‘एक लाट तोडी त्यांना..’ हे शनिवारचे संपादकीय (लोकसत्ता, २७ सप्टें.) वाचले. सेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांची ताटातूट ही नसíगक आणि ‘काळाची गरज’ असल्याचे संपादकीयातले प्रतिपादन पटणारे नाही.  १९ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले की ज्या पूर्वाश्रमीच्या जोडीदारांची एकूण संख्या १४५ च्या जादूई आकडय़ाच्या जवळपास घुटमळणारी असेल, त्यांना एकदम तथाकथित ‘जातीयवादी’ अथवा ‘भ्रष्ट’ पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याची उपरती होईल आणि जनतेचा कौल त्यांच्याविरोधात कसा आहे, हे तावातावाने ते सांगू लागतील. आणि या ‘तर्का’च्या (?) जोरावर ज्यांच्यापासून आज काडीमोड घेतला आहे, त्यांच्याशीच पुन्हा पाट मांडायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा ताटातूट ही ज्या काळाची गरज आहे, तो काळ केवळ आतापासून १९ ऑक्टोबपर्यंतचाच आहे (निदान एका ‘माजी’ जोडप्यासाठी तरी!), याची खूणगाठ जनतेने बांधायला हरकत नाही!
भाजप वगळता इतरांनी आपल्या कालपर्यंतच्या जोडीदारावर चालू केलेल्या टीकेला संपादकीयात अनसíगक म्हटले आहे. भाजपच्या टीका न करण्यामागे नंतर सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेचा टेकू लागेल की काय याची साधार भीती आहे. आणि शिवसेनेने भाजपवर केलेली टीका ही त्या पक्षाच्या आतापर्यंतच्या ‘आक्रस्ताळी आणि आक्रमक आणि म्हणूनच योग्य’ हे ठसविण्याच्या धोरणाशी सुसंगतच आहे, त्यामुळे त्यातही काही नवे नाही. राहता राहिला प्रश्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा. त्यांच्याकडे आजमितीस ना काही कमावण्यासारखे, ना काही गमावण्यासारखे. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या या दोघांना आता कोणत्याही घुसमटीशिवाय मोकळ्या आवाजात परस्परांची संभावना/ बोळवण करण्याची मर्यादित संधी मिळाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा ते उठवत आहेत, एवढेच.  १९९७ च्या सुमारास उत्तर प्रदेशात बसप आणि समाजवादी पक्षाने सत्तेच्या लोभापायी निवडणूकपश्चात युती करताना मुख्यमंत्रिपदाचा लोण्याचा गोळा सहा-सहा महिने वाटून घेण्याचा करार केला होता. अर्थात त्याचे पुढे तीन-तेरा वाजले हे सांगायला नकोच. पण तसल्याच कुठल्या तरी सत्तालोलुप ‘अभिनव’ संधीचा प्रयोग महाराष्ट्रात यंदा होणार, अशीच चिन्हे आहेत.
 – शलाका शशिकांत मोरये, विलेपाल्रे (पू.), मुंबई

आंतरपॅथी संशोधनाच्या मर्यादा ज्ञात असणे महत्त्वाचे
‘आंतरपॅथी संशोधन करायचे.. पण कोणी?’ हा  डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा लेख (लोकसत्ता, २३ सप्टेंबर) वाचला. ‘खरी गरज आहे ती आंतरपॅथी संशोधनाची’ हे संदिग्ध आहे.  एका उदाहरणावरून माझा मुद्दा स्पष्ट करतो. समजा एखाद्या बुवाने सांगितले की, ‘अँपिसिलिनची पूड (=भस्म) दिवसातून तीन वेळा कपाळाला लावा म्हणजे निवडणूक जिंकाल’, तर ‘अँपिसिलिन’ या द्रव्याचा वापर झाला केवळ म्हणून ती ‘अॅलोपॅथी’ होत नाही. वापरण्यात आलेल्या रसायनावरून नव्हे तर रोग उद्भवण्याची जी कारणमीमांसा केली जाते त्यावरून उपचारपद्धती ठरविली जाते.
‘अॅलोपॅथीला राजाश्रय आहे’ या विधानातील अॅलोपॅथी या प्रचलित नावाचा वापरच चुकीचा आहे. ताप आल्यावर (बिघाडाच्या कारणांची मीमांसा न करता) गार पाणी ओतणे ही समजा ‘अॅलोपॅथी’ (विरुद्ध उपचार करणे) होईल. ‘राजाश्रय’ असलेली उपचारपद्धती ही प्रत्यक्षात आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) आहे. स्थूल पातळीवरील किंवा सूक्ष्म पातळीवर शारीरिक बिघाड, किंवा रसायनांच्या पातळीवरील (गुणात्मक/ संख्यात्मक) बदल किंवा विद्युतभारातील/ विद्युतवहनातील बदल शास्त्रशुद्ध पद्धतींनी तपासून ते पूर्ववत आणण्याचे/ सुधारण्याचे/ काबूत ठेवण्याचे इत्यादी प्रयत्न या उपचारपद्धतीत होतात. अॅलोपॅथीत बिघाडाला (आंधळेपणाने) विरोध होतो. याउलट आधुनिक वैदक पद्धतीत बिघाडांची शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार होतात.
फॉक्स ग्लोव्ह किंवा सदाफुली किंवा सर्पगंधा (रावलफिया सर्पेटिना), (किंवा कोरफड, तुळस, कडुिनब इत्यादी) यापासून तयार केलेली रसायने वरीलप्रमाणेच्या शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार यासाठी वापरणे आधुनिक वैद्यक (मॉडर्न मेडिसिन) पद्धतीच असते. कफ-पित्त-वात यांचे ‘परीक्षानळी’त मोजता येणारे रासायनिक/ पदार्थविज्ञानशास्त्रीय गुणधर्म कोणते? त्यांच्या गुणात्मक पातळ्या नेमक्या कोणत्या? त्या कशा निश्चित करावयाच्या? इत्यादी मानदंड निश्चित झाल्याशिवाय कफ-पित्त-वात असमतोल शोधणे आणि काटेकोर शास्त्रीय पद्धतीने शारीरिक- रासायनिक- विद्युत असमतोल शोधणे यात आंतरपॅथी संशोधन कसे शक्य आहे? ते स्पष्ट नाही. कोणत्याही प्रकारच्या उपचारांमुळे, मग उदाहरणार्थ- अंगारा लावणे असो किंवा कोंबडे कापणे असो किंवा अलख-निरंजन असा उद्घोष असो, शारीरिक- रासायनिक- विद्युत असमतोल सुधारू शकेल असे सुचविणारा प्रथमदर्शनी पुरावा कोणी मांडला तर त्या उपचारांबाबत आधुनिक वैद्यकशास्त्रात संशोधन शक्य आहे. संभाव्यतेची शक्यता दर्शविणाऱ्या कोणत्याही विषयावरील संशोधन विज्ञानाला वज्र्य नाही आणि असे संशोधन आंतरपॅथी नसून आधुनिक वैद्यकशास्त्रच असेल.  ‘आयुर्वेद-होमिओपॅथी कोणत्या रोगांमध्ये निरुपयोगी आहेत?’ किंबहुना कोणत्या उपचारपद्धती अधिक प्रभावी/ टिकाऊ आहेत? याचे संशोधन संयुक्तपणेकरता येईल. मात्र ज्ञात जोखीम (कॅल्क्युलेटेड रिस्क) उचलण्यास स्वेच्छेने तयार असलेले रुग्ण तयार होणे आवश्यक आहे. आंतरपॅथी संशोधनाच्या मर्यादा ज्ञात असणे महत्त्वाचे आहे. ‘आयुर्वेद व होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आधुनिक संशोधनाची भाषा बोलता येत नाही’ ही स्थिती वाईटच आहे.
आजार होण्याच्या कारणमीमांसेबाबत आणि उपचारांच्या पद्धतीबाबत आधुनिक वैद्यकशात्रात अगदी मूलभूत बदलही झाले आहेत. तसे बदल किंवा ज्ञात गृहीतके योग्य आहेत किंवा नाही, याची तपासणी आयुर्वेद व होमिओपॅथी यात झालेली दिसत नाही.
-राजीव जोशी, पुणे</strong>

वचक बसेल अशी शिक्षा हवी
जयललिता यांनी वर्ष १९९१ मध्ये तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ होण्यापूर्वी तीन कोटी रुपये संपत्ती असल्याचे घोषित केले होते. सत्ताकाळात त्यांनी महिन्याला केवळ एक रुपया मानधन घेतले. मात्र पाच वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा त्यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने छापा घातला, तेव्हा त्यांच्याकडे ६५ कोटी ८६ लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती असल्याचे उघड झाले. त्यामध्ये २८ किलोग्रॅम सोने, ८९६ किलोग्रॅम चांदी, १० हजारांहून अधिक साडय़ा, ३२ कंपन्यांत भागीदारी, अनेक ठिकाणी जमीन, १०० हून अधिक बँक खाती त्यांच्या नावे असल्याचे उघड झाले होते. तब्बल १८ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. त्यात जयललिता यांना केवळ चार वर्षांची शिक्षा झाली आहे. भ्रष्टाचारातील गुन्हेगारांना वचक बसेल, अशी शिक्षा वेळेच्या मर्यादेत त्यांना मिळायला हवी, तरच असे प्रकार कमी होतील.
तसेच कोणत्याही नेत्याला शिक्षा झाली की त्यांची प्रकृती लगेच बिघडते. बीपी वाढला, छातीत कळ आली अशी तक्रार केली की लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. जयललिता यांनीही तेच केले. हेही तात्काळ बंद झाले पाहिजे.
 – आत्माराम जोशी

हिंदुत्वाचा उद्धार नको!
शिवसेनेच्या  शनिवारच्या पहिल्या जाहीर सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याबद्दल भाजपला िहदुत्वाचा शत्रू म्हटले आहे.   उद्धव ठाकरे यांनी हे लक्षात घ्यावे की, भाजपची पितृ संघटना अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना िहदूंच्या संघटनेसाठी झाली आहे आणि तीदेखील िहदूंच्या मतांची विभागणी होऊ नये या कारणासाठी नाही तर खऱ्या अर्थाने िहदूंचे संघटन व्हावे म्हणून.  शिवसेनेने स्वीकारलेले िहदुत्व मतांची विभागणी टाळण्यासाठी आणि फक्त एवढय़ाच उद्देशासाठी आहे. त्यामुळे सेनेने राजकीय भांडणात िहदुत्वाचा उद्धार करू नये आणि इतकाच िहदुत्वाचा विचार होता तर गेली २५ वर्षे सतत पराभूत होत असलेल्या जागा िहदुत्वासाठी का सोडल्या नाहीत, याचे उत्तर जनतेला द्यावे?
– उमेश मुंडले, वसई

‘लोकसत्ता दुर्गा २०१४’ या उपक्रमामुळे विचार पानात अपरिहार्य बदल झाले असून ते दसऱ्यापर्यंत लागू राहतील. यामुळे ‘धूळपेर’ हे आसाराम लोमटे यांचे सदर आजच्या अंकात नाही.