भगवंताच्या अस्तित्वाबाबत नि:शंकता आली पाहिजे, ही श्रीगोंदवलेकर महाराजांची इच्छा आहे. ते म्हणतात, ‘आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे’ (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ७५). मग याच जन्मात भगवंताचा साक्षात्कार व्हावा कसा? श्रीमहाराज सांगतात की, प्रथम भगवंत आहे, हे गृहीत धरले पाहिजे. आता आपणही विचार करा, आपण जगताना किती तरी गोष्टी गृहीत धरतोच ना? अमक्यासाठी अमकं केलं तर तोही माझ्यासाठी अमकं करील इथपासून ते मुलगा मोठेपणी आपल्याला सांभाळेल, आपली मानलेली माणसं आपलीच राहातील, दरमहा एवढी बचत करत आहोत तर ती पुढे उपयोगी पडेल, नैसर्गिक आपत्तीपासून आपण सुरक्षित राहू.. अशा कित्येक गोष्टी आपण गृहीत धरत असतो. पण एवढं मोठं जग ज्यानं निर्माण केलं तो भगवंत मलाही सांभाळील, हे मात्र आपण गृहीत धरू शकत नाही. खरं मोल उमगल्याशिवाय भगवंताला जीवनात सर्वोच्च स्थान द्यायलाही आपण राजी नसतो. त्यासाठी आधी भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा हवा आणि मग त्यानंच हे जग निर्माण केलं आणि तोच हे जग चालवतो कसं, याचा पुरावा हवा! त्या भगवंताला आपण का गृहीत धरावं, हे लक्षात आणून देताना श्रीमहाराज सांगतात, ‘बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे, हे आपल्याला कळत नाही. पण घेतल्याशिवाय चालत नाही. त्याचप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे कोडे सुटेल त्याच वेळी त्याची खरी किंमत आपल्याला कळेल.’ (चरित्रातील भगवंतविषयक बोधवचने, क्र. ९९). जीवनाचं गणित सोडविण्यासाठी आज अज्ञात असलेला भगवंत ‘क्ष’ म्हणून गृहीत धरायचा आहे. आता ‘क्ष’ धरून आपण गणित सोडून देत नाही तर सोडवतो. त्याचप्रमाणे भगवंताला गृहीत धरलं याचा अर्थ जीवनाचं गणित सोडून द्यायचं नाही तर सोडवायचं आहे. त्या भगवंताचा अनुभव आपल्याला जगतानाच घेतला पाहिजे. त्यासाठी जीवनाचं गणित त्यांच्या बोधानुरूप सोडवलं पाहिजे.  ते सोडवता सोडवता या घडीला ‘क्ष’ म्हणून गृहीत धरलेला भगवंतच खरा कसा अक्षय आहे आणि आपला प्रपंच कसा क्षयग्रस्त आहे, त्याची उकल होत जाईल. आता इथे ‘क्ष’चा आणखी एक अर्थ म्हणजे अज्ञात! श्रीमहाराज या ‘क्ष’च्या जागी रामाला स्थापित करतात. श्रीरामचंद्रांचं जीवन आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे त्या लीलाचरित्राचं स्मरण, संकीर्तन साधणारं आहे. असं असलं तरी श्रीमहाराज ज्या अंत:करणपूर्वक रामरायाला आळवतात तो पूर्ण समर्पित भाव, प्रेमाभक्तिचं ते पूर्णत्व आपल्यात नाही. श्रीरामराया आज आपल्या अनुभवाच्या नव्हे तर कल्पनेच्या पातळीवर आहे. म्हणून या घडीला आपल्यापुरतं त्याचं खरं स्वरूप अज्ञातच आहे.