उमेश बगाडे

एकोणिसाव्या शतकात नीतीविचारांचे अनेक विचारप्रवाह महाराष्ट्रात दाखल झाले. काळाच्या त्या-त्या टप्प्यावर या विचारप्रवाहांना इथल्या जाणत्या मंडळींनी कसे प्रतिसाद दिले, या विचारांच्या घुसळणीतून आकाराला आलेली समाजमनोभूमिका काय होती, याचा ऊहापोह पाक्षिक सदराच्या या आठव्या लेखात ..

‘मी कोण आहे?’ या प्रश्नाच्या उत्तरातून व्यक्तिगत व सामूहिक ओळख उभी राहत असते. पिता-पुत्र, मालक-मजूर अशा अनेकविध ओळखी देणाऱ्या सामाजिक सत्तासंबंधांमध्ये सामाजिक ओळख उभी राहत असते. लिंगभेद, वंशभेद, वर्गभेद, जातिभेद अशा अनेकविध प्रकारच्या सत्तासंबंधांचे जाळे त्या-त्या प्रकारच्या ओळखींना निर्माण करत असते. त्यानुसारच त्या-त्या समाजाचा नीतीविचार आकार घेत असतो.

भारतीय जातीसमाजात मुख्यत: जात-लिंगभावाने घडवलेल्या सत्तासंबंधांचा नीतीविचार कार्य करत होता. शुद्धी-अशुद्धीच्या कर्मकांडी उतरंडीमध्ये जात-लिंगभावाच्या उतरंडीचा विचार जोडला जाऊन जातिव्यवस्थाक पितृसत्तेचा सत्तासंबंध आकाराला आला. त्यात पुरुष शुद्ध व श्रेष्ठ होता, तर स्त्री अशुद्ध व कनिष्ठ होती. ब्राह्मण स्त्रीच्या तुलनेत अस्पृश्य पुरुष अशुद्ध व हीन होता. त्यात वयाच्या ज्येष्ठतेची उतरंड सांभाळली जात होती, मात्र थोरल्या भावाची वयाने लहान असलेली पत्नी त्यात आदरणीय ठरत होती आणि दहा वर्षांचे ब्राह्मणाचे मूल ८० वर्षांच्या चांडाळासाठी आदरणीय बनत होते.

पाश्चात्त्य नीतीविचाराचे आगमन

जातीसमाजाचे गठन करणाऱ्या कर्मकांडी संघटन तत्त्वामुळे नीतीचा असा एक अंमल तयार झाला होता. तो विलक्षण चिवट व अनुल्लंघनीय बनला होता. तो जात-लिंगभावाच्या विषमतेवर आधारित होता. त्यानुसार विधवाविवाहास प्रतिबंध करणारी रूढी ब्राह्मण व तत्सम जातींसाठी अनिवार्य, तर निम्न जातींसाठी वर्ज्य बनली होती. ज्ञान हे ब्राह्मण पुरुषांच्या मक्तेदारीची बाब मानले जाऊन स्त्री-शूद्रांवर ज्ञानबंदी लादली गेली होती. जात-लिंगभावाच्या उतरंडीतील विषम संबंधांचे वहन करणारे नीतीनियम इष्ट आणि नैतिक मानले जाऊन रोजच्या व्यवहारात पाळले जात होते. त्यात आत्यंतिक भ्रष्ट ब्राह्मणही श्रेष्ठ मानला जात होता. कर्मकांडाच्या अशा बडिवाराने सार्वजनिक नीती अगदीच गैरलागू बनली होती. या पार्श्वभूमीवर पाश्चात्त्य नीतीविचाराचे आगमन महाराष्ट्रात झाले.

एकोणिसाव्या शतकात नीतीविचारांचे जे अनेक विचारप्रवाह महाराष्ट्रात दाखल झाले, त्यात पहिला प्रवाह ख्रिस्ती नीतीविचाराचा होता. धर्मप्रसाराचा हेतू बाळगून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ख्रिस्ती नीतीविचाराची चर्चा घडवली. हिंदूंच्या अध:पतित नैतिकतेचे वाभाडे काढून त्यासमोर ख्रिस्ती नीतीविचाराचा आदर्श त्यांनी उभा केला. ख्रिस्ती नीतीविचाराची महती गाऊन हिंदू धर्मासमोर त्यांनी कडवे आव्हान उभे केले.

शालेय शिक्षणात नीतीविचार

अव्वल इंग्रजी काळात ख्रिस्ती नीतीविचार शालेय शिक्षणात दाखल झाला. शिक्षण व्यवस्थेच्या उभारणीत जबाबदारीची भूमिका बजावणाऱ्या मेजर थॉमस कॅण्डी यांनी ‘नीतीज्ञानाची परिभाषा’ (‘प्रिन्सिपल्स ऑफ मोरॅलिटी’, १८४८) हे ख्रिस्ती नीतीविचार सांगणारे पुस्तक लिहून मिशनरी शाळांच्या अभ्यासक्रमासाठी लागू केले.  ब्रिटिश राज्याप्रतिची निष्ठा घडवणारा नीतीविचार म्हणून ख्रिस्ती नीतीविचाराचा पुरस्कार त्यांनी केला.

ईश्वरशरणतेवर आधारलेल्या ख्रिस्ती नीतीविचाराला या पुस्तकात कॅण्डी यांनी शब्दबद्ध केले. मनुष्य हा जन्मत: पापी असून स्वत:चे तारण करण्यासाठी त्याने ईश्वराप्रति कृतज्ञताबुद्धी व निष्ठा बाळगणे अनिवार्य आहे; ईश्वराबाबतची भीती व प्रीती हाच नीतीचा एकमेव स्रोत आहे, असे त्यांनी प्रतिपादिले. ईश्वराला संतुष्ट करणारी कर्तव्यकर्मे त्यांनी कथन केली. विवेकनिष्ठा, गर्व व प्रतिष्ठेचा लोभ न बाळगणारी निराभिमानी वृत्ती, उतावळेपणा व राग यांचा त्याग करणारी गरीबवृत्ती, संतोषवृत्ती अशा नैतिक कर्तव्यांचा त्यांनी ऊहापोह केला. मनाचा  सावधपणा, उद्योगीपणा, सदाचार, परोपकार अशा व्यक्तीसंबंधातल्या कर्तव्यांचा पुरस्कार करून ख्रिस्ती धर्माच्या मानवतेच्या नीतीची महती त्यांनी गायली. मिशनरी शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या कॅण्डी यांच्या या पुस्तकामुळे विद्यार्थी प्रभावित होत राहिले. बाबा पदमनजींसारखे विद्यार्थी त्यातून धर्मातरित झाले.

परमहंस मंडळी आणि महात्मा फुले

ख्रिस्ती मताचे खंडन करण्यासाठी जी पुस्तके महाराष्ट्रात मागवण्यात आली, त्यात थॉमस पेनची पुस्तके होती. त्यातूनच डेइस्ट धर्म व नीतीविचार महाराष्ट्रात दाखल झाला. नीतीपालनातून ईश्वराची कृपा प्राप्त होते, हे ख्रिस्ती धर्माचे सूत्र जरी डेइस्ट नीतीविचाराने स्वीकारले असले, तरी पापाच्या जोखडातून या विचाराने मनुष्याला बाहेर काढले. ग्रंथप्रामाण्य नाकारून आत्मप्रत्ययाला नीतीचा आधार म्हणून स्वीकारले. मानवी अधिकारांची प्राप्ती नीतीविचाराचे उद्दिष्ट ठरवून नीतीला त्यांनी इहवादी अधिष्ठान पुरवले. मानवतावाद, विवेकवाद आणि इहवाद यांच्या रोकडय़ा आग्रहामुळे डेइस्ट नीतीविचाराने नवशिक्षितांना सर्वाधिक प्रभावित केले. परमहंस मंडळीने या नीतीविचाराचे अनुसरण केलेच; पण महात्मा जोतीराव फुले यांच्यासारख्या  शूद्र तत्त्वज्ञानेही त्याचे अनुसरण केले.

अधिकांचे सुख..

ब्रिटिश राज्यकर्त्यांचे तत्त्वज्ञान म्हणून उपयुक्ततावादी नीतीविचारही महाराष्ट्रात दाखल झाला. उदारमतवादी म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या जेरेमी बेन्थॅम यांनी सुखवादी नीतीचा पाया घातला. मानवाचे सार्वजनिक हित साधणारी कोणतीही कृती ही नैतिक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. ज्या कायद्यामुळे वा धोरणांमुळे अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख साधता येईल असे कायदे व धोरणे अंगीकारण्याची भूमिका त्यातून पुढे आली. अनेक ब्रिटिश प्रशासकांनी याचा मोठय़ा प्रमाणात अंगीकार केला. लॉर्ड बेण्टिन्कने केलेला सतीबंदीचा कायदा उपयुक्ततावादी नैतिकतेचेच फलित होता.

स्पेन्सर आणि मिल्ल

चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताच्या प्रभावात सुखवादी नीतीविचाराचा विकास झाला. हर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल (‘मिल्ल’) यांनी अज्ञेयवादी पवित्रा घेऊन ईश्वर, धर्म, अंत:प्रेरणा यांची नीती निर्धारणामधील भूमिका धुडकावून लावली. नीती कधीही नित्य आणि अपरिवर्तनीय असत नाही; इतिहासक्रमात ती सातत्याने विकसित होत असते. समाजविकासाच्या अवस्थेनुसार अनुभवावर आधारित नीतीविचारात उपयुक्ततावादी तत्त्वाच्या कसोटीवर सुधारणा करण्याची गरज असते, अशी भूमिका त्यांनी घेतली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींच्या एका गटाने स्पेन्सर-मिल यांच्या अज्ञेयवादी नीतीविचाराला अनुकूलता दाखवली. गोपाळ गणेश आगरकरांनी या नीतीविचाराचे अनुसरण केले.

पाश्चात्त्य जगातून आलेल्या नीतीविचारांच्या प्रभावामुळे हिंदू समाजाला अध:पतीत करणाऱ्या कर्मकांडी नैतिकतेला विरोध करावा असे महाराष्ट्रातील ब्राह्मणबहुल मध्यमवर्गाला वाटत होते. वैश्विक नीतीविचाराच्या चौकटीत हिंदू नीतीविचाराची पुनर्घटना करावी, असे विचार त्यांच्या मनात घोळत होते. त्यांनी त्यानुसार प्रयत्न केले खरे, मात्र त्यांच्या सामाजिक भूमिकेनुसार त्यांनी दिलेले प्रतिसाद भिन्न भिन्न स्वरूपाचे राहिले.

तोवर ब्राह्मणबहुल मध्यमवर्ग हा जात-पितृसत्तेच्या भौतिक पकडीमध्ये अडकला होता. त्याला पारंपरिक बुद्धिजीवित्वाचा वारसा पूर्णत: सोडायचा नव्हता आणि त्याचवेळी आधुनिकतेला आत्मसात करणाऱ्या नीतीविचाराची पुनर्घटनाही करायची होती. जातीसमाजाच्या कर्मकांडी नैतिकतेचा पूर्ण उच्छेद न करता; होता होईल अशा सुधारणा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संयत सुधारणावादाची कास धरून नीतीविचाराची पुनर्माडणी करण्याचा प्रयत्न झाला.

न्या. रानडेंचा नीतीविचार

संयत सुधारणावादाचे महाराष्ट्रातील अग्रणी न्यायमूर्ती रानडे हे राहिले. त्यांनी बिशप बट्लरच्या प्रभावातून प्रार्थना समाजाचा नीतीविचार बांधला. धर्मनिष्ठ नीती हा वैदिक परंपरेचाच वारसा आहे, असा दावा करून त्यांनी धर्मनिष्ठ नीतीचाच पुरस्कार केला. मानवी हृदयातील ईश्वरी आवाजातून निष्पन्न होणारा विवेक माणसातील मानुषतेचा विकास घडवतो, असे त्यांनी मानले. उपयुक्ततावाद्यांचा सुखवादी नीतीविचार त्यांनी नाकारला. धर्माचा व सदाचरणाचा साध्यप्राप्त हेतू सुख किंवा दु:ख दोन्ही नाहीत, असे निक्षून सांगितले. आई, पिता, बंधू, मित्र यांचे प्रेम, स्त्री-पुरुषांचे प्रेम आणि देशप्रेम यांची उदाहरणे देऊन सुखासाठीच माणूस कष्ट सोसतो हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. सुख हे मानवी जीवनाचे साध्य नसून विकास हे साध्य आहे, असे जाहीर करून आपल्या नीतीविचारासाठी त्यांनी भागवत धर्माचे अधिष्ठान स्वीकारले.

सर्व प्रकारच्या दैववादाला त्यांनी धुडकावून लावले. मानवाच्या मर्यादित स्वातंत्र्याची कल्पना मांडून त्यांनी एका बाजूला नैतिक कृत्यासाठी माणसाला जबाबदार  धरून प्रयत्नवादाचा पुरस्कार आणि दुसऱ्या बाजूला मानवी स्वातंत्र्याच्या मर्यादा दाखवून ईश्वरशरणतेची स्थिती निर्माण केली.

कर्मकांडी नैतिकतेची भलावण जरी रानडेंनी केली नाही तरी त्याचा कडवेपणाने निषेधही केला नाही. रानडेंचा नीतीविचार मुख्यत: मनुष्याच्या आध्यात्मिक उन्नतीला प्राधान्य देतो, मात्र समाजपरिवर्तनासाठी आवश्यक कृतिशीलतेकडे दुर्लक्ष करतो. जात-पितृसत्तेच्या दबावातून संयत सुधारणांची कास धरत एकप्रकारे तो तत्कालीन मध्यमवर्गाच्या नीतीविचाराची कुंठाच प्रगट करतो.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com