग्रामिंग भाषेवर आणि ‘स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट’सारख्या नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित प्लॅटफॉर्मचे नाव ब्युटेरिनने ‘ईथिरियम’ असे ठेवले. हे नाव निवडण्यामागे कारण असे की.. ब्युटेरिन एकदा विकिपीडिया चाळत होता तेव्हा त्याने ‘ईथर’ या संकल्पनेबद्दल वाचले. १९व्या शतकापर्यंत असे वाटायचे की, प्रकाशाला प्रवास करण्यासाठी एका माध्यमाची गरज आहे. कारण तेव्हा असा समज होता की, प्रकाश हा पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. नंतर या विचाराला मायकल्सन-मोर्ले यांनी त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रयोगाद्वारे खोडून काढले. तरीदेखील, ‘ईथर’ नावाचे माध्यम- जे अदृश्य असून सर्व विश्वात पसरलेले आहे, ही संकल्पना ब्युटेरिनला भावली. आपले ‘ईथिरियम’सुद्धा असेच जगभरात अदृश्य असून ते विकेंद्रीकरणाची क्रांती घडवून आणेल, असे त्याने ठरवले. हे ‘ईथिरियम’ नक्की कसे काम करते, त्यावर आधारित किती अ‍ॅप्लिकेशन्स आजपर्यंत बनली आहेत, याविषयी पुढील लेखात जाणून घेऊ..

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:09 am

Web Title: bitcoin article on invisible etherium abn 97
Next Stories
1 ब्लॉकचेन हेच मध्यस्थ!
2 केंद्रित की विकेंद्रित?
3 बिटकॉइनवरील आक्षेप किती खरे?
Just Now!
X