News Flash

२२८. नियम

पाच यमांनंतर येतात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम. ‘शौच’ म्हणजे शरीर आणि मनाचं पावित्र्य राखणं.

| November 22, 2013 12:42 pm

पाच यमांनंतर येतात शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान हे पाच नियम. ‘शौच’ म्हणजे शरीर आणि मनाचं पावित्र्य राखणं. थोडक्यात बाह्य़ आणि आंतरिक शुद्धी. स्वामी विवेकानंद यांच्या सांगण्यानुसार आत्मसुखाशी मैत्री, दु:खितांबाबत दयाभाव, पुण्यकर्माविषयी आनंद आणि पापकर्माविषयी उपेक्षाभाव असला तरी आंतरिक शुद्धी आपोआप साधत जाते. या आंतरिक शुद्धीमुळे देहतादात्म्य नष्ट होतं. पातंजली मुनी सांगतात, की ‘‘शौचात्स्वाङ्गजुगुप्सा परैरसंसर्ग:।।’’ म्हणजे आंतरिक व बाह्य़ शुद्धी मुरत जाईल तसतशी स्वदेहाची आसक्ती, प्रेम कमी होत जाईल. इतकंच नव्हे तर देहाची घृणाही वाटू लागेल. मग दुसऱ्याच्या शरीराचाही मोह सुटेल. माणसाचं सगळं जगणं हे देहभावानंच आहे. आपण दुसऱ्याला देहभावानंच ओळखतो. शरीराला पाहूनच शरीराला आनंद होतो, शरीराला पाहूनच शरीराला दु:ख होतं, शरीरच शरीरासाठी झुरतं आणि शरीरच शरीराला टाळतं. ‘मी म्हणजे देह’ या भावनेनंच आपण जगत असतो आणि दुसऱ्याचीही ओळख देहभावनेतूनच पक्की करीत असतो. ‘शौच’ व्रतानं ही देहासक्ती आणि हा देहभाव सुटेल.  ‘संतोष’ म्हणजे प्राप्त परिस्थितीत मनाचं समाधान राखणं. चित्तातली अतृप्ती नष्ट करणं, हाच या संतोष व्रताचा हेतू आहे. भगवंताच्या इच्छेनं जे मिळालं आहे त्यात समाधान मानून आणि मिळालेल्या साधनांचा अधिकात अधिक उपयोग करीत जगणं, म्हणजे संतोष आहे. यापुढील तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या तिघांना क्रियायोग म्हणूनही ओळखतात. तपाचं विवरण भगवंतांनी गीतेतही केलं आहेच. थोडक्यात सांगायचं तर चित्तशुद्धी व्हावी, या एकाच हेतूनं काया, वाचा आणि मनावर ठेवलेलं नियंत्रण हे तप आहे. ‘तप’ म्हणजे वाटय़ाला आलेली द्वंद्वगती, जसं की मान-अपमान, यश-अपयश, लाभ-हानी आदी, ही सहन करून इंद्रियं आपल्या स्वाधीन ठेवणं. चित्तशुद्धीसाठी शास्त्रादी ग्रंथांचा अभ्यास, मनन, चिंतन आणि मंत्रजप हा स्वाध्याय आहे. ‘ईश्वरप्रणिधान’ म्हणजे सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीनं करणं. यातून हळूहळू मोहजनित कर्मे सुटून केवळ कर्तव्यकर्मेच होऊ लागतात. त्यानंतर ईश्वराशी ऐक्य होऊन ‘कर्ता मी नाहीच’ ही जाणीव होते. ईश्वरप्रणिधानाचे हे पूर्ण स्वरूप आहे. विशेष म्हणजे ईश्वराशी जे ऐक्य आहे ते मंत्रजपानं साधतं, असा पतंजली मुनींचाही निर्वाळा आहे. (‘तस्य वाचक प्रणव:’ -त्या ईश्वराचा वाचक प्रणव म्हणजेच ओमकार आहे. अर्थात ईश्वर आणि त्याचं नाम अभिन्न आहे.  ‘तज्जप: तदर्थभावनम्’ त्याचा जप करावा व त्या मंत्राचा जो अर्थ ईश्वर तोच माझ्या अंतर्यामी वास करीत आहे, तो व मी भिन्न नाही, ही भावना दृढ करावी. – समाधीपाद). यम आणि नियम यानंतर अष्टांगयोगाचं तिसरं अंग आहे ‘आसन’. पातंजली मुनी त्याचं लक्षण सांगतात, ‘स्थिरसुखमासनम्।।’ शरीर आणि मनाला सारखीच सुखावह वा सहज भासणारी बैठक. अस्वस्थतेतून सतत काही तरी करीत राहणारं, दहा दिशांना धावणारं मन जेव्हा एका जागी स्थिर होतं, तीच आसनसिद्धी!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 12:42 pm

Web Title: chaitanya chintan rule
Next Stories
1 पोलीसगिरीवर कधी बोलणार?
2 धोकादायक ढिलाई
3 नवा सामाजिक वैद्यक अभ्यासक्रम दिलासादायक ठरो!
Just Now!
X