गेल्या आठ दशकांच्या प्रतीक्षेनंतर विम्बल्डनच्या मैदानाने ब्रिटिश विजेता पाहिला. या ऐतिहासिक घटनेचा आनंदोत्सव ब्रिटनमध्ये साजरा होत आहे. अँडी मरेच्या रूपाने ब्रिटिशांना त्यांची अस्मिता जागवेल असा चेहराच जणू मिळाला आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ातही स्थानिकतेचे महत्त्व अबाधित राहते याचेच हे द्योतक मानावे लागेल.
एखाद्या साध्या वाटणाऱ्या खेळातील विजयाचे महत्त्व काय याचे उत्तर जाणून घ्यावयाचे असल्यास सध्या ब्रिटनमधील आनंदोत्सवाचे विश्लेषण करावे लागेल. रविवारी विम्बल्डनच्या हिरवळीवर अँडी मरे याने सर्बियाच्या जोकोविच याचा सरळ सेटमध्ये पराभव करून जेव्हा इतिहास रचला तेव्हा सामान्य ब्रिटिशाची छाती अभिमानाने फुलून आली. यास अनेक कारणे आहेत. सामाजिक आणि आर्थिकदेखील. टेनिसच्या चार स्पर्धामधील विम्बल्डन ही अत्यंत मानाची समजली जाणारी स्पर्धा. अन्य तीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्समध्ये खेळल्या जातात. तिन्हींचे पृष्ठभाग वेगळे. तरीही यात सगळ्यात जास्त कौतुक होते ते विम्बल्डनचे. याचे मूळ ब्रिटन एके काळी महासत्ता होता त्यात असावे. राष्ट्रकुलातील सर्व देशांत विम्बल्डन अतोनात लोकप्रिय आहे आणि या स्पर्धेची जशी हवा होते तशी अन्य कोणत्याच टेनिस स्पर्धेची होत नाही. भारतासारख्या देशात तर त्याचे कोण कौतुक. एक तर अत्यंत शिष्ट असे ब्रिटिश अभिजन प्रेक्षक आणि त्यांची अदब याचेही नाही म्हटले तरी आपणास आकर्षण आहेच. खेरीज, सायलेन्स प्लीज असे पंचाने म्हणताच खेळाच्या मैदानावर वातावरणात भरून राहणाऱ्या शांततेचा तर आपणास भलताच हेवा. आपल्याकडील गोंधळ आणि बजबजपुरीच्या पाश्र्वभूमीवर इतके सारे सुरेख, शिस्तबद्ध आणि ठरल्याबरहुकूम होणारे सामने आपणास विशेष आकर्षक वाटतात ते नैसर्गिकच म्हणावयास हवे. परंतु इतक्या डौलदार सामन्यांचे आयोजन करणाऱ्या ब्रिटिश आयोजकांना या सामन्याबाबत एक शल्य होते. ते म्हणजे जवळपास गेल्या आठ दशकांत या मैदानाने एकही ब्रिटिश विजेता पाहिलेला नाही, हे. टेनिसविश्वात जगात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक बक्षीस देणारे सामने जो देश भरवतो त्या देशातून त्या सामन्यांचा मात्र एकही विजेता तयार होऊ नये, ही बाब तशी क्लेशदायीच. गावातील सर्वोत्तम पाळणाघराच्या यजमानास पालकत्वाने हुलकावणी द्यावी, तसेच हे. याअभावी ब्रिटिशांना एक प्रकारे अपमानास्पद वाटत असे. कारण एकेकाळी ब्रिटिश वसाहती असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने डझनाने विम्बल्डन विजेते घडवले. अमेरिकेत तर आंद्रे आगासी ते पीट सॅम्प्रास यांनी हे विजेतेपद जणू आपल्यासाठीच आहे, इतक्या वेळा ते जिंकले. विम्बल्डन अनेकांना आठवते ते जिमी कॉनर्स आणि जॉन मॅकेन्रो या कालपुरुषांच्या पराक्रमामुळे. ते दोघेही अमेरिकीच. या दोघांची सद्दी संपवणारा बियॉन बोर्ग हा तर युरोपातल्या टिकलीएवढय़ा स्वीडनचा. त्याच देशाने पुढे स्टीफन एडबर्गसारखा खेळाडू दिला आणि तोही अनेक वेळा विम्बल्डनचे विजेतेपद घेऊन गेला. युरोपात ज्या जर्मनीशी ब्रिटनचा सर्वच बाबतीत उभा दावा होता त्या जर्मनीच्या बोरीस बेकर याने मिसरूड फुटायच्या आत विम्बल्डनचे विजेतेपद खिशात घालण्याचा विक्रम केला. परंतु या सगळ्या काळात एकाही ब्रिटिश खेळाडूस या हिरवळीच्या मैदानावर विजय मिळवणे शक्य झाले नाही. या मैदानावर शेवटचा ब्रिटिश खेळाडू जिंकला तो १९३६ साली. त्या वेळी फ्रेड पेरी यांनी पटकावलेल्या विजेतेपदानंतर विम्बल्डनने ब्रिटिशांना कायमच हुलकावणी दिली. १९३६ साली फ्रेड पेरी यांनी हे विजेतेपद मिळवले तेव्हा ब्रिटन जगावर राज्य करीत होता आणि महाराणी एलिझाबेथ अवघी १० वर्षांची होती. दुसरे महायुद्ध अर्थातच अद्याप तीन वर्षे दूर होते आणि त्यामुळे ब्रिटिशांच्या महासत्तापदास कोणतेच आव्हान नव्हते. महायुद्धाच्या सहा वर्षांच्या काळात ही स्पर्धा खेळवली गेली नाही आणि ब्रिटनचे दु:ख हे की १९४६ साली जेव्हा ती पुन्हा झाली तेव्हा महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना ज्यांच्या मदतीस जावे लागले त्या शेजारच्या फ्रान्समधील योन पेत्रा याने विम्बल्डन काबीज केले. त्यानंतर सात वर्षांनी एलिझाबेथ राणीचे राज्यारोहण झाले आणि त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याला गळतीच लागली. एके काळच्या ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेले जवळपास १२ देश नव्याने तयार झाले आणि जवळपास तितक्याच देशांच्या ३९ खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली. इतके असतानाही आपणच कमनशिबी का असा प्रश्न ब्रिटिश क्रीडारसिकांना पडत असे. हे शल्य उराशी घेऊनच सामान्य ब्रिटिश क्रीडारसिक जगत होता. रविवारी अँडी मरे याच्या विजयामुळे ते तूर्त तरी दूर झाले.
जगातील घडामोडींकडे केवळ राजकीय, भौगोलिक वा आर्थिक नजरेनेच पाहणाऱ्यांनी हे असे का होते हे समजून घेणे गरजेचे आहे. कोणत्याही देशास वा भूप्रदेशास त्या प्रदेशाची ओळख सांगेल, अस्मिता जागवेल असा चेहरा हवा असतो. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना अशा चेहऱ्याने कायमच हुलकावणी दिली. फ्रान्सला जसा नेपोलियनचा, जर्मनीस रोमनांचा पराभव करणारा हर्मन वा पुढील काळातील बिस्मार्क ते गटेनबर्ग आदींचा नायकी चेहरा होता तसे ब्रिटनबाबत झाले नाही. ही चेहराशून्य अवस्था ब्रिटन जोपर्यंत जगावर राज्य करीत होता तोपर्यंत जाणवली नाही. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचे जसे महासत्तापद गेले तशी सामान्य ब्रिटिशास नायकाची उणीव जाणवू लागली. त्यातूनच मग अ‍ॅडमिरल नेल्सन यांच्या शौर्यकथा पुन्हा नव्याने चर्चिल्या जाऊ लागल्या आणि त्याचे पोवाडे पुन्हा नव्याने गायले जाऊ लागले. परंतु आधुनिक जगात युद्धनेतृत्व हे तितकेसे आकर्षक राहत नाही. ज्या काळात अर्थसत्ता ही लष्करी वा भौगोलिक सत्तेपेक्षा अधिक प्रभावी ठरते त्या काळात युद्धनेतृत्वापेक्षा सामान्य जनतेस अन्य क्षेत्रातील नेतृत्व अधिक महत्त्वाचे वाटते. हे नेतृत्व क्रीडा, तंत्रज्ञान, मनोरंजन अशा जगण्याच्या आधुनिक क्षेत्रांतून येणे अपेक्षित असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीनंतर जग जवळ येत असताना ते एकसारखेदेखील दिसू लागले आहे. आंतरखंडीय व्यवहार करणाऱ्या जगड्व्याळ कंपन्यांच्या हाती जगाची बाजारपेठ जवळपास गेल्यात जमा असल्याने स्थानिक वैशिष्टय़े लुप्त होऊ लागली आहेत. अशा वेळी आपली ओळख म्हणून जनतेस एखादा नायक लागतो. खेळ तसा नायक पुरवतात.
जागतिकीकरणाचा सरधोपट विचार करणारे या स्थानिक भावना वा प्रेरणांची दखल घेत नाहीत. ब्रिटनसारख्या आधुनिक देशालादेखील यंदा विम्बल्डन स्पर्धा सुरू झाल्यापासून मरे याचा उल्लेख ब्रिटिश मानबिंदू असा करण्याचा मोह आवरला नाही, यावरून ही स्थानिकतेची भावना किती तीव्र असते याची जाणीव व्हावी. ही भावना माणसाच्या मनात पार खोलपर्यंत असते आणि त्याचा संबंध थेट प्रांत वा मूळ गाव येथपर्यंत येऊन पोहोचतो. त्याचमुळे आता ब्रिटनमध्ये मरेच्या मुळाबद्दल अहमहमिकेने चर्चा झडू लागली आहे. मरे हा मूळचा ब्रिटिश नव्हे तर स्कॉटलंडचा असल्याने स्कॉटिश आहे असा दावा त्याच्या स्कॉट समर्थकांनी करण्यास सुरुवात केली असून त्यावरून पुन्हा एकदा प्रांतीयता उफाळून आली आहे. मरे याच्या विजेतेपदाचा क्षण अनुभवण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे हजर होते. परंतु मरे जेव्हा जिंकला तेव्हा त्यांच्या डोक्यावर ठळकपणे झेंडा फडकावला गेला तो ब्रिटनचा युनियन जॅक नव्हता. तर तो स्कॉटलंडचा निळा झेंडा होता. तेथे हजर असलेल्या काही उत्साही स्कॉटिशांनी हा उद्योग केला आणि त्यांनीच पुढे जाऊन अमेरिकी वर्तमानपत्रे मरेचे वर्णन ब्रिटिश खेळाडू असा करीत असल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला. विख्यात अभिनेते शॉन कॉनरी हेदेखील स्वत:चा उल्लेख ब्रिटिश असा करण्यापेक्षा स्कॉटिश असाच करणे पसंत करतात.
जागतिकीकरणाच्या रेटय़ात जग जवळ आल्याचा कितीही दावा होत असो. तो तितकासा खरा नाही. उलट या काळात स्थानिकतेचेच महत्त्व वाढत असून त्याचमुळे मरे हा ब्रिटिशांना नवा मेहबूब वाटू लागला आहे.