एल. के. कुलकर्णी, लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.
देश, धर्म या सीमांच्या पलीकडे जाऊन सर आर्थर कॉटन यांनी भारतात, गोदावरी नदीच्या खोऱ्यात सिंचनासंदर्भात जे काम केले, त्यामुळे तिथल्या लोकांचे जगणे कायमस्वरूपी बदलून गेले.
आंध्र प्रदेशात राजमहेंद्रीच्या पुढे गोदावरीचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो व ती अनेक मुखाने समुद्राला मिळते. हा त्रिभुज प्रदेश म्हणजे सुपीक गाळाने बनलेल्या व तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या अनेक लहान-मोठय़ा बेटांचा समूह आहे. पण सुपीक गाळयुक्त मृदा व आजूबाजूला भरपूर पाणी असूनही या भागाच्या वाटय़ाला हजारो वर्षे समृद्धीऐवजी दुर्दैव आले होते. पावसाळय़ात या त्रिभुज प्रदेशाचा बराचसा भाग पुराच्या पाण्याने व्यापला जाई. पावसाळय़ानंतर आजूबाजूच्या गोदावरीच्या शाखांचे पाणी शेतापर्यंत आणण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागे. हजारो वर्ष पूर व दुष्काळाच्या दुष्टचक्रात येथील लोक जगत होते. या दुर्दैवाच्या फेऱ्यातून त्यांना सोडवले एका इंग्रज अभियंत्याने. ‘आंध्रचे भाग्यविधाते’ मानल्या जाणाऱ्या त्या अभियंत्याचे नाव होते ‘सर ऑर्थर कॉटन’.
त्यांचा जन्म १५ मे १८०३ रोजी इंग्लंडमध्ये झाला. १८१८ मध्ये सैनिकी शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १८१९ मध्ये वयाच्या केवळ १६ व्या वर्षी त्यांची ईस्ट इंडिया कंपनीत सेकंड लेफ्टनंट म्हणून निवड झाली. वर्षभर इंग्लंडमध्ये काम केल्यावर १८२१ मध्ये त्यांची भारतात तोफखाना विभागात मद्रासमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरच्या हाताखाली नेमणूक झाली. त्यांनी भारत ब्राह्मी युद्धात भाग घेतला तरी त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र सिंचन हेच होते. १८२८ मध्ये ते कावेरी शोध प्रकल्पाचे इनचार्ज झाले. इ. स. पूर्व १५० मध्ये चोल राजा कारिकेल याने कावेरी नदीवर एक धरण बांधून कालवा काढला होता. तो प्रकल्प कल्लनाई किंवा ग्रँड अनिकट म्हणून प्रसिद्ध आहे. हे आजही वापरात असलेले भारतातील सर्वात प्राचीन धरण. पण हजारो वर्षांत कुणीही त्याच्या देखरेखीकडे लक्ष दिले नव्हते. १९ व्या शतकात त्यात गाळ साचू लागला. योग्य ते उपाय करून कॉटन यांनी त्या प्राचीन धरणास जीवदान मिळवून दिले व कर्नाटक व तामिळनाडूला सिंचनाचा लाभ मिळवून दिला.
१८४४ मध्ये कॉटन यांनी विशाखापट्टणम बंदराचा आराखडा तयार केला. त्याच वेळी गोदावरी खोऱ्यात फिरत असताना तेथील जनतेची दुष्काळामुळे होणारी होरपळ त्यांना अस्वस्थ करून गेली. एकदा गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात झालेले चक्रीवादळ आणि पाठोपाठ दुष्काळ यात लोकांची झालेली वाताहत प्रत्यक्ष पाहून ते हेलावून गेले. राजमहेंद्री येथे बंधारा बांधून त्यापासून काढलेले कालवे त्रिभुज प्रदेशात फिरवण्यात यावेत अशी योजना त्यांनी सुचवली. यामुळे पुरावर नियंत्रण व दुष्काळावर मात या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होणार होत्या. मात्र त्यांच्या योजनेला मान्यता सहज मिळाली नाही. सव्र्हे, प्रचंड परिश्रम व पाठपुरावा करून कॉटन यांनी त्या योजनेस मान्यता मिळवली. १८४७ मध्ये राजमहेंद्री येथील गोदावरीवरील बंधाऱ्याचे काम सुरू झाले. पण आजारपणामुळे कॉटनना दोन वर्षे रजा घ्यावी लागली. १८५० मध्ये ते पुन्हा कामावर रुजू झाले तेव्हा त्यांना कर्नल म्हणून बढती मिळाली होती. १८५२ मध्ये राजमहेंद्री येथील भव्य व स्वप्नवत बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. तोच ‘दौलेश्वरम बंधारा’ होय. त्याच्यापासून निघालेल्या कालव्यांचे जाळे त्रिभुज प्रदेशात सर्वत्र पसरले होते. त्यातून गोदावरीचे पाणी त्रिभुज प्रदेशात सर्वदूर खळाळू लागले. पुराची समस्या तर सुटलीच पण त्या प्रदेशाचा वेगाने कायापालट होऊन एकेकाळचा तो दुष्काळी प्रदेश ‘भाताचे कोठार’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
यानंतर १८५५ मध्ये त्यांनी कृष्णा नदीवरील प्रकल्प पूर्ण केला. कृष्णा – गोदावरी त्रिभुज प्रदेशात दोन्ही नद्यांचे पाणी कालव्यातून खेळू लागले. या दोन्ही नद्यांचे पाणी साठवून ते आंध्र तेलंगणाच्या अंतर्भागात पोचवण्याची योजनाही त्यांनी सुचवली होती. मात्र पोलावरम प्रकल्पाच्या रूपात ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास एकविसावे शतक उजाडावे लागले. त्यांनी इतरही अनेक कामे केली. भारत व श्रीलंकेमधील पांबन मार्गाचे सर्वेक्षणही त्यांनी केले होते. भारतातील प्रमुख नद्या व त्यांचे कालवे एकमेकांना जोडण्याची योजनाही आर्थर कॉटन यांनी मांडली होती. म्हणजे भावी काळात ‘नदीजोड प्रकल्प’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या संकल्पनेचे जनकही आर्थर कॉटन होते.
नियतीने नेमून दिलेले आपले कार्य पूर्ण करून कॉटन १८६० मध्ये इंग्लंडला गेले. पण मनाने ते भारतात गुंतले होते. प्रकल्पांच्या मार्गदर्शनासाठी ते १८६२ मध्ये पुन्हा भारतात येऊन गेले. आपल्या कार्यप्रति कॉटन अतिशय समर्पित व जिद्दी होते. व्यक्तिश: ते एक सुसंस्कृत, संवेदनशील व प्रगल्भ व्यक्ती होते, हे त्यांच्या मुलीने लिहिलेल्या चरित्रातून दिसते. फ्लोरेन्स नायटिंगेलसह अनेक तत्कालीन थोर व्यक्तींशी त्यांचा पत्रव्यवहार होता.
पण स्वत: कॉटन यांना मात्र त्यांच्या महान कार्यासाठी बराच मनस्ताप सहन करावा लागला. वरिष्ठ अधिकारी त्यांचा द्वेष करीत. त्यांच्या प्रकल्पाला मान्यता मिळण्यात अडचणी आणत. इंग्लंडमध्ये कॉटन यांच्यावर अभियोग ( इम्पिचमेन्ट) लावण्याचाही प्रयत्न झाला. विरोधकांचा आक्षेप असा होता की कॉटन हे ईस्ट इंडिया कंपनीच्या हितासाठी नव्हे तर भारतीयांबद्दलच्या सहानुभूतीतून ही कामे करीत होते. ते बऱ्याच अंशी खरेही होते. १८७८ मध्ये इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या समितीपुढे येऊन त्यांना गोदावरीवरील प्रकल्पांची आवश्यकता सिद्ध करावी लागली.
पण काळ मात्र एवढा निष्ठुर नाही. भारतात केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ त्यांना १८६१ मध्ये इंग्लंडच्या राणीतर्फे ‘सर’ व पुढे १८७७ मध्ये ‘नाइट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ हा किताब देण्यात आला. २४ जुलै १८९९ मध्ये सर आर्थर कॉटन यांचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत आंध्रचे भाग्यविधाते म्हणून ते लाखो भारतीयांच्या मनात अमर होऊन गेले होते. गोदावरी त्रिभुज प्रदेश व पूर्व गोदावरी जिल्हा हा ‘भाताचे कोठार’ म्हणून व ‘कोनासीमा’(देवांची भूमी) म्हणून भारतात प्रसिद्ध झाला. एकेकाळचा हा शापित दुष्काळी प्रदेश आज निसर्गसौंदर्य, पर्यटन, दरडोई उत्पादन व जिल्हावार सकल आंतरिक उत्पादनात आंध्रच नव्हे तर भारतात अग्रेसर आहे. भारतातील एक मोठी सोने व जवाहिऱ्यांची बाजारपेठ राजमहेंद्री येथे आहे. यावरून येथील समृद्धीची कल्पना येईल. या सर्व कायापालटास कारणीभूत असणाऱ्या आर्थर कॉटन यांचे हजारो पुतळे आज १५० वर्षांनंतरही आंध्र प्रदेशात खेडोपाडी आहेत. या भागात असंख्य ठिकाणी व अनेक उत्पादनावर घोडय़ावर बसलेल्या आर्थर कॉटन यांचे प्रसिद्ध चित्र दिसते. १९७० मध्ये दौलेश्वरम बंधाऱ्याचे नूतनीकरण करून त्याचे नाव ‘सर आर्थर कॉटन बंधारा’ असे करण्यात आले. या बंधाऱ्यावर तसेच हैद्राबाद येथील टँक बंडवर भारतातील थोर महापुरुषांसोबत आर्थर कॉटन यांचा पुतळा उभा आहे.
आपल्यावरील आरोपांच्या संदर्भात सेक्रेटरी ऑफ दि स्टेटस यांना पाठवलेल्या पत्रात कॉटन म्हणाले होते ‘महोदय, आपल्या थेम्स नदीतून पूर्ण वर्षांत जेवढे पाणी वाहून जाते तेवढे गोदावरीतून केवळ एक दिवसात वाहून जाते.’ किती सहजतेने त्यांनी त्यांच्या मातृभूमीतील थेम्सपेक्षाही गोदावरीची थोरवी मान्य केली, यावरून त्यांची ध्येयनिष्ठा स्वत्वाच्या किती पुढे गेली होती, हे दिसते. कॉटन यांची जीवन कहाणी म्हणजे देश, धर्म इ. सीमांच्या पलीकडे जाऊन एक व्यक्ती आपल्या कार्यातून लाखो दुर्दैवी लोकांच्या जीवनात केवढी मोठी क्रांती घडवू शकते याचे उदाहरण आहे.