महाराष्ट्राला ज्या समाजवादी चळवळीची परंपरा आहे, ती चळवळ संभ्रमावस्थेत असल्याचेही वारंवार दिसले होते. अशा संभ्रमित चळवळीऐवजी समन्वयवाद आणि संवाद यांतून काम पुढे नेण्याचा सशक्त, डोळस मार्ग डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दाखविला. त्यांच्या हत्येनंतर मात्र, या समाजवादी चळवळीला मिळालेली दिशा दिसेनाशी होऊ नये आणि नेतृत्वातील पोकळीचाही प्रश्न सुटावा, याची काळजी कार्यकर्त्यांना घ्यावी लागणार आहे…
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निधनानंतर त्यांच्या चळवळीचे नंतर काय होणार, यापेक्षा त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या वैचारिक परंपरेचे भवितव्य काय असणार, हा प्रश्न अधिक तीव्र बनू शकणारा आहे. डॉ. दाभोलकरांमुळे बऱ्याच कालावधीनंतर समाजवादी विचारसरणीतील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कृतीचे आव्हान मिळाले होते. समाजवादी विचार म्हणजे काय, हे समजून न घेताही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात झोकून देणाऱ्यांची एक मोठी फळी महाराष्ट्रात निर्माण झाली, याचे कारण डॉ. दाभोलकरांसारखे समाजातील सर्व स्तरांत पोहोचू शकणारे व्यक्तिमत्त्व हे होते. चुंबकाप्रमाणे मागे धावणाऱ्या युवकांना सतत कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक असणारे गुण त्यांच्यापाशी होते. दाभोलकरांकडे नेमके हेच गुण होते. सतत नवे उपक्रम शोधून ते समाजात पोहोचवणे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृतीची जोड देणे हे काम त्यांना शक्य झाले. गेल्या तीन दशकांत समाजवादी विचारांना अशी कृतीची जोड देणारी चळवळ एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फोफावल्याचे महाराष्ट्राने पाहिले नाही. त्यामुळे दाभोलकरांच्या निधनानंतर चळवळीतील प्रतिभा एका अर्थाने मालवत जाण्याची शक्यता अधिक दिसते आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची ही चळवळ म्हणजे दाभोलकरांची मक्तेदारी नव्हती. परंतु त्यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण स्वभावाने त्यामध्ये युवकांना ओढण्यात यश मिळवले. विरोध करण्यासाठी मोठय़ांदा बोलण्याची गरज नसते, तर विचारातील स्पष्टता सहजपणे व्यक्त करण्याची हातोटी लागते, याचे भान त्यांच्यापाशी होते. विरोधकाशीही चर्चा करता येते, याचे भान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याने फारशी फाटाफूट न होता, ही चळवळ सुमारे दोन दशके महाराष्ट्रात कार्यरत राहू शकली. कुणी यंत्रमानव त्याच्या आड आला नाही, की कुणाचे संमोहन या चळवळीला मागे नेऊ शकले नाही. नेतृत्व मागून मिळत नाही, याचा एक दाखलाच दाभोलकरांच्या रूपाने सर्वासमोर आहे. यानंतरच्या काळात या चळवळीत कुणाकुणाचे नातेवाईक आणि शिष्यगण रक्ताच्या वा वैचारिक संबंधांच्या आधारे नेते म्हणून उदयाला यायला लागले, तरी डॉ. दाभोलकरांच्या वैचारिक मुशीत तयार झालेले हजारो कार्यकर्ते त्यांना स्वीकारत नाहीत, तोवर असे नेतृत्व ही चळवळ पुढे नेण्यास कितपत उपयोगी ठरतील, याबद्दल शंका निर्माण होणे शक्य आहे. राजकारणातील घराणेशाहीविरुद्ध ओरड होत असताना, अशा सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीतही अशी घराणेशाही येण्याबाबत अनेकांच्या मनात असलेली साशंकताही या चळवळीचे भवितव्य ठरवण्यात महत्त्वाची ठरणार आहे…सलगपणे एक हजार वर्षे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचलेली संतांची वैचारिक परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़ मानले जाते. या परंपरेत परस्परविरोधी भूमिकांना जसे स्थान होते, तसेच परस्परांबद्दलचा आदरभावही होता. नवविचारांना सामावून घेण्याची सौजन्यशीलता जशी होती, तशीच वैचारिक जडणघडण करताना कार्यकारणभावाची मीमांसा करण्याची क्षमताही होती. ही चळवळ केवळ विचारांच्या आधारे फोफावली नाही, हे गेल्या १०० वर्षांतील इतिहास पाहता लक्षात येते. विचार रुजवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची जोड आवश्यक असते. ती कृती करणाऱ्या प्रत्येकाला आपण काहीतरी केल्याचे समाधान त्यातून मिळणे आवश्यक असते. खेळांच्या रूपाने राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात भाग घेणे आणि अशा सामाजिक विषयांमधील प्रबोधनाच्या चळवळीत प्रत्यक्ष उभे राहणे या गोष्टी वेगळय़ा असतात, याची जाणीव वारंवार होत असूनही महाराष्ट्रातील समाजवादी विचारांची परंपरा काही करू शकत नव्हती. दाभोलकरांच्या रूपाने या चळवळीला पुढे नेऊ शकणारा कार्यकर्ता मिळणे हीच या परंपरेची खरी गरज होती. सेवा दलाचे काम अशा कृतीतून अधिक ठळकपणे सर्वदूर पोहोचू शकले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात प्राणपणाने लढलेल्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवृत्तीनंतर कोणताच कार्यक्रम हाताशी न राहिल्यासारखी स्थिती दाभोलकरांनी दूर केली. त्यालाही बराच काळ जावा लागला. कोणताही अभिनिवेश न बाळगता सर्व विचारांच्या लोकांशी संपर्क ठेवत आपला विचार पोहोचवत राहणे, हे काम वाटते तितके सोपे नसते. केवळ इमारती बांधून आणि नेत्यांची जयंती साजरी करून संघटना शाबूत राहत नाहीत, त्यासाठी विचार पुढे नेणारा सर्वमान्य आणि सहजशक्य होणारा कार्यक्रम मांडावा लागतो. अंधश्रद्धेने घातलेले थैमान हे धर्मविरोधी असल्याची भावना रुजवण्याचे काम डॉ. दाभोलकरांना करायचे होते. माणसाच्या सामाजिक, शारीरिक आणि लैंगिक शोषणाला कारणीभूत ठरणारी अंधश्रद्धा धर्माचे अधिष्ठान कसे ठेवू शकेल, याचे विवेचन त्यांना करायचे होते. जातपंचायतीसारखा लोकशाहीविरोधी प्रकार नष्ट होणे हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला जोड देणारा, काही प्रमाणात बळकटी देणारा कार्यक्रम आहे, असे त्यांना वाटत होते. म्हणूनच तर्कशास्त्राची कठोर कसोटी सोप्या पद्धतीने सामान्यांच्या मनात रुजवणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्यांच्या पश्चात ही चळवळ पुढे जाण्यासाठी असा र्सवकष विचार करू शकणारा, नवप्रतिभेची साद ओळखणारा आणि वैचारिक कसोटीवर खरा उतरणारा नेता हवा आहे. आपणच खरा नेता अशी स्पर्धा त्यांच्या निधनानंतर लगेचच सुरू होणे हे महाराष्ट्राच्या प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या वैचारिकतेचे मुळीच लक्षण नव्हे…समाजवादी चळवळीने महाराष्ट्रात खरे पाय रोवले, ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत. स्वातंत्र्य चळवळीत समाजवादी विचारांच्या नेत्यांनी अथक कष्ट घेतले होते, मात्र त्यांना सर्वार्थाने जनमान्यता मिळाली नव्हती. त्याआधीपासून महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या मुशीत तयार झालेल्या विचारवंतांच्या प्रबोधनामध्ये जागतिक वैचारिक परंपरेचे वारे फिरू लागल्यावर समाजवादी विचारसरणीला महाराष्ट्रात आणि देशातही पाठिंबा मिळू लागला. राम मनोहर लोहिया यांच्या रूपाने या विचारांचा चेहरा समोर आला आणि लोहियावादी म्हणवणाऱ्या तरुणांची फौजच निर्माण झाली. राष्ट्र सेवा दलासारख्या युवक संघटनेतून या विचारांना कृतीत कसे आणता येईल, याचा विचार सुरू झाला, तोपर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे वैचारिक प्रबोधन प्रत्यक्ष चळवळीच्या मार्गाने पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. साने गुरुजी, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, बॅ. नाथ पै, मधू दंडवते, मधू लिमये, ग. प्र. प्रधान, मृणाल गोरे, भाई वैद्य अशी एक साखळी महाराष्ट्रात तयार झाली. समाजवादी पक्ष राजकारणात उतरला, तरी त्याला प्रचंड यश मिळवता आले नाही. प्रजा समाजवादी पक्ष म्हणूनही वेगळी सुभेदारी यशस्वी ठरली नाही. तरीही महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत समाजवादी विचारवंतांनी महत्त्वाची भर घातली, हे नाकारता येणार नाही. ही भर प्रत्यक्ष कार्याच्या रूपाने समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचवण्यात नंतरच्या पिढीला फारसे यश आले नाही. ग्रामीण भागातील डॉ. बाबा आढाव यांची ‘एक गाव एक पाणवठा’सारखी चळवळ किंवा हमालांची संघटना महाराष्ट्राचे वैचारिक बळ वाढवत होती, याचे कारण त्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळय़ाच्या सत्याग्रहाची पाश्र्वभूमी त्याला होती. समाजवादी विचारांची ही चळवळ साहित्यात प्रतििबबित झाली, तशी जगण्याच्या तत्त्वज्ञानाशीही निगडित झाली. गेल्या ५०-६० वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधनाच्या कामात केवळ वैचारिक मंथन झाले. ज्यांना हे विचार मनोमन पटले, त्यांनी ते आपले जगण्याचे साधन बनवले. दाभोलकरांनी अधिक व्यापक रूपात ते विचार अधिक मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. समाजातील श्रद्धांनाच हात घालताना आवश्यक असणारे सामंजस्य त्यांच्यापाशी होते, त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगत त्यांनी ही चळवळ पुढे नेली. महाराष्ट्राच्या प्रबोधनातील त्यांचे कार्य पुढे जायला हवे, असे केवळ वाटून उपयोग नाही. त्यासाठी तेवढीच वैचारिक सक्षमता असणाऱ्या नव्या दाभोलकरांची आवश्यकता आहे…
केवळ पत्रके काढून वृत्तपत्रांतील स्तभांमध्ये अस्तित्व दाखवत जिवंत असल्याचा भास निर्माण करणारी विचारसरणी, अशी जी संभावना समाजवादी विचारांच्या वाटय़ाला आली होती, ती दूर करणे आणि सुरू असलेल्या विविध उपक्रमांशी अधिक लोकांना जोडून घेणे हे आव्हान अवघड म्हणावे असेच आहे. व्यक्तिगत पातळीवर हा विचार जगणारे अनेक जण महाराष्ट्रात आहेत. त्या विचारांना चळवळीचे रूप देणारे नेतृत्व मात्र नाही, अशी दाभोलकरांच्या निधनानंतरची अवस्था दूर करण्यासाठी वैचारिक सामंजस्य आणि स्वागतशील वैचारिक भूमिका असणाऱ्या सामूहिक नेतृत्वाचाही मार्ग अवलंबता येणे शक्य आहे.