हृदयेंद्रच्या उद्गारांनी सर, बैग सर्वानाच जाणवलं, की खरंच अवांतर गप्पांत बराच वेळ गेलाय.. आयुष्यही असंच नकळत सरत असतं.. वेगानं सरणाऱ्या त्या क्षणांकडे आपलं लक्षच नसतं.. आपलं मन रमतं त्या गोष्टींत आपण नको इतके रमत जातो आणि वाहवतही जातो.. सर्व क्षमता, सर्व वेळ त्यातच जातो.. हेच सूत्र पकडत हृदयेंद्र बोलू लागला..
हृदयेंद्र – तुकाराम महाराजांचा एक अभंग गेल्या वेळी चर्चेच्या ओघात आला होता बघा.. त्यात ते म्हणतात- शरीर संबंधाचे नातें। भोरडय़ा बुडविती सेतातें।। संत कबीर यांचाही असाच एक दोहा आहे.. ‘आछे दिन पाछे गये, गुरु से किया न हेत। अब पछतावा क्या करै, चिडियाँ चुग गईं खेत।।’ म्हणजे ऐन उमेदीचे दिवस निघून गेले.. जेव्हा वेळ होता, शरीर धडधाकट होतं, सर्व क्षमता होत्या तेव्हा सद्गुरुंच्या सांगण्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्नच केला नाहीस, आता पश्चात्ताप करून काय उपयोग? चिमण्यांनी सर्व शेत खाऊन टाकलंय! विकार, वासना, ममता, आसक्ती, स्वार्थ अशा अनेक चिमण्यांनी.. तुकोबांच्या शब्दांत भोरडय़ांनी हे शेत फस्त केलंय!
ज्ञानेंद्र – बुवा आमच्या या हृदयेंद्रला कबीरांचे अनेक दोहे पाठ आहेत आणि तो गातोही लयीत..
बुवा – मग ऐकवा की..
हृदयेंद्र – (हसत) असे अचानक नाही आठवणार.. पण आपल्या या चर्चेला अनुरूप असे आठवून म्हणण्याचा प्रयत्न करतो.. (काही क्षण शांततेत जातात. मग सर्वाकडे नजर टाकत हृदयेंद्र गाऊ लागतो..) आज कहै मै काल्ह भजूँ, काल्ह कहै फिर काल्ह। आज काल्ह के करतही, औसर जासी चाल।। काल्ह करै सो आज करु, सबहि साज तेरे साथ। काल्ह काल्ह तू क्या करै, काल्ह काल के हाथ।।.. कबीरसाहेब सांगतात की माणूस सर्व उद्योग करील, पण परमात्म्याच्या भक्तीसाठी त्याला उसंत नाही. तो म्हणतो, आज वेळ नाही, उद्या मात्र नक्की वेळ काढतो! उद्याही पुन्हा उद्यावरच जातं.. हे आज-उद्या करता करता वेळ निघून जातो.. कबीर साहेब म्हणतात, उद्या-उद्या काय करतोस? उद्या तर काळाच्याच हातात आहे! जे उद्या करायचं ते आजच कर, कारण आज सर्व काही तुझ्या हातात आहे! पण तरी माणसाला जाग येत नाही.. जीवन किती क्षणभंगूर आहे, हे लक्षात येत नाही.. कबीर थोडा जीवना, माँडै बहुत मँडान। सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुलतान।। जीवन अगदी थोडं आहे, पण जो तो स्वप्नांचे इमले बांधण्यातच दंग आहे.. राजा असो की भिकारी, दोघंही आशेच्या दावणीला बांधले गेले आहेत आणि इच्छांच्या पूर्तीसाठी तळमळतच आहेत.. रात गँवाई सोइ करि, दिवस गँवायो खाय। हीरा जनम अनमोल था, कौडम्ी बदले जाय।। अज्ञानाची रात्र झोपेतच सरली, थोडं ज्ञान झालं तर त्याच ज्ञानाच्या जोरावर तो दिवसही भौतिक लालसेच्या पूर्तीसाठी धडपडण्यातच सरला.. लाखमोलाचा हा जन्म कवडीमोलानं वाया गेला.. आये है सो जायेंगे, राजा रंक फकिर। एक सिंघासन चढिम् चले, एक बाँधे जात जंज़्‍ाीर।। जन्माला आलेला प्रत्येकजण जाणारच, यात शंका नाही.. राजाही जाणार, रंकही जाणार, फकिरही जाणार.. फरक इतकाच की राजा आणि रंक हे आशेच्या बेडय़ात जखडूनच जाणार आणि फकिर हा आत्मतृप्तीच्या सिंहासनावर विराजमान होणार.. फकिराची ही वृत्तीच नव्हे आत्ता कबीरांचे जे दोहे गायले ना, त्यातला भावच सावता माळी महाराजांच्या ‘‘ऐकावे विठ्ठल धुरे। विनंती माझी हो सत्वरें।। करी संसाराची बोहरी। इतकुें मागतों श्रीहरी।। कष्ट करितां जन्म गेला। तुझा विसर पडला।। माळी सावता मागे संतान। देवा करी गा नि:संतान।।’’ या अभंगाच्या शब्दा-शब्दांत व्यक्त होत आहे.. मला नि:संतान कर, हे मागणं काय सोपं आहे?
बुवा – तुकाराम महाराजांचाही असाच एक अभंग आहे बरं का.. ते म्हणतात.. नको देऊं देवा पोटीं हे संतान। मायाजाळें जाण नाठवसी।। नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य। तो एक उद्वेग होय जीवा।। तुका म्हणे करीं फकिराचे परी। रात्रंदिवस हरि येईल वाचे।।
हृदयेंद्र – सगळ्या संतांचं हृदय कसं एकच असतं बघा!
ज्ञानेंद्र – पण जे सावतामाळी वारीला न जाता शेतातच विठूमाईला पहात होते आणि जे तुकोबा जोडुनिया धन उत्तम वेव्हारे, असं सांगत होते तेच असं मागणं का मागतात? किंवा खरंच ते असं मागणं मागतात का?
चैतन्य प्रेम