चीनची निर्यातप्रधान अर्थव्यवस्था मंदावत असताना त्या देशाने युआन या त्यांच्या चलनाचे अवमूल्यन केले. युआनची किंमत कमी झाल्यामुळे त्या तुलनेत डॉलरची किंमत वाढणार, याचा परिणाम असा की चीनशी व्यापार करणाऱ्या दुसऱ्यास त्याचा फटका सहन करावा लागणार, हे उघडच होते. तसेच झाले आणि फटका भारतास बसला.. याचे कारण आपल्या अर्थआरोग्यातही शोधावे लागेल.

नरेंद्र मोदी सत्तेवर आले तर डॉलरचे मूल्य आपोआप घसरेल आणि रुपया धष्टपुष्ट होईल असे भाकीत खुद्द मोदी आणि श्री श्री रविशंकर ते बाबा रामदेव अशा अनेकांनी गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी केले होते. काल रुपयाने गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळी गाठली. म्हणजे मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत रुपयाची जी काही किंमत होती त्यापेक्षाही ती बुधवारी कमी झाली. मोदी यांच्या आसपासच्या बेगडी बाबाबापूंच्या कथित आध्यात्मिक प्रवचनांना आक्षेप घेण्याचा आमचा मानस नाही. त्याची गरजही नाही. ती ज्यांची त्यांना लखलाभ. परंतु या मंडळींच्या अर्थशास्त्रीय अभिनिवेशास आमचा तेव्हाही आक्षेप होता आणि आता तर आहेच आहे. याचे कारण या मंडळींनी चलनास अकारण राष्ट्रीयत्वाच्या भावनेशी जोडले. रविशंकर यांनी तर त्या वेळी कहरच केला. मोदी पंतप्रधानपदी आल्यास डॉलरची किंमत ४० रुपयांपर्यंत घसरेल असे आचरट भाकीत त्यांचे होते. काल डॉलर ६५ रुपयांपर्यंत गेला. याचा अर्थ या बाबाबापूंच्या गुरुवाणीस चलनाने भीक घातली नाही. त्याचप्रमाणे मोदी यांनी डॉलर दराचा संबंध माजी अर्थमंत्र्यांच्या वयाशी लावून सरकारची टिंगल केली होती. परंतु बुधवारी तर रुपयाने मोदी यांच्या अर्थमंत्र्यांच्या वयाची सीमाही ओलांडली. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे वय ६२ आहे. डॉलरने त्यांचे वय लहान ठरवले. तेव्हा ती टिंगलदेखील उलटली. हा तपशील देण्यामागे दोषदर्शन हा हेतू नाही. तसेच ते विरुद्ध हे अशी तुलना करणे हादेखील मुद्दा नाही. हा तपशील द्यावयाचा तो चलन विनिमय दरामागील गुंतागुंत ध्यानात यावी आणि तसेच त्यामागील भावनिकता दूर व्हावी म्हणून. हे समजून घेणे गरजेचे ठरते. याचे कारण आपले आहे म्हणून चलनाने आपल्याच इच्छेने चालावे हा दुराग्रह झाला. रुपया बुधवारी ज्या प्रकारे घसरला त्यावरून हेच अधोरेखित झाले.
ही घसरण झाली ती शेजारील देशातील चीनमुळे. या चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्नेही जरी असले तरी या स्नेह्य़ांच्या भावनांची कदर न करता त्यांनी आपल्या युआनचे अचानक अवमूल्यन केले. मंगळवारी अचानक आणि अनपेक्षित झालेल्या या अवमूल्यनामुळे चीनशी व्यापारी संबंध असलेल्या सगळ्यांचेच गणित चुकले. या चुकीचे प्रमाण मोठे आहे. कारण चीनची अर्थव्यवस्था ही निर्यातप्रधान आहे. आपल्या देशातील कामगार कायदे, नीतिनियम आदींना बाजूला सारत चीनने आपल्या देशात अत्यंत स्वस्तात वाटेल ते उत्पादन करून देणारे कारखाने उभारू दिले. हय़ुलेट पॅकर्डच्या संगणकापासून ते अ‍ॅपलच्या फोन वा आयपॅडपर्यंत अनेक चीजवस्तूंची निर्मिती ही चीनमध्ये होते. प्रत्यक्षात जरी या कंपन्या अमेरिकी असल्या तरी त्यांची सर्व उत्पादने मेड इन चायनाच असतात. हे चीनचे यश. पण या यशाचा परिणाम असा झाला की चीनची अर्थव्यवस्था निर्यातप्रधान बनली. चीनमध्ये जे काही निर्मिले जाते ते सर्वच्या सर्व देशाबाहेर जाते. किंबहुना देशाबाहेर पाठवण्यासाठीच त्यातील बव्हंशाची निर्मिती होते. परंतु गेली जवळपास दोन वष्रे जागतिक बाजार नरम आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील हे बदलते वारे लक्षात घेऊन चीनने खरे तर आंतरदेशीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे होते. परंतु चीनकडून ते झाले नाही. देशोदेशींचे बाजार चिनी बनावटीच्या वस्तूंनी ओसंडून कसे जातील हेच चीनने पाहिले. याचा परिणाम असा झाला की या बाजारपेठांतून मंदी आल्यावर चीनचे उद्योगयंत्र मंदावले. परिणामी चिनी अर्थव्यवस्था मंदावली. निर्यात कमी झाल्यामुळे निर्यातीतून येणारे डॉलर आटू लागले. हे अर्थातच चीनला परवडणारे नव्हते. यातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग चीनकडे होते. आपली कारखानदारी ही देशांतर्गत बाजारकेंद्रित करणे. परंतु हे एका रात्रीत होणारे काम नाही. तेव्हा चीनने दुसरा, सुलभ पर्याय निवडला. तो म्हणजे चलनाची किंमत कमी करण्याचा. चीनने स्वत:च्या हातानेच चलनाची किंमत कमी केल्यामुळे निर्यात न वाढवताही त्या देशास अधिक किंमत मिळवण्याची व्यवस्था झाली. आंतरराष्ट्रीय व्यापार हा डॉलरमध्ये होतो. चीनने आपल्या मातृचलनाची- म्हणजे युआनची-  किंमत कमी केल्यामुळे त्या तुलनेत डॉलरची किंमत वाढणार. याचा परिणाम असा की चीनशी व्यापार करणाऱ्या दुसऱ्यास त्याचा फटका सहन करावा लागणार. चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारउदिमाचा आकार अफाट असल्यामुळे युआनच्या दरकपातीचा फटका जवळपास साऱ्या जगालाच बसला. आपला रुपयादेखील त्याचमुळे या चिनी वरवंटय़ाखाली रगडला गेला. वस्तुत: चीनप्रमाणे आपणासदेखील रुपयाच्या अवमूल्यनाचा फायदा होऊ शकला असता. पण त्यासाठी आपली निर्यात तगडी हवी. आपले घोडे त्याच आघाडीवर पेंड खाते. निर्यात जर तगडी असती तर प्रत्यक्षात तितकेच डॉलर मिळूनही त्याचे अधिक मोल आपल्या हाती लागले असते. परंतु अशक्त निर्यातीमुळे आपल्या हातून हे चलन दर लढय़ातून मिळणारे तेल आणि तूप दोन्ही गेले.
आणि उलट महाग डॉलरचे धुपाटणे मात्र पदरी पडले. कारण या युआनच्या दरकपातीमुळे डॉलरचे मोल वाढले. आपण देश म्हणून मोठय़ा आयातीवर जगत असल्यामुळे वाढलेल्या डॉलरमुळे आपला खर्च वाढणार. दोन वस्तूंच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेस मोठे ओरखडे पडतात. खनिज तेल आणि सोने. आपणास आपल्या एकूण गरजेपकी ८३ टक्के इतके खनिज तेल आयात करावे लागते. त्यामुळे डॉलर महाग झाला तर तेलासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ भारतावर येते. तेल ही आपली गरज आहे तर सोने खरेदी ही केवळ चूष आहे. भारतीयांच्या सोन्याची भूक भागेल इतके सोने आपल्या मातीत पिकत नाही. त्यामुळे ते आयात करण्यास पर्याय नसतो. ही आयातीची किंमत डॉलरमध्ये चुकवावी लागत असल्यामुळे डॉलर महागणे आपणासाठी धोक्याचे असते. परंतु हा धोका तूर्त जाणवणारा नाही. कारण खनिज तेल आणि सोने या दोन्हींच्या दरांत आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरण झाल्यामुळे भारताची लाज राखली गेली. म्हणजे याचाच दुसरा आणि महत्त्वाचा- अर्थ असा की आपले सध्या बरे चालले आहे असे जे आपणास वाटत आहे त्यामागील कर्तृत्व आपले नाही. इतरांचे वाईट चाललेले असल्यामुळे आपणास तौलनिकदृष्टय़ा बरे वाटू लागले आहे, इतकेच.
तेव्हा आसपास जे काही चाललेले आहे ते पाहता आपले बरे वाटणे असेच अबाधित राखावयाचे असेल तर सरकारने तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे. कारण इतरांच्या वाईटावर आपले फार काळ बरे चालू शकत नाही. बँकांच्या ताज्या आकडेवारीने आपणास हाच इशारा दिला आहे. ही आकडेवारी आहे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची. ही कर्जे घेण्याचे प्रमाण सध्या लक्षणीयरीत्या घसरले असून याचा संबंध उद्योगमंदीशी जोडला जात आहे. गत वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा तब्बल पाच टक्क्यांनी पतपुरवठा घसरला असून हे प्रमाण २० वर्षांतील नीचांकी आहे. उद्योग, कृषी आणि सेवा या सर्वच क्षेत्रांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाना मागणी नाही. म्हणजे ही गती मंदावणे सार्वत्रिक आहे. अर्थव्यवस्थेचे मानवी आरोग्याप्रमाणे असते. प्रकृती मुदलातच सुदृढ असेल तर साथींच्या आजारांची तितकी भीती बाळगण्याचे कारण नसते. परंतु प्रकृतीच तोळामासा असेल तर साधी सर्दीपडशाची साथदेखील जिवावर उठते. अर्थारोग्याबाबत आपण दुसऱ्या गटात मोडतो. तेव्हा काय होऊ शकते याचा अंदाज बांधणे अवघड नाही. चीनच्या चलनाच्या वलनाचे हे सांगणे आहे.