07 June 2020

News Flash

घोषणा, देशभक्त आणि राष्ट्रविरोधी

‘राष्ट्रवादाचा प्रकल्प’ सध्या सुरू आहे, तो वास्तवात लोकांवर बडगा उगारणारा आहे.

अवनिंद्रनाथ टागोर यांनी रेखाटलेली ‘भारत माता.’

‘भारतमाता की जय’, ‘जय हिंद’, ‘इन्किलाब झिंदाबाद’ यापैकी कोणत्याही घोषणा प्रसंग पाहून दिल्या जातात, तेव्हा राष्ट्रप्रेम व्यक्त होत असते. परंतु म्हणून घोषणा न देणाऱ्यांना सरसकट राष्ट्रविरोधी ठरवण्याचे कारण नाही. तेव्हा ‘भारतमाता की जय’वरून वाद आहेच आणि या वादात मुद्दा घोषणेचा नसून तिची अपेक्षा सक्तीने केली जाते आणि त्याआधारे लोकांना एका वा दुसऱ्या गटात मोजले जाते, हा आहे..

घोषणा आणि निवडणुका यांचे नाते तसे अतूटच. लोकसभेची २०१४ ची निवडणूक तोंडावर असताना भाजपने नरेंद्र मोदी यांना पक्षातर्फे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून घोषित केल्यावर या घोषित उमेदवाराने विनाविलंब अशा काही घोषणा दिल्या की, ती निवडणूकही त्या घोषणांमुळेच ओळखली जावी : अच्छे दिन आने वाले हैं, काला धन वापसी, सब का साथ सब का विकास अशा एक ना अनेक. पक्षाच्या पथ्यावर पडलेल्या अन्य गोष्टींशिवाय, या घोषणांनी भाजपचा सत्तामार्ग अधिक सुकर केला.
आज या घोषणा पोकळ भासतात. हात दाखवून अवलक्षण नको, अशा काहीशा भीतीपायी त्या घोषणा आज कोणीही देऊ धजत नाही. आता आणखी काही राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, नव्या घोषणांशिवाय जमायचे कसे?
नवी घोषणा आहे. ती एका जुन्याच घोषणेचे पुनरुज्जीवन आहे- ‘भारतमाता की जय’ या हिंदी भाषेतील घोषणेचा अर्थ आधीही माहीत होता. पण ही घोषणा रोज उठून कोणी द्यायची नसते आणि ती विनाकारण दिली तर लोकांना आश्चर्यच वाटेल, अशी स्थिती होती. भारतीय सेनादलांनी टायगर हिलवर ताबा परत मिळवला तेव्हा ही घोषणा योग्यच, परंतु असेही काही सार्वजनिक प्रसंग असतात की जेथे ही घोषणा अनाठायी तरी ठरणारच. उदाहरणार्थ, गुंतवणूकदारांची सभा संपवताना किंवा न्यायिक सुधारणांवरील व्याख्यानाअंती किंवा पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अखेरीस ही घोषणा कशी वाटेल यावर जरा विचार करून पाहा. त्या प्रसंगातील लोकांचा अचंबा वाचकांनाही येथे लक्षात आला असेल.
‘राष्ट्रवादाचा प्रकल्प’
हेही योग्यच, असे वाटत असल्यास जरा आणखी विचार करा. विशेषत: या घोषणेच्या पुनरुज्जीवनामागचा नवा हेतूही पाहा. मी येथे वाचकांना इशारा देऊ इच्छितो की, हा हेतू नवाच आहे : ‘जे या घोषणेचा उद्घोष करतील ते – आणि फक्त तेच – देशभक्त आणि जे ही घोषणा देणार नाहीत ते देशभक्त नसल्यामुळे, राष्ट्रविरोधीच’ या फसव्या युक्तिवादासाठी या घोषणेचा वापर करण्याचा हा हेतू आहे.
भाजपने राष्ट्रवाद हा जाणूनबुजून निवडणुकीचा मुद्दा बनविला आहे. यातून त्यांना निवडणुकीतील लाभ दिसत असले तरी हा लोकांमध्ये फूट पाडणारा मार्ग होय.
आम्ही भारताचे लोक – ‘वुई, दी पीपल ऑफ इंडिया’- यांनी, म्हणजे आपण साऱ्यांनी भारताचे एकसंध राज्य बनवून स्वत:ला राज्यघटना देवविली, म्हणजे स्वप्रदत्त केली. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने राज्याच्या एकसंधतेशी आणि राज्यघटनेशी निष्ठावंत असावे, ही अपेक्षा अगदी वैधच आहे. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहेच. मात्र सरकारला आपल्या नागरिकांकडून यापेक्षा जास्त काहीही अपेक्षा ठेवण्याचा हक्क आपण दिलेला नाही.
‘राष्ट्रवादाचा प्रकल्प’ सध्या सुरू आहे, तो वास्तवात लोकांवर बडगा उगारणारा आहे. लोकांनी आपापली ओळख विसरून एक इतिहास, एक वंश, एक संस्कृती आणि एक मूल्यव्यवस्था यांनी बनलेल्या कल्पित ‘राष्ट्रभावने’पुढे शरण जावे, यासाठी हा बडगा आहे आणि लोक या प्रकारे शरण आल्यावर लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, कोणते कपडे घालावेत आणि कोणते घालू नयेत, कोणावर प्रेम किंवा कोणाशी लग्न करावे आणि कोणाशी करू नये, हेदेखील ठरवण्याचे धारिष्टय़ या कल्पित राष्ट्रभावनेच्या स्वघोषित उद्धारकांमध्ये येणार आहे. कोण आपले आणि कोण परके किंवा कोणाला शिक्षा द्यायची, सारे हे उद्धारक सांगतील त्याप्रमाणे होण्याचा मार्गही मग मोकळा होऊ शकेल.
राष्ट्रवादाची ही भाजपप्रणीत व्याख्या आपण एकदा का मान्य केल्यावर, त्यातून पुढे असेही निष्कर्ष फार दूर नाहीत की, अमुक धर्म हा अन्य धर्मापेक्षा श्रेष्ठ, ही अमकी एक भाषा म्हणजेच साऱ्या राष्ट्राची राष्ट्रभाषा, अमक्याच संस्कृतीनुसार साऱ्या राष्ट्राने वागावे आणि अमुकच मूल्ये मानावीत.
राज्य आणि राष्ट्र
राष्ट्रवादी म्हणजे तेच की जे ‘भारतमाता की जय’ म्हणतात, असे ठरवण्याचा भाजपचा आटापिटा हा इतिहासाशी ठार फारकत घेणारा आहे. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये जवाहरलाल नेहरू लिहितात की, भारतमाता ही मूलत: या देशातील लोकांचे रूप आहे आणि तिचा ‘जय’ हा या देशातील लोकांचा ‘जय’ आहे. नेहरू सर्वसमावेशक आणि लोकशाहीवादी विचारांचे होते आणि त्यांनी आपल्याला ही तत्त्वे अंगीकारणाऱ्या राज्यघटनेकडे नेण्याचे काम केले. तोवरच्या इतिहासात विषमतांनी विभागला गेलेला भारतीय समाज सर्वसमावेशक आणि लोकशाहीवादी राज्यात आणून या देशातील प्रत्येकाला आपापला मान आणि आब राखून, आपापली अस्मिता न सोडता भारतीय म्हणून घडवणारा एक महत्त्वाचा प्रयोग म्हणजे आपली राज्यघटना, हे आपल्याला माहीतच आहे.
राज्य आणि राष्ट्र हे समानार्थी शब्द नाहीत. त्या भिन्न संकल्पना आहेत. ‘राज्य’ हे राज्यघटनेला व तिच्याद्वारे लोकशाही मार्गाने झालेल्या कायद्यांना मानणाऱ्या लोकांचा समूह असते, तर ‘राष्ट्र’ या संकल्पनेला विविध लोकांचा इतिहास, त्यांना करावे लागलेले संघर्ष आणि त्यांना आलेले अनुभव यांचे पैलू असतात. युनायटेड किंग्डम हे एक ‘राज्य’ आहे, पण त्यातील स्कॉट, आयरिश आणि वेल्श लोक हे स्वत:ला ‘इंग्लिश’ मानत नाहीत. बेल्जियममध्येही पूर्वापार दोन राष्ट्रीयत्वांचे साहचर्य आहे. ‘राष्ट्रीयत्व’ या विषयावर कम्युनिस्ट विचारधारेत झालेला विचार तर आणखीच निराळा आहे.
राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्रावरील प्रेम आणि राष्ट्राबद्दलचा आदर, अशी व्याख्या सरळसाधीच असते. हे प्रेम आणि हा आदर प्रसंगांनुसार अनेक घोषणांतून व्यक्त होऊ शकतो आणि याचीही अनेक उदाहरणे आपल्या इतिहासात आहेत. वंदे मातरम्, भारतमाता की जय, इन्किलाब झिंदाबाद, जय हिंद या साऱ्या घोषणा राष्ट्रवादी घोषणांची इतिहासदत्त उदाहरणे आहेत.
मात्र यापैकी अन्य घोषणांऐवजी एकच घोषणा निवडून फक्त ती घोषणा देणे म्हणजे देशनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची परीक्षा असे मानायचे, हा खटाटोप लोकांवर ताबा मिळवण्यासाठी चालविलेला आणि म्हणून संशयास्पद वाटतो. त्यामुळेच हा असा प्रयत्न नाकारणे रास्त ठरते.
फॅसिझमआधीची पायरी..
अतिरेकी राष्ट्रवाद हा जोडण्यापेक्षा तोडण्यासाठी वापरला जाणारा आणि फॅसिझमचेच एक रूप शोभेल असा ठरतो. मी हे का म्हणतो आहे, याचे कारण मुसोलिनीच्या (किंवा लेखक म्हणून त्याचेच नाव असणाऱ्या) ‘डॉक्ट्रिन ऑफ फॅसिझम’मधील एका उताऱ्यातून कळावे :
‘उदारमतवादाने व्यक्तिस्तोम माजवून राज्याला झिडकारून टाकले; तर फॅसिझमने राज्य हे व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा मूलस्रोत असते हे जाणून राज्याला हक्क दिले. फॅसिझम हा स्वातंत्र्यवादीच आहे.. आम्हांस सर्वोत्तम स्वातंत्र्य हवे आहे.. ते स्वातंत्र्य जे राज्यावर विलसते आणि जे राज्यातील व्यक्तीलाही लाभते.’
आपल्या राज्यघटनेला अनुस्यूत असलेल्या स्वातंत्र्य-संकल्पनेशी ही फॅसिस्ट संकल्पना बरोब्बर उलट आहे. शाळेत सर्व मुलांनी राष्ट्रगीत म्हणावे की नाही असा वाद आपल्या न्यायालयात गेला असता (ही मुले ‘येहोवाज विटनेस’ हे धर्ममत मानणारी होती) राष्ट्रगीत सुरू असताना त्यास मान देण्यासाठी उभे राहणे पुरेसे आहे आणि गीत म्हणण्यात सहभागी होणे आवश्यक मानता येणार नाही, असा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या संदर्भात महत्त्वाचा ठरतो, तो न्यायमूर्तीनी याकरिता नोंदविलेल्या काही मोलाच्या बाबींसाठी. उदाहरणार्थ : ‘‘आपली परंपरा सहिष्णुतेचे संस्कार करते. आपले तत्त्वज्ञान सहिष्णुतेचा प्रचार करते, आपली राज्यघटना सहिष्णुता आचरणात आणते. याचे भान आपण सोडू नये.’’
‘मी स्वत:च्या स्वातंत्र्याचा आदर करतो का?’ हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:स विचारून पाहावा. ‘भारतमाता की जय’ या घोषणेचा उद्घोष प्रसंगोपात्त करण्याचे स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते अभिमानाने करेन. मात्र तसे न करण्याचेही स्वातंत्र्य असते आणि ते मला आहे. मी राष्ट्रवादी आहे की मी राष्ट्रवादी नाही, हे मीच ठरवेन.. माझ्याबाबत अन्य कुणाला- अगदी राज्यालाही- तसे ठरवू देणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 2:54 am

Web Title: bjp attempt to define a nationalist as one who will say bharat mata ki jai is a gross distortion of history
टॅग P Chidambaram
Next Stories
1 आधार : उद्देश चांगले, मार्ग वाईट
2 वित्तीय आकडेवारीचे कोडे
3 शेतकरी बंधूंनो, ‘अच्छे दिन ’ येताहेत..
Just Now!
X