News Flash

बालिश बहु बडबडणे..!

देशातील दहशतवादाला कोणत्याही रंगात रंगवणे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सेक्युलर संस्कृतीत बसते काय? स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ काँग्रेसचीच सत्ता असतानाही हिंदू दहशतवादी होत असतील, तर

| January 22, 2013 12:04 pm

देशातील दहशतवादाला कोणत्याही रंगात रंगवणे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सेक्युलर संस्कृतीत बसते काय? स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ काँग्रेसचीच सत्ता असतानाही हिंदू दहशतवादी होत असतील, तर त्याबाबतच्या दोषाचा काही भाग काँग्रेसला घेऊ देण्यास शिंदे यांची तयारी आहे काय?

देशाचे गृहमंत्रिपद सांभाळणे आणि पक्ष संघटनेत श्रेष्ठींचे भाट असणे यात मूलभूत फरक आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून तो नजरेआड झाला असे मानण्यास जागा आहे. नपेक्षा ते जे काही बोलले ते बोलले नसते आणि बेताल वक्तव्याबाबत दिग्विजय सिंह यांच्याशी स्पर्धेत उतरले नसते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे देशात भगव्या वा हिंदू दहशतवादास उत्तेजन देत आहेत, असे शिंदे यांचे म्हणणे. याआधी माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम आणि काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी अशा अर्थाची विधाने केली होती. गृहमंत्र्यांचा रोख हा २००७ साली झालेल्या समझौता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोटाकडे आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात धावणाऱ्या या रेल्वेगाडीत त्या वर्षी झालेल्या बॉम्बस्फोटात ६८ जण दगावले. तेव्हापासून या बॉम्बस्फोटाच्या चौकशीबाबत काही ना काही वाद निर्माण झाला आहे. सुरुवातीला या बॉम्बस्फोटातील जखमींना भारताने अमानुष वागणूक दिल्याचा आरोप झाला. तो अर्थातच भारताने फेटाळला. त्यानंतर या बॉम्बस्फोटामागे भगवा दहशतवाद असल्याचे विधान माजी गृहमंत्री चिदम्बरम यांनी केले. या प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक झाल्यानंतर हा भगवा दहशतवाद सरकारला आढळला. असीमानंद यांच्या कथित जबानीतील निवडक माहिती प्रसारमाध्यमांना पुरविली गेली आणि त्यातून या प्रकरणास सुरुवात झाली. या असीमानंद महाराजांनी समझौता बॉम्बस्फोटात आपला हात असल्याची कबुली दिल्याचे या माहितीवरून उघड झाले, परंतु या प्रकरणी सरकार पुढे काहीच करू शकले नाही आणि असीमानंद यांना जामीन मिळाला. तो मिळाल्यावर आपणावर सरकारतर्फे कबुलीसाठी दबाव आणला असल्याचे या स्वामींनी जाहीर केल्याने सरकार अडचणीत आले. जवळपास ८०० पानांचे आरोपपत्र या प्रकरणी सरकारतर्फे न्यायालयात सादर करण्यात आले आहे, परंतु त्यात कोठेही हा भगवा दहशतवाद यामागे आहे असे सरकारतर्फे  नमूद करण्यात आलेले नाही. परिणामी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेस असीमानंद वा अन्यांचा कोणताही छळ केला जाऊ नये, असा आदेश दिला. असीमानंद आणि मंडळींनी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे काँग्रेसशी लागेबांधे असल्याने अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असे प्रतिआरोप न्यायालयात केले आणि न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली. याच काळात अमेरिकी सरकारने मात्र समझौता बॉम्बस्फोटात लष्कर-ए-तय्यबाचा हात असल्याचे जाहीर केले आणि या संघटनेचा अरिफ कास्मानी यास त्यासाठी थेट जबाबदार धरले. त्याच्या हालचालीवर अमेरिकेने बंदी आणली. तेव्हा यातून नमूद होते ते इतकेच की, हिंदू वा भगवा दहशतवाद हा समझौता एक्स्प्रेस गाडीतील बॉम्बस्फोटामागे असलाच तर ते सिद्ध करण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. पुढे गृहमंत्री पी. चिदम्बरम यांची अर्थमंत्रिपदी बढती झाली आणि शिंदे गृहमंत्री बनले. वास्तविक या प्रकरणी शिंदे यांनी नवीन काही सांगितले असते तर ते त्यांच्या पदोन्नतीस साजेसे झाले असते. हवेत बोलायचे आणि टीका झाल्यावर विषयांतर करायचे हे गृहमंत्र्याने करणे बरे नाही. या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात आहे अशी माहिती गृहमंत्री या नात्याने शिंदे यांच्याकडे असेल तर ती त्यांनी जाहीर करावी, न्यायालयात सादर करावी आणि तेही करायचे नसेल तर त्या माहितीच्या आधारे कारवाई करावी. परंतु करायचे काहीच नाही आणि नुसता धुरळा उडवायचा हे राजकारण झाले. त्यासाठी दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर अशी रिकामटेकडय़ांची भरभक्कम फौज काँग्रेसकडे आहे. शिंदे यांनी ही जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्या या विधानावर रा. स्व. संघ वा परिवार यांना काय म्हणायचे आहे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु शिंदे जे काही बोलले त्यावरून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे शिंदे यांनी आधी द्यावीत. परिवार वा भाजप हे भगव्या दहशतवादामागे आहेत, हे शिंदे यांचे म्हणणे वादासाठी समजा खरे मानले तर त्या विधानाचा व्यत्यास असा की पाकिस्तान, लष्कर-ए-तय्यबा यांच्याकडून जे काही सुरू आहे तो हिरवा दहशतवाद आहे असे शिंदे यांना म्हणायचे आहे. ते खरे असेल तर दहशतवादास हिरवा रंग देण्याचे धैर्य शिंदे यांच्यामध्ये आहे काय?  दहशतवादास असे रंगात रंगवणे हे शिंदे यांच्या सेक्युलर संस्कृतीत बसते काय?  समजा ते बसत असेल तर ते तामिळ वाघांच्या दहशतवादास कोणत्या रंगात रंगवणार?  हे तामिळीदेखील हिंदूच होते. म्हणून मग त्यांचे काय करणार शिंदे? या तामिळी दहशतवाद्यांना.. म्हणजे एका अर्थाने हिंदू दहशतवाद्यांना.. फोफावण्यास आपले नेते राजीव गांधी यांनीच अप्रत्यक्ष मदत केली होती, हे सांगण्याचे धैर्य शिंदे दाखवणार का? याच दहशतवादाने अखेर राजीव गांधी यांचा बळी घेतला आणि तो घेणाऱ्यांविषयी.. म्हणजेच हिंदू दहशतवाद्यांविषयी.. सहानुभूती असणाऱ्यांची मदत क्षुद्र सत्ताकारणासाठी काँग्रेसला घ्यावी लागली. तेव्हा त्या रंगाच्या कथित दहशतवादाचे शिंतोडे काँग्रेसच्या अंगावरही उडले हे शिंदे यांना माहीत नाही काय? हे झाले तामीळ दहशतवादाबाबत. शीख दहशवादासाठी गृहमंत्री शिंदे यांच्याकडे कोणता रंग आहे? आपल्याशी लहानपणी खेळणारे इंदिरा गांधी यांचे दोन शीख सुरक्षारक्षक हेच त्यांचे मारेकरी बनले, ते पाहून आपणास धक्का बसला, असे डोळ्यांत पाणी आणत राहुल गांधी यांनी या अधिवेशनात सांगितले आणि हळव्या काँग्रेसजनांना भावनेचे भरते आले. परंतु या शीख दहशतवादाच्या मुळाशी इंदिरा गांधी यांचेच साहसवादी राजकारण होते आणि ज्याचा जयजयकार करीत मारेकऱ्यांनी श्रीमती गांधी यांना गोळ्या घातल्या तो जर्नेलसिंग भिंद्रनवाले ही त्यांचीच निर्मिती होती, हे चि. राहुल यांस गृहमंत्री शिंदे यांनी सांगितले काय? भिंद्रनवाले हा पिवळा दहशतवाद होता असे म्हणण्याची हिंमत गृहमंत्र्यांत आहे काय? इंदिरा हत्येनंतरच्या दंगलींचे, शिखांच्या हत्येचे, एक प्रकारे समर्थनच राजीव गांधी यांनी केले होते. तोही एक प्रकारे दहशतवादच, सरकारी असा. तेव्हा त्यासाठीही एखाद्या रंगाची तरतूद गृहमंत्र्यांनी केली असेलच. या सगळ्याच्या पलीकडे असा एक मुद्दा सर्व चर्चेस पुरून उरतो. तो असा की, स्वातंत्र्यानंतर देशात दोन तृतीयांशापेक्षा अधिक वर्षे काँग्रेसचीच सत्ता आहे. तेव्हा या काळात देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंवर दहशतवादी व्हावयाची वेळ आली असल्यास त्याबाबतच्या दोषाचा काही भाग तरी काँग्रेसला घ्याव्याच लागेल. त्यास शिंदे यांची तयारी आहे काय? चांगल्याचे श्रेय गांधी कुटुंबीयांना द्यायचे आणि वाईटाचा दोष मात्र विरोधकांना हे किती काळ करीत राहणार?
वस्तुस्थिती अशी आहे की, पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर राहावी यासाठी आणि सर्व व्रतवैकल्ये, पूजाअर्चा करून, सत्यसाईबाबांचे आशीर्वाद घेऊन वर पुरोगाम्यांच्या वर्तुळात सहजपणाने मिरवता यावे यासाठी काही ना काही बालिश बहु बडबडण्याची गरज अनेक राजकारण्यांना वाटत असते. त्यात आपणही आहोत याची जाणीव शिंदे यांनी या वक्तव्याने करून दिली इतकेच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:04 pm

Web Title: artical on sushilkumar shinde comments on bjp and rss
Next Stories
1 गांधी आडवा येतो..!
2 संगीताच्या बाजारी..
3 झोपी गेलेला जागा..
Just Now!
X