News Flash

चेन्नईतील ‘मद्रास’ दर्शन

‘डिग्री कॉफी बाय द यार्ड- अ शॉर्ट बायोग्राफी ऑफ मद्रास’ हे पुस्तक म्हणजे आठवणींच्या वाफाळत्या कॉफीसोबतचा मद्रासच्या राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक इतिहास आणि वर्तमानाचा धावता आलेख

| September 28, 2013 01:05 am

‘डिग्री कॉफी बाय द यार्ड- अ शॉर्ट बायोग्राफी ऑफ मद्रास’ हे पुस्तक म्हणजे आठवणींच्या वाफाळत्या कॉफीसोबतचा मद्रासच्या राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक इतिहास आणि वर्तमानाचा धावता आलेख आह़े  त्याला लेखिका निर्मला लक्ष्मण यांनी वदंता, संशोधन, अभ्यास, सर्वेक्षण आणि विश्लेषण यांची जोड दिली आह़े  त्यामुळे हे तर आठवणी- अनुभवकथन आहे, असे वाटेपर्यंत त्या शहराच्या घडणीचा इतिहास सांगायला लागतात़  आणि अचानक दोन-पाच व्यक्तींशी बोलून केलेल्या रिपोर्ताजसारखंही लिहितात.
पुस्तकाची सुरुवात जानेवारीमधल्या गुलाबी थंडीतील रम्य पहाटेच्या समुद्रकिनाऱ्यावरील वर्णनाने होत़े  ते करताना म. गांधींच्या मद्रासभेटीची आठवण करून देत लेखिका भूतकाळातील काही गोष्टी सांगत़े  १९९६ नंतर मद्रासचे चेन्नई झाले, तरी या अद्ययावत चेन्नईत खूपसा मद्रास शिल्लक आहे, असे ‘मद्रास’मध्ये वाढलेल्या लेखिकेला राहून राहून वाटत़े  त्यासाठी नवनव्या पद्धतीचे टी-शर्ट बनवणाऱ्या कंपनीच्या घोषवाक्यापर्यंतचा दाखला दिला आह़े  या कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे की, ‘आमच्या (चेन्नईवासीयांच्या) जीवनात लुंगीचा बम्र्युडा होण्यापर्यंत बदल झाला असला, तरी या नव्या शैलीतही आम्हाला आमच्या संस्कृतीचे संवर्धन करायला आवडत़े.’
दुसऱ्या प्रकरणात पुरातत्त्व विभागाच्या नोंदीचे दाखले देत लेखिकेने प्राचीन तमिळ राज्यकर्त्यां वंशांचा गौरव केला आह़े  सम्राट अशोकाच्या स्तंभावर त्याच्या साम्राज्याचा भाग नसलेल्या, म्हणजेच स्वतंत्र असलेल्या तत्कालीन चोला, चेरा आणि पांडय़ा या तमिळ वंशांचा उल्लेख आहे. इतकेच नव्हे तर भारतीय उपखंडातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाची साक्ष देणारी सर्वात पहिली दगडी कुऱ्हाड चेन्नईची उपनगरे असलेल्या पल्लवरम आणि अट्टीरामपक्कम या भागात सापडली होती, असे लेखिका नमूद करते.
दक्षिणेतील मंदिरे हा नेहमीच सर्वाच्या आकर्षणाचा विषय राहिला आह़े  या पुस्तकात चेन्नई आणि जवळपासच्या पुरातन मंदिरांची साधार माहिती दिली आह़े  तिरुवेल्लीकेनी येथील पार्थसारथी स्वामी मंदिराचा ‘शहराचे बोधचिन्ह’ असा उल्लेख केला आह़े आणि ब्रिटिशकालीन चर्च, त्यांची बांधणी, आख्यायिका यांचीही वर्णने आहेत.  
१६३९ च्या सुमारास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला या भागात वखारी स्थापण्यास भूखंड मिळाला आणि मद्रास शहर वसण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली़  ब्रिटिशांनी भारतात इतरत्र राबवलेली धूर्त राजनीती येथेही कशी राबवली याचे रोचक वर्णन केले आह़े  वानगीदाखल एक गोष्ट सांगता येईल- स्वत:च्या शिक्क्यांनी नाणी पाडण्याचा अधिकार मिळण्यापूर्वी ब्रिटिशांनी नाणी पाडून ती वितरितही केली होती़  मात्र मुघल बादशहा औरंगजेब याच्यापर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर त्याने संतापून याची चौकशी करण्यास सांगितल़े, पण धूर्त ब्रिटिशांनी  शिताफीने आणि चपळाईने ती नाणी नष्ट करून टाकली. ती काही केल्या तपासणीत सापडली नाहीत.़  ती सापडली असती तर कदाचित आज भारताचा इतिहास वेगळा असता, असे लेखिका म्हणत़े
वखारीच्या राजकारणावरून ब्रिटिशांवर फ्रेंचांनी केलेल्या स्वाऱ्या, त्यात ब्रिटिशांना गमवावे लागलेले शहर आणि पुन्हा त्यांनी शहराचा मिळवलेला ताबा, हा इतिहास रंजकतेने मांडला आह़े  पण तिथेच न थांबता काँग्रेसचे अधिवेशन, स्वातंत्र्य, तामिळनाडूसाठीचा लढा, डीएमके- अण्णा डीएमके अशा सगळ्या घटनांचा धांडोळा घेत सध्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यापर्यंतचा राजकीय इतिहास मांडला आह़े
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडू किंवा चेन्नई कसे आघाडीवर होते, हे दाखवण्याचाही  प्रयत्न केला आह़े  त्यासाठी ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद, उमेदीच्या काळात चेन्नईत राहिलेला लिएण्डर पेस अशांचा या शहराशी असलेला संबंध सांगितला आह़े  पण अभिनिवेशात एक संदर्भ चुकला आह़े  चेन्नईत एका भारत-पाक क्रिकेट सामन्यात पाकने विजय मिळवल्यावर स्टेडियममधील क्रीडाप्रेमींनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला, ही चेन्नईची खिलाडूवृत्ती आहे; मुंबईत मात्र पाकने विजय मिळवल्यानंतर खेळपट्टी उखडून टाकण्यात आली होती, असे लेखिकेने नमूद केले आह़े  वस्तुत:  सामना होऊच नये म्हणून खेळपट्टी उखडण्यात आली होती़
दादासाहेब फाळके यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण करण्याआधी चित्रपट भारतात आणि दक्षिणेत, त्यातही चेन्नईत कसा पोचला इथपासून तमिळ चित्रपटांची निर्मिती ते रजनीकांत, कमल हसनपर्यंतच्या प्रवासावर दृष्टिक्षेप टाकला आह़े  असाच संगीत क्षेत्राचाही आढावा आह़े
पुस्तक वाचताना लेखिकेच्या दांडग्या जनसंपर्काचा आणि समृद्ध अनुभवविश्वाचा सातत्याने प्रत्यय येत राहतो़  एकदा तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी समुद्रकिनारी बसले होते.़  सुरक्षेचे नियम तेव्हा आजच्याइतके कडक नव्हत़े  लेखिकेच्या लहानग्याने मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा हट्ट धरला आणि तो तडक त्यांच्यापाशी जाऊन बोलू लागला़  त्याने निरागसपणे आपले नाव मुख्यमंत्र्यांना सांगितल़े  त्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी कोणताही ताठा न दाखवता ‘मी करुणानिधी’ अशी स्वत:ची ओळख करून दिली़  दूरवर उभी असलेली लेखिका चकित झाली़  असे अनेक किस्से या पुस्तकात आहेत़
शेवटचे प्रकरण शीर्षकानुसार कॉफीविषयी आहे. चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये बनवण्यात येणारी कॉफी, तिच्या विविध पद्धती आणि त्याच्याशी निगडित आठवणी सांगितल्या आहेत़  साधी कॉफी, फिल्टर्ड कॉफी आणि हो कुंबकोनम येथील ‘डिग्री कॉफी’, जी आता चेन्नईमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध आहे, अशा काही कॉफींची रसभरीत वर्णने केली आहेत़  
एकंदरीत, या पुस्तकातून मद्रास शहर बऱ्यापैकी जाणून घेता येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:05 am

Web Title: degree coffee by the yard a short biography of madras
Next Stories
1 एका शहराची अनुभवगाथा
2 नैतिकतेची मूल्ये
3 जगावं की मरावं?
Just Now!
X