25 September 2020

News Flash

५९. आत-बाहेर

महर्षी स्वत:ला लुटू द्यायला बसले होते, हे अचलानंद दादांचं वाक्य योगेंद्रच्या मनाला भिडलं. तो हसून म्हणाला..

| March 26, 2015 12:07 pm

महर्षी स्वत:ला लुटू द्यायला बसले होते, हे अचलानंद दादांचं वाक्य योगेंद्रच्या मनाला भिडलं. तो हसून म्हणाला..
योगेंद्र –  महर्षीही म्हणालेच, बघू तरी यांनी चोरावं असं आपण काय जपून ठेवलंय ते तरी समजेल! पण खरंच हो, अनित्य आहे तेच चोरलं जातं, जे अनित्य आहे त्याचीच जपणूक होते.. जे नित्य उघडपणे, सहजपणे मिळतंय त्याची आवड नाही..
कर्मेद्र – वा! वा!! मग पोलिसांनीही ‘जे अनित्य आहे त्याच्या चोरीची तक्रार नोंदवली जाणार नाही’, अशी पाटी लावली तर तुम्हा आध्यात्मिक लोकांना चालेल का?
हृदयेंद्र – (हसत) मनानं अनित्यात न गुंतणं, ही आंतरिक धारणा असली पाहिजे, बाहेरून व्यवहारात जे योग्य आहे ते कराच की..
कर्मेद्र – हे आत-बाहेरचं लफडं ना जास्त डेंजरस आहे.. जर व्यवहाराला साजेसं तेच वागता, तर मग आतल्या धारणेला कोण काळं कुत्रं विचारतंय?
हृदयेंद्र – प्रसंग तोच असतो, पण ज्याची आंतरिक धारणा वेगळी आहे त्याचं वर्तन त्याच प्रसंगात अत्यंत निर्भय असतं.. माझी आंतरिक धारणाही जेव्हा मोहासक्त असते तेव्हा त्या प्रसंगातलं माझं बाह्य वर्तनही मोहासक्त आणि म्हणूनच अनेकदा मलाच मानसिकदृष्टय़ा खच्ची करणारं ठरतं..
कर्मेद्र – पण आत अगदी स्थिरचित्त आहात आणि वरकरणी भावनावेगानं आक्रंदत आहात, असं कधी शक्य तरी आहे का? आणि मुळात जे मनात आहे ते लपवणं हेच अध्यात्म आहे का?
हृदयेंद्र – इथे मनातलं लपवण्याचा भाग नाही. समाजात वावरणाऱ्याला सुख-दु:खाच्या प्रसंगांतही वावरावच लागतं. त्या प्रसंगाला साजेसं तो वागतो, पण त्या सुख-दु:खाची बाधा त्याच्या अंतरंगाला होत नाही..
योगेंद्र – मागे निसर्गदत्त महाराज यांचे सुपुत्र चित्तरंजन कांबळी यांची चैतन्य प्रेम यांनी घेतलेली मुलाखत वाचली होती.. त्यात चित्तरंजनजींनी एक प्रसंग सांगितलाय. महाराजांची पत्नी गेली तेव्हा ही भावंडं लहानच होती. चित्तरंजनजी म्हणाले : आई गेली तेव्हा बाबांनी (म्हणजे निसर्गदत्त महाराजांनी) आम्हाला बोलावलं आणि म्हणाले, ‘‘आई गेली आहे, पण आता रडून काय उपयोग? संध्याकाळी लोक जमतील तेव्हा थोडंसं रडा!’’
अचलदादा – ओहो..
योगेंद्र – खरं तर पुढेच आहे.. महाराजांचं तंबाखूचं दुकान होतं. ते दुकानाबाहेरच्या फळीवर बसले होते. त्यांना ओळखणारा एक माणूस तेवढय़ात आला आणि त्यानं काहीतरी तात्त्विक प्रश्न विचारला. महाराजांनीही त्यावर फार सखोल तात्त्विक चर्चा केली. चर्चा आटोपल्यावर तो निघाला तेव्हा महाराजांनी विचारलं, ‘‘संध्याकाळी काही काम आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ मग महाराज म्हणाले, ‘‘पत्नीचं सकाळीच निधन झालं आहे, संध्याकाळी जमलं तर अंत्यसंस्काराला या..’’ त्या माणसालाही आश्चर्याचा धक्काच बसला..
अचलदादा – ही असते खरी आंतरिक धारणा.. आंतरिक धारणा खरी कशी असली पाहिजे, याचा हा कठोर पाठच आहे. मग असा योगी चारचौघांसारखा धाय मोकलून रडला, तरी काय फरक पडणार आहे? आतून तर तो निश्चलच असेल ना!
हृदयेंद्र – गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातही नाही का? सकाळी कुणी तरी गेलं तिथे अगदी हमसून रडले आणि तिथून एका लग्न समारंभाला गेले तिथे अगदी प्रसन्नपणे वावरले..
अचलदादा – साईबाबांकडे मेधा नावाचा मुलगा होता. त्याचं कुणीच नव्हतं. तो गेला. ज्याचं कुणीच नसतं, तो गेल्यानं कोण कशाला रडेल! पण बाबाच एवढं हृदय पिळवटून रडले की लोकांनाही रडू आलं.. दुनियेच्या रडण्यामागेही ज्याचा-त्याचा स्वार्थच असतो, हेच या प्रसंगातून बाबांनी जाणवून दिलं.. त्यामुळे आपण अनेकदा दुसऱ्यासाठी रडतो ते स्वत:साठीच असतं!
ज्ञानेंद्र – कृष्णमूर्तीनीही म्हटलं आहे की, जवळचा माणूस गेल्यावर तुम्ही रडता ते रडणं त्याच्यासाठी नसतं तर आपल्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली, या दु:खातून असतं! आपला आधार गेला, याच भावनेतून आपण रडतो..
अचलदादा – तेव्हा कर्मेद्रजी, आत एक आणि बाहेर एक, असं आपलंच वागणं असतं, सत्पुरुषाचं नव्हे!
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2015 12:07 pm

Web Title: abhangdhara in out
Next Stories
1 ५८. सकृतांची जोडी – २
2 ५७. सुकृतांची जोडी – १
3 ५६. व्रत उद्यापन..
Just Now!
X