ज्या केदारनाथकडे पायी चालत जाणेही कठीण असते तेथे मोठमोठाली हॉटेल्स, दुकाने तसेच टपऱ्या बांधून आपण एकप्रकारे निसर्गावर दडपण आणत आहोत. या धार्मिक स्थळांना भेटी देण्यामागे खरेच कोणती भावना असते. नुकतेच मकरसंक्रातीच्या वेळी कुंभमेळ्याच्या निमित्ताने अलाहाबाद रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक(?) मृत्युमुखी पडले. ५/६ वर्षांपूर्वी वाईजवळ काळुबाईच्या दर्शनाला आलेले शेकडो भाविक पायऱ्यांवरून घसरून मृत्यू पावले. या ठिकाणी अपघात झाल्यावर वर चढून जाण्यास खुद्द साताऱ्याच्या जिल्हाधिकारींना ३/४ तास लागले, कारण संपूर्ण रस्ता आडव्यातिडव्या रीतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे अडविला गेला होता. एवढे भाविक एकाच वेळी का जमा होतात? त्यामागे ‘श्रद्धा’ किती व दिखाऊपणा किती? एक गेला म्हणून दुसरा गेला. देवाधर्माला जाणे म्हणजे केवळ खोटय़ा प्रतिष्ठेचे लक्षण आहे? ‘साई भंडारा’चे वाढते प्रस्थदेखील चिंताजनक नव्हे काय? हा धार्मिक उन्माद नव्हे काय? व असे हे धार्मिक स्तोम कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार? निसर्ग आपत्ती एकवेळ परवडेल, पण हा धर्माच्या नावाखाली होणारा गोंधळ लवकरच आवरता घेतला पाहिजे.
शरद वर्तक, चेंबूर

देवभूमीतील आपत्तीकडे देवस्थानांचे दुर्लक्ष
उत्तराखंड राज्यातील आपद्ग्रस्तांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आता निवारा, अन्नधान्य, कपडे, रोख रक्कम आदी मदत पुरविण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था पुढे आल्या आहेत आणि येत आहेत. परंतु एक आश्चर्याची बाब म्हणजे देशातील सर्वाधिक धनाढय़ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या प्रमुख देवस्थानांनी मदतकार्याला हातभार लावल्याची बातमी अद्याप वाचनात आलेली नाही.
पद्मनाभस्वामी (थिरुअनंतपुरम), वैष्णोदेवी (काश्मीर), बालाजी (तिरुपती), साईबाबा (शिर्डी), सिद्धिविनायक (मुंबई), दगडूशेठ हलवाई गणपती (पुणे) ही देशातील अतिश्रीमंत गणली गेलेली देवस्थाने. त्यांची दानाच्या स्वरूपातली दररोजची मिळकतही काही लाखांतली आहे. देवासाठी मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड याची या सगळ्याच देवस्थानांची संपत्ती कोटीच्या घरात आहे. केवळ मूर्तीला हार-फुले वाहून, आरती म्हणून प्रसाद वाटणे ही ईश्वरभक्ती नाही; ती परोपकाराने सिद्ध करावी लागते. देव दीनांच्या मदतीला धावतो हे या देवस्थानांचे विश्वस्त ज्या दिवशी प्रत्यक्ष कृतीने दाखवून देतील तो सुदिन.

किती बँकांत ग्राहकाभिमुख सेवा!
सर्वसमावेशक आर्थिक विकास व्हावा यासाठी बँकिंग सेवेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकारने बँक राष्ट्रीयकरणापूर्वीची स्थिती निर्माण करून खासगी उद्योगसमूहांना बँका स्थापन करण्याची मुभा दिली आहे. त्याआधी किती बँका ग्राहकाभिमुख सेवा देत आहेत हे पाहणे गरजेचे आहे. रुपी बँकेसारखी डबघाईला आलेल्या बँकांतील ठेवीदारांना, खातेदारांना त्यांच्या अडकलेल्या पैशाबाबत दिलासा मिळणे गरजेचे आहे. अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक यांसारख्या पाच बँका त्यांच्या दुष्कृत्यांमुळे वादात सापडल्या आहेत. ही सर्व प्रकरणे मार्गी लागली पाहिजेत, नंतर उद्योगसमूहांना बँकिंग परवाने देण्याचा विचार व्हावा, अन्यथा शिक्षण क्षेत्रातील ‘शिक्षण सम्राटां’प्रमाणे याही क्षेत्रात ‘बँकिंग सम्राट’ निर्माण होतील.
अरविंद शं. करंदीकर

प्रगतीचा मार्ग
नुकतेच काझीगुंड ते बनिहाल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. काश्मीर खोरे आणि जम्मू यांना जोडणारा हा बोगदा म्हणजे नुसतीच दळणवळणातील प्रगती नसून खरेतर काश्मीर खोऱ्यातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रमुख मार्ग आहे.
स्वस्त आणि सुलभ दळणवळण हे आíथक प्रगतीला निश्चितच फायद्याचे ठरते आणि त्याचबरोबर एखाद्या प्रदेशातील अस्थर्यावर तो उत्तम उपाय ठरतो. राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक-१ अ) हा या आधीच जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील दुवा असला तरी अरुंद रस्ता, पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण, हिवाळ्यातील प्रचंड बर्फवृष्टी, रात्रीच्या प्रवासास मनाई त्या बरोबरच आठवडय़ातील ३ दिवस जम्मूकडे आणि ३ दिवस श्रीनगरकडे जाण्यास परवानगी या साऱ्यांमुळे हा प्रवास वेळखाऊ, खर्चीक आणि धोकादायक आहे                            
अभिषेक पराडकर, वरळी                 

जनतेचा वृत्तपत्रांवरच विश्वास!
‘माजोरी माध्यमवीर’ या अग्रलेखातून (२८ जून) इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि त्यांच्या अँकरबद्दल आपण परखड लिखाण केल्याबद्दल आपले अभिनंदन!
आजकाल कोणीही पैसेवाला उठतो, तो मग राजकारणी,  बिल्डर असो वृत्तपत्र वा चॅनेल सुरू करीत आहे. त्यामुळे मालक सांगणार ते लिहिणार, चॅनेलवर दाखविणार. अशांकडून कोणती नि:पक्षपाती पत्रकारितेची अपेक्षा करणार?.
आज प्रत्येक चॅनेल आपला टीआरपी वाढविण्याकरिता वाटेल त्या सवंग बातम्या रात्रंदिवस प्रसारित करीत आहे. सर्वसामान्य जनतेचा मात्र अजूनही वर्तमानपत्रातील बातम्यांवर विश्वास आहे.
बातम्यामध्ये काहीवेळा ‘मी’पणा  दिसू लागला आहे. तरीही त्या विश्वासाला तडा जाऊ न देणे हे सर्वच माध्यमांच्या पत्रकारांचे कर्तव्य आहे. त्याकरिता समाजाला दिशा देता येत नसेल तरी चालेल, पण समाजाची दिशाभूल करू नका!
विजय कदम, लोअर परेल

अंगडिया आणि मौल्यवान सामान
अंगडियाविषयीची माहिती वाचली (३ जुलै). मुंबई ते अहमदाबाद असा नेहमी प्रवास करणाऱ्यांना अंगडियाची माणसे नेहमी दिसतात. रात्री मुंबईतून निघणाऱ्या गुजरात मेल, लोकशक्ती एक्स्प्रेस अशा गाडय़ांमध्ये या प्रवाशांची नेहमी गर्दी असते. दररोज १०० ते १५० तिकिटे स्लीपर कोचमध्ये या लोकांची आरक्षित असतात. काही माहिती विचारल्यावर कुरिअर कंपनीचे सामान आहे, एवढीच माहिती या माणसांकडे असते. मात्र जे सामान आहे ते मौल्यवान आहे, याची त्यांना माहिती असते. मात्र ही माणसे अनुभवी असतात आणि खूप वष्रे या सामानाची ने-आण करीत असतात. केवळ सामान पोहोचविण्याचेच काम करून हे लोक मोबदला कमावतात.  
सुयोग गावंड, अहमदाबाद

व्होल्टासमध्ये फक्त
७० कंत्राटी कामगार
व्होल्टास कंपनीच्या ठाणे येथील प्रकल्पात गरजेपोटी केवळ ७० कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आले असून त्यामध्ये सुरक्षा रक्षक, सफाई कामगार आणि बागकाम करणारे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून कायद्यानुसार केवळ आठ तासच काम करून घेतले जाते, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. १२ ते १४ तास काम करण्यासाठी शेकडो कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आल्याची माहिती चुकीची आहे. ‘असलेल्या कायद्यांकडे दुर्लक्षामुळेच ‘कंत्राटी’ दुखणे..’ या शीर्षकाखाली मार्कुस डाबरे यांच्या पत्राबाबत (लोकमानस, ७ जून) कंपनीने सदर स्पष्टीकरण केले आहे.

गुरूची दखल घेणार का? ज्यांनी अनेक क्रिकेटवीर घडविले, त्या विठ्ठल पाटील या प्रशिक्षकाची अवस्था वाचून वाईट वाटले.           (२ जुलै) अनेकांना अशा अनुभवातून जावे लागत आहे. हे थांबले पाहिजे.  आता तरी त्यांचे शिष्य आपल्याला क्रिकेटवीर बनविणाऱ्या गुरूची दखल घेतील  व त्यांच्या अडचणी सोडवतील अशी अपेक्षा आहे.
उमेश मोरे