छत्तीसगढमधील बिलासपूर जिल्ह्य़ातील कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबिराच्या शिकार झालेल्या त्या ११ महिला या आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेच्या बळी म्हणायच्या की पुरुषप्रधान संस्कृतीच्या, या प्रश्नाचे उत्तर नक्कीच अवघड आहे. मंगळावर यान पाठविणाऱ्या देशामध्ये घडलेल्या या वैद्यकीय मृत्युकांडाने केवळ आपल्या विकास आणि प्रगतीचेच नव्हे, तर मानवी जीवनाबद्दल असलेल्या पराकोटीच्या अनास्थेचेही वाभाडे काढले आहेत. आता या प्रकरणाला जबाबदार असलेल्या कोणा आर. के. गुप्ता नामक डॉक्टरच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला कदाचित पुढे जाऊन शिक्षा होईल. त्या मृत महिलांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली जाईल. त्या शिबिरात एकूण ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांपैकी ६० जणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तोंडावरही नुकसानभरपाई मारली जाईल. २००९ ते २०१२ या तीन वर्षांत सरकारने अशा प्रकारे ५६८ कुटुंबनियोजन-बळींच्या कुटुंबीयांना भरपाई दिली आहे. या प्रकरणाचे राजकारण खेळले जाईल हेही नक्की. एकंदर अशा प्रकारच्या घटनांनंतर जे काही होते, ते सर्व काही साग्रसंगीत होईल आणि अच्छे दिनांच्या स्वप्नमैफलीत असलेल्या उर्वरित देशाच्या दृष्टीने हे प्रकरण संपेल. पण तसे होता कामा नये. त्यासाठी अशा घटना का घडतात, हे नीट तपासून पाहिले पाहिजे. बिलासपूर जिल्ह्य़ातील तखतपूर नावाच्या गावामध्ये नेमीचंद जैन कॅन्सर रिसर्च सेंटर आहे. त्या इमारतीत गेल्या शनिवारी हे सरकारी कुटुंबनियोजन शिबीर झाले. अमर अग्रवाल हे या भागाचे लोकप्रतिनिधी. ते मंत्री आहेत. आणि त्यांच्याकडे आरोग्य खाते आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात नवे वैद्यकीय महाविद्यालय उघडणे भागच आहे. त्या प्रथेनुसार लवकरच या केंद्राच्या इमारतीत आयुर्वेद महाविद्यालय उभे राहणार होते. सध्या तेथे काहीच नसल्याने तेथे हे शिबीर भरवण्यात आले. हा ओबीसी आणि सतनामी दलित बहुसंख्य असलेला भाग. त्यांतील ८३ महिला तेथे दाखल करण्यात आल्या. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी केवळ एकच डॉक्टर उपलब्ध होते. हे डॉक्टर आणि त्यांचे सहायक या दोघांनी दुपारी दीड वाजता शस्त्रक्रियांना शुभारंभ केला आणि साधारणत: दोन मिनिटांना एक अशा प्रमाणात अवघ्या साडेतीन तासांत सगळ्यांचे कुटुंबनियोजन करून टाकले. एकाच लॅप्रोस्कोपी यंत्राने एवढय़ा जणींच्या एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचा हा जागतिक विक्रमच म्हणायचा. पण असे प्रकार आपल्याकडील आरोग्य शिबिरांतून सर्रास होत असतात. कुटुंबनियोजनाच्या बाबतीत तर हे होतेच. याचे कारण आजही अनेक राज्यांत सरकारी डॉक्टरांना त्याचा कोटा ठरवून दिला जातो. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांच्या या कोटा पद्धतीने आणीबाणीत कसा कहर घातला होता आणि उत्तर भारतात इंदिरा गांधी यांचा पराभव होण्यास ते कसे कारणीभूत ठरले होते, याची असंख्य वेळा पारायणे होऊनही त्यापासून आपण कोणताही धडा घेतलेला नाही, हेच दिसून येते. दुसरीकडे आपल्या देशात आजही कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आणि महिला हेच समीकरण कायम आहे. याचे कारण आपली पुरुषप्रधान समाजरचना. अपत्य ही केवळ बाईचीच जबाबदारी. तशात नसबंदी केल्यास पौरुष कमी होते हा समज. जणू मूल होणे हेच पौरुषाचे आद्य आणि अंतिम लक्षण. या अशा अंधश्रद्धांनी, अनास्थेनेच त्या महिलांचे बळी घेतले आहेत. गरिबी हे त्यातील आणखी एक महत्त्वाचे कारण. आणि लोक गरीब आहेत, त्यांना अंगाला हात लावताच ५०० रुपयांचा ‘मीटर’ पाडणारा डॉक्टर परवडत नाही, म्हणूनच सरकारी आरोग्य सेवा भक्कम असायला हवी. अन्यथा अशी मरणनियोजन शिबिरे सुरूच राहतील!