29 February 2020

News Flash

गुच्छातला संदेश..

गुच्छ म्हणजे वैविध्य.. खुडलेल्या निरनिराळय़ा फुलांना एकत्र आणणं.. विविधतेतलं सौंदर्य! खाण्यापिण्याच्या सवयींत, जगण्यात हे वैविध्य आपण बाणवलं.. पण देशी निसर्ग जपायला हवा, याचं भान सुटत

| November 29, 2012 12:30 pm

गुच्छ म्हणजे वैविध्य.. खुडलेल्या निरनिराळय़ा फुलांना एकत्र आणणं.. विविधतेतलं सौंदर्य! खाण्यापिण्याच्या सवयींत, जगण्यात हे वैविध्य आपण बाणवलं.. पण देशी निसर्ग जपायला हवा, याचं भान सुटत गेलं..
कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी झालेला कार्यक्रम आजही आठवतो. तो लक्षात राहिला तो त्या कार्यक्रमात पाहुण्यांना दिलेल्या वैशिष्टय़पूर्ण पुष्पगुच्छासाठी. मधोमध शेवंती- झेंडूची पिवळी फुलं आणि त्याच्याभोवती गुंडाळलेली हिरवी पानं! गुच्छ दिसायला फारसा आकर्षक नव्हता, पण ती तिथली पद्धत होती. काही दिवसांपूर्वी तुळजापूरमध्ये असाच वेगळा पुष्पगुच्छ पाहायला मिळाला आणि ही आठवण झाली. हा गुच्छही वेगळा होता. त्यात झेंडू, शेवंती होतीच. शिवाय देशी गुलाब, लिलीसुद्धा गुंफली होती. ही फुलंसुद्धा तशीच पानांमध्ये गुंडाळलेली. राज्याच्या काही भागात अजूनही समारंभांमध्ये पाहुण्यांना फुलांचा हार घालण्याची पद्धत आहे. सोलापूरमधील अलीकडचा एक कार्यक्रम आठवतो. त्यात पाहुण्यांना देशी गुलाबाची फुलं असलेला हार घालण्यात आला होता. हळूहळू त्याच्या बऱ्याचशा पाकळ्या झडून व्यासपीठावर त्यांची ‘रांगोळी’ उमटली होती. व्यासपीठाची शोभा आणखी वाढली होती.
..अलीकडे बहुतांश कार्यक्रमांमध्ये त्याच त्याच प्रकारची फुलांची परडी (बुके) दिली जाते. फरक असतो तो केवळ त्यांच्या आकाराचा आणि रचनेचा. नाहीतर बरंच काही एकसारखंच असतं. विशेषत: गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये प्रामुख्याने हा बदल पाहायला मिळत आहे, सगळीकडचं सर्वच काही एकसारखं. त्यापूर्वी पुष्पगुच्छ, हार आणि दिली जाणारी फुलं यात बरीच विविधता होती. विशेष म्हणजे त्या त्या भागानुसार त्यात हमखास वेगळेपण पाहायला मिळत होतं. त्यात समावेश असायचा, त्या त्या भागात घेतल्या जाणाऱ्या फुलांचा. आता मात्र गुच्छांमध्ये कृत्रिम वाटावीत इतकी एकसारखी असलेली गुलाबाची फुलं, तसच जरबेरा, कार्नेशन, ग्लॅडिओलस यांचीच चलती असते. त्याला ना प्रदेशाचे बंधन आहे, ना समारंभाचे. त्यांचा वापर इतका वाढलाय की आता केवळ देव सोडून इतर सर्वत्रच असे बुके किंवा गुच्छ वापरले जातात. त्यांचं सर्व काही एकसारखं असतं, फरक असतो तो केवळ त्यांच्या तपशिलात. वर वर पाहता कदाचित हा बदल विशेष वाटणार नाही. ‘मग त्याने काय होतं’ असंही बोललं जाईल, पण या हल्लीच्या बुकेंमुळे सर्वात मोठा काय परिणाम झाला? तर ठिकठिकाणची विविधता कमी झाली. म्हणून तर पूर्वी पुष्पगुच्छ आणि हार-तुरे यात सहजी दिसणारं वेगळेपण आता मुद्दाम शोधावं लागतं. ते दिसलं तर आश्चर्यसुद्धा वाटतं.
फुलांच्या या प्रकरणाचा केवळ कार्यक्रमांपुरताच परिणाम झालेला नाही. हा बदल घरापर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण पूर्वी प्रेम व्यक्त करण्यासाठी मोगरा, चाफा, निशिगंध, बकुळ, गुलाब यांचा वापर केला जायचा. आता त्यांची जागा गंध नसलेला गुलाब, जरबेरा, कार्नेशन अशा कृत्रिम वाटणाऱ्या फुलांनी घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय आता मोगऱ्याचा गजरा किंवा पिवळा चाफा पूर्वीइतका सहजी मिळत नाही. निदान शहरी भागात तरी हा बदल प्रकर्षांने पाहायला मिळत आहे. त्याऐवजी इतर नवी फुलं विकणारे फुलवाले चौकाचौकात भेटतात. सभा-समारंभ असोत नाहीतर खासगी आयुष्य, आता बहुतांश ठिकाणी फुलांमध्ये असलेली ही विविधता खूपच कमी झाली आहे. या समानीकरणाचा मारा असाच सुरू राहिला तर भविष्यात उरलीसुरली विविधता संपली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. कार्यक्रमांमध्ये दिले जाणारे गुच्छ व फुलांचे प्रकार बदलले तर त्याचा परिणाम फुलांच्या विविधतेवरही होणार. याचे कारण ज्या गोष्टींना बाजारात किंमत नसते त्या गोष्टी सहजी टिकून राहतीलच असे नाही. त्या टिकवायच्या असतील तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. बाजाराकडून मागणी असेल तर मात्र या गोष्टी व्यवस्थित टिकून राहतात. म्हणूनच त्या त्या भागातील या फुलांचे स्थान समारंभांमध्ये टिकून आहे का, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
ही बाब फुलांपुरतीच मर्यादित नाही, तर ती अनेक गोष्टींना लागू होते. मग त्या त्या भागातील भाज्या असोत, धान्य असो, नाहीतर अन्य काही. आपण जेवणात कोणत्या पदार्थाना प्राधान्य देतो, हेही या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. आपल्याकडे आधी दाक्षिणात्य पदार्थाची लाट आली. पाठोपाठ आलू, पनीर, मटार, दाल, गोबी आणि या सर्वासोबत तंदुरी रोटी यासारख्या पंजाबी पदार्थाची दादागिरी वाढली. ती इतकी की लहान शहरं आणि गावांमध्येसुद्धा पंजाबी पदार्थाना पर्याय मिळेलच याची खात्री उरलेली नाही. आता तर मॅकडी, केएफसी या बहुराष्ट्रीय पदार्थाच्या ‘महालाटेत’ स्थानिक व त्या त्या भागात विकसित झालेले पदार्थ टिकणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ते पदार्थच उरले नाहीत तर त्यांच्यासाठी लागणारी नाचणी, कारळे, हुलगे हे तोंडी लावण्यापुरते तरी शिल्लक राहतील का? हीसुद्धा चिंता आहे. ही चिंता केवळ आपले पदार्थ जाताहेत आणि इतरांचे सांस्कृतिक अतिक्रमण होत आहे या पातळीपर्यंत सीमित नाही. स्थानिक पदार्थामधून मिळणारी पोषकद्रव्यं, आपले हवामान व वातावरणात असलेली त्यांची उपयुक्तता, त्याचा आरोग्याला होणारा लाभ हे मुद्दे आहेतच. त्याच्याही पुढे जाऊन महत्त्वाचे म्हणजे पिकं, रानभाज्या, फुलं किंवा इतर प्रकारांमधील जैवविविधता टिकून राहील का, हा महत्त्वाचा विषय आहे.
या सर्वच बदलांमागे संदर्भ आहे तो जग एकत्र येण्याचा अर्थात जागतिकीकरणाचा. जग एकत्र असताना ‘विविधतेत एकता’ हा मंत्र जपला गेला तर फारशी काळजी करण्याचे कारण नाही. सध्या मात्र व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने स्थानिक गोष्टी हटवून बाजारपेठा काबीज केल्या जात आहेत. त्यातच बकुळ-मोगऱ्यासारखी सुगंधी फुलं, ढेसा-चाकवतची भाजी, कारळ्याची चटणी आणि जास्त पाणी घालून केला जाणारा चिकट भातसुद्धा हद्दपार होत आहे. आता तर दर्जा किंवा प्रमाणीकरणाच्या नावाखालीसुद्धा हे होत आहे आणि सर्व गोष्टींना एकच रंग फासण्याचे प्रकार सुरू आहेत.. म्हणूनच फुलं व पुष्पगुच्छांमध्ये विविधता राहते की संपते याचा विचार करायचा आणि शक्य झालं तर आपल्या व्यवहारातून ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्नही करायचा!

First Published on November 29, 2012 12:30 pm

Web Title: bouquet message
Next Stories
1 कहाणी एका गोवंशाची!
2 देशी जनावरं कालबा?
3 पावसाचा काळ बदलतोय?
X
Just Now!
X