प्रपंचात राहून प्रपंचाच्या बाधक प्रभावापासून मनानं मुक्त होण्यासाठी भगवंतालाच आपल्या प्रपंचात आणलं पाहिजे. आता भगवंताला प्रपंचात का आणायचं? तर त्याच्या भेटीसाठी आपण प्रपंच सोडून जाऊ शकत नाही म्हणून! जर आपण एखाद्याला भेटायला जाऊ शकत नसलो तर त्यालाच आपल्या घरी बोलावतो ना? तसंच. आता त्याला प्रपंचात आणण्याची गरज तरी काय? संत सांगतात, प्रपंच म्हणजेच आपलं जगणं जर आनंदी व्हायला हवं असेल तर त्यात भगवंताचा आधार आवश्यक आहे. आज आपल्या जगण्यात अखंड आनंद, अखंड समाधान, अखंड स्थिरता आहे का? तर नाही. आपल्या प्रपंचातही आनंद आहे, पण तो कसा? श्रीगोंदवलेकर महाराज एका मार्मिक रूपकाद्वारे सांगतात की, ‘‘सध्याचा आपला आनंद हा नुसत्या आशेचा आनंद आहे. एखादा मरणोन्मुख रोगी जसा (कृत्रिम यंत्रणेद्वारे) प्राणवायूवर थोडा जास्त वेळ जगतो, पण ते जगणं काही खरं जगणं नव्हे, त्या प्रमाणे उद्या सुख मिळेल, या आशेवर आपण जगतो!’’ (चरित्रातील आनंदविषयक वचने, क्र. १९). म्हणजेच माझं आयुष्य काळाच्या पकडीत आहे, काळ कधी घाला घालील याचा नेम जन्मापासून नाही. असं माझं जगणं मरणोन्मुख असतानाच मला भवरोगही जडला आहे. तरी मी जगत आहे ते ‘उद्या आनंद मिळेल’ या आशेच्या कृत्रिम प्राणवायूवर! आपल्याला जीवन दु:खरहित, काळजीमुक्त, भयमुक्त हवं आहे. मात्र आपलं सुख, आपली निर्भयता, आपली निश्चिंती ही परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणून खरं सुख, खरी निर्भयता, खरी निश्िंचती आपल्याला लाभत नाही. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘आपली वृत्ती परिस्थितीत अडकली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही, म्हणून आपल्याला समाधान नाही’’ (चरित्रातील समाधानविषयक वचने, क्र. ५). माझी समाधानी वृत्ती ही परिस्थितीवर अवलंबून असते आणि परिस्थिती कधीच एकसारखी राहात नाही. त्यामुळे परिस्थितीत अडकलेलं मन परिस्थिती पालटताच अस्थिर व्हायला वेळ लागत नाही. जोवर मी माझ्या प्रपंचात भगवंताला आणत नाही तोवर खरी स्थिरता, खरी शांती मला लाभणार नाही. श्रीमहाराज सांगतात, ‘‘शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. शांती एकपणात आहे. द्वैतात नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन एका भगवंताकडे ठेवले त्यालाच शांतीचा लाभ होतो, मग त्याची परिस्थिती कशीही असो’’ (चरित्रातील भगवंतविषयक वचने, क्र. ३५ व ३६). तेव्हा प्रपंच खऱ्या अर्थानं आनंदाचा करायचा तर त्यात भगवंताला आणलं पाहिजे. आता प्रपंचात भगवंताला आणायचं म्हणजे काय? जसा एखादा अतिथी आपल्याकडे राहायला आला तर आपण काय करतो? नेहमीच्या दिनक्रमात त्याच्यासाठीही वेळ काढतो. आपल्या वेळापत्रकात बदलही करतो. त्याच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून त्याच्या आवडीच्या गोष्टीही आवर्जून करतो. तसा आपल्या प्रपंचरहाटीत भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून वागण्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण परमात्मा हा अतिथीच आहे. तो कसा?