News Flash

हे तर कोत्तापल्लेंवरील निराधार आरोप!

‘बाबुराव हरवले आहेत..!’ हा अग्रलेख (१२ जाने.) वाचला. ‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’ असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात त्याच

| January 15, 2013 12:11 pm

‘बाबुराव हरवले आहेत..!’  हा अग्रलेख (१२ जाने.) वाचला. ‘जगातले टिकून राहिलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते’ असे अध्यक्षीय भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात त्याच व्यवस्थेचा भाग होऊन जगायचे आणि आपले साहित्य बेतायचे’, असे त्यात म्हटले आहे. हा कोत्तापल्ले यांच्यावरील गंभीर आरोप आहे.
कोत्तापल्ले यांचे साहित्य व्यवस्थावादी आहे, असे म्हणण्याआधी किमान त्यांच्या साहित्याचा संदर्भ देऊन पटवून तरी द्यायचे! अर्थात ‘बाबुराव हरवले आहेत’ ही कविताही व्यवस्थेने नाकारलेल्या परिघावरच्या माणसाविषयी भाष्य करते. तेव्हा कोत्तापल्ले यांचे साहित्य व्यवस्थेचा भाग होण्याकडे लक्ष ठेवून बेतलेले कोणत्या आधाराने  ठरवले जाते?
व्यवस्थेशी पुकारला जाणारा एल्गार हा व्यवस्थेबाहेर राहून केला जातो, तसा तो व्यवस्थेत शिरूनही करता येतो. सदर लेखकाच्या मते तो व्यवस्थेबाहेर राहूनच करावा, असे बंधन नसते आणि व्यवस्थेतील संरचनात्मक समस्यांचा सामना करत कोत्तापल्ले यांनी जे योगदान मराठी साहित्याला दिलेले आहे ते महत्त्वाचे आहे.

मराठीचे भले नेमके कशात?
चिपळूणच्या साहित्य संमेलनावरील राजकारण्यांचा प्रभाव अभूतपूर्वच म्हणावयास हवा. हल्ली स्वागताध्यक्षांचे भाषण अध्यक्ष आणि दुसऱ्या वक्त्यांपेक्षाही अधिक बाजी मारून जाते. चिपळूणला तसेच झाले. पवारांनी आशियातील एका मासिकात देशातील इतर प्रादेशिक भाषांतील साहित्य दिसते. मग मराठी का नाही? ज्ञानपीठ आपल्याला का मिळत नाही? मराठी साहित्यिक जागतिक पातळीवर कमी का पडतात? असे अवघड प्रश्नही आपल्या भाषणातून विचारले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर राजकारण्यांनी नुसती संमेलनेच भरवू नयेत, तर आता लेखणीही हातात घ्यावी, असाही घाव जमलेल्या साहित्यिकांच्या वर्मी घातला.  
या पाश्र्वभूमीवर १२ जाने.च्या ‘लोकसत्ता’मधील ‘बाबुराव हरवले आहेत..’ हा अग्रलेख सडेतोड आणि रोखठोक वाटला. संमेलनातून खरेखुरे साहित्यिक हरवले आहेत, हेच सत्य शेवटी उरते. मग भालचंद्र नेमाडे म्हणतात, ते काय चूक?
अफाट खर्चाची ही संमेलने बंद करावीत आणि हाच निधी, गावोगावची ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी वापरावा.  उत्तम साहित्य प्रसवणाऱ्या लेखकांना हवे तर अनुदान द्यावे. आणि नेमाडे म्हणतात तसे, लिहिणे, वाचणे, पुस्तके सर्वाना मिळणे, अधिकात अधिक मराठी पुस्तके प्रकाशित होणे, ती लोकांनी वाचणे, हाच खरा साहित्याचा प्रसार होय, यात काय शंका?
साहित्य संमेलनातून असा कुठला प्रकार होत नाही, हेच खरे.
-अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर, लातूर.

बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद.. काळाची गरज
‘शिववधर्माचा अंतिम थांबा बौद्ध धम्मातच!’ ही बातमी (लोकसत्ता, १४ जाने.) वाचली. धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हितकारक व अहितकारक गोष्टी लक्षात घेता सध्याच्या युगात मानवजातीला कुठल्याही प्रचलित वा नव्या धर्माची गरज नसून बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादाची गरज आहे असे मला वाटते.
बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादात प्रत्येक मनुष्याने विवेचक बुद्धी व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून त्याचा वापर करणे व त्या आधारावर कुठल्याही परिस्थितींत निवड करण्याच्या व निवड बदलण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क बजावणे, तसेच इतरांचा हा हक्क मान्य करणे, या गोष्टी अभिप्रेत आहेत.
कुठलाही मनुष्य जन्मापासून बुद्धिनिष्ठ असणे शक्य नाही. त्याला मार्गदर्शन करून व्यक्तिस्वातंत्र्यासाठी सक्षम बनवावे लागेल. हे काम ‘सज्ञान’ बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी इतरांप्रति आपलं कर्तव्य म्हणून करतील व असे करताना त्यांचे उद्दिष्ट इतरांना वैचारिक दृष्टय़ा स्वतंत्र करणं हे असेल, आपल्या वर्चस्वाखाली ठेवणे नसेल. अशा प्रशिक्षणांतून तयार झालेला बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी आपल्या अज्ञानकाळांत आधार देऊन मार्गदर्शन करणाऱ्या व सक्षम बनविणाऱ्या ज्येष्ठ ‘सज्ञान’ व्यक्तींशी, आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी न देता, कृतज्ञ राहील नि परतफेड म्हणून इतर ‘अज्ञान’ व्यक्तींना निस्वार्थीपणे मदत करून सक्षम बनवील.
बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादांत प्रत्येक मनुष्य वैचारिक दृष्टय़ा स्वतंत्र असल्याने कोणत्याही प्रकारे ठराविक व्यक्तींचा कायम टिकणारा एकविचारी गट तयार होणार नाही. पण ‘अज्ञान’काळात मार्गदर्शन करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व इतरांप्रति असलेली कर्तव्यभावना या गोष्टी सर्वानाच एकत्र ठेवतील. त्यामुळे समाजहिताची कामे करण्यास त्यांचे त्या त्या कार्यासाठी तात्पुरते गट निर्माण होऊ शकतील. सर्वच बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी झाले तर शासनाचं कार्यही या पद्धतीने करता येईल.
बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादानुसार ‘या जगात देव, ईश्वर, परमेश्वर, अशी कुठलीही बाह्य शक्ति अस्तित्वांत नाही पण प्रत्येक मनुष्यात अमर्याद सुप्त सामथ्र्य आहे. प्रयत्नवादाची कास धरून त्याचा अनुभव प्रत्येक मनुष्याला आपल्या आयुष्यांत घेणं शक्य आहे. ज्यांना आजपर्यंत देव, देवदूत किंवा परमेश्वरी अवतार समजलं गेलं आहे त्या मनुष्यांनी स्वतच्या सुप्त सामर्थ्यांचा इतरांपेक्षा ज्यास्त अनुभव घेतला होता इतकंच.’
बुद्धिनिष्ठ व्यक्तिवादी मनुष्य शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्टय़ा जास्तीत जास्त सक्षम होण्याचा प्रयत्न करील व इतरांनाही त्याबाबतींत मदत करील. त्यामुळे तो एकटा असूनही वेळ पडल्यास अस्तित्वात असलेल्या गटांनाही तोंड देऊ शकेल.
सध्याच्या परिस्थितींत संख्याबळाच्या जोरावरच सत्ता मिळविता येते. त्यामुळे नजीकच्या भविष्यात बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद्यांचे सरकार येणे अशक्य दिसते. पण सत्तेवर कोणीही असलं तरी बुद्धिनिष्ठ व्यक्तिवाद्यांना काही फरक पडणार नाही, शिवाय सत्तेपुढे शहाणपण नाही ही म्हण प्रचलित असली तरी शहाणपणापुढे सत्ता नमल्याची उदाहरणेही इतिहासात आहेत.
शरद कोर्डे, वृंदावन, ठाणे.

खार यांनी उत्तर द्यावे
पाकिस्तानी सन्याने भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करून दोन भारतीय जवानांची हत्या केली आणि नंतर त्यांच्या मृतदेहांची विटंबना केली हे अतिशय अमानवी कृत्य आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दाखल घ्यावी आणि केवळ चच्रेपुरती ती मर्यादित ठेवू नये.
माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या इस्लामाबाद भेटीच्या वेळी पाक परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी- खार या ‘जुन्या गोष्टी विसरून नव्याने सुरुवात’ करायच्या गोष्टी बोलत होत्या. आता ‘मेंढर’च्या घटनेसंदर्भात पाकच्या मनात अशी कोणती द्वेषभावना होती याचे उत्तर खार मॅडमनी द्यायला हवे.
त्याऐवजी सदर घटनेची तिसऱ्या पक्षाकडून चौकशी करण्यात यावी असे वक्तव्य खार यांनी केले, हे आश्चर्यजनक आहे. काही दिवसांपूर्वीच रेहमान मलिक यांनी भारत भेटीदरम्यान काय ‘मुक्ताफळे’ उधळली होती ते भारतीय जनता अजूनही विसरलेली नाही. या सर्वाचा एकच अर्थ निघतो तो हा की, पाककडून कुठलेही निर्घृण कृत्य करण्यात आले तरी पाक ते अजिबात मान्य करीत नाही.
पाकिस्तानची ही खोड लक्षात घेऊनच सरकार पाकविरोधात गंभीर पावले उचलेल अशी आपण अशा करू या. मागील ६५ वर्षांचा इतिहास माहीत असूनही केंद्र सरकार पाककडून मत्रीची वेडी अपेक्षा कशी काय करू शकते?
भारती गड्डम, पुणे   

सी.डीं.चे स्मारक ठाण्यात आहेच..
सी.डी. देशमुखांच्या स्मारकाबद्दल डॉ. श्रीनिवास मोडक यांचे पत्र ( लोकमानस १४ जाने.)वाचले. याआधीही मोडक यांनी स्मारकाची मागणी केलेली आहे. पण खरोखरच सद्यस्थितीत अशा स्मारकांची प्रेरकता काय असेल, याचीही चर्चा होणे आवश्यक आहे. आदरणीय व्यक्तींची स्मारके आज घडीला फक्त त्यांच्या वस्तू, पूर्णाकृती पुतळे इथपर्यंत मर्यादित राहिलेली नाहीत. ठाणे महानगरपालिकेने सी.डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या स्वरूपात १९८७ साली एक योग्य स्मारक निर्माण केलेले आहे (अशी  प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे ही भारतातील एकमेव महानगरपालिका). संस्थेतून आजघडीला अनेक मध्यमवर्गीय घरांतील विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस पदापर्यंत पोहोचले आहेत. हेच विद्यार्थी आणि ही संस्था खऱ्या अर्थाने सी.डीं.चे जिवंत स्मारक आहेत आणि हाच खरे तर सीडींचा यथोचित गौरव आहे. आजही घरच्या आíथक स्थितीमुळे खूप मुले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी या गरजू विद्यार्थाना पाठबळ देण्यासाठी अशा संस्थांची आज गरज आहे. आजही या संस्थेतील विद्यार्थी सी.डीं.ना आपल्या गुरुस्थानी मानतो. मला वाटते हाच या महापुरुषाचा विजय आहे. शेवटी पुतळे उभारून या महापुरुषांचा पराभव करण्यापेक्षा अशी जिवंत, जागती स्मारके उभारणे, हीच या महापुरुषाला श्रद्धांजली ठरेल.
-सुयोग गावंड
pratikriya@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:11 pm

Web Title: baseless allegation on kothapalli
Next Stories
1 बदलीचा ‘दंडुका’च कशाला हवा?
2 मानीव अभिहस्तांतरणासाठी सोपा मार्ग नाही?
3 शासनाचे हात बिल्डरांच्याच दगडाखाली
Just Now!
X