देवयानी खोब्रागडे हे नाव महाराष्ट्राला सर्वप्रथम मोठय़ा प्रमाणात आदर्श घोटाळा उघडकीस आला त्या वेळी ठाऊक झाले. त्या भारतीय विदेश सेवेतील अधिकारी आहेत आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील तत्कालीन अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आहेत, हेही ओघानेच त्या वेळी ठाऊक झाले. उत्तम खोब्रागडे यांची महाराष्ट्र केडरमध्ये असणारी तथाकथित प्रतिमा ही स्वच्छ चारित्र्याचे आणि कडक शिस्तीचे अधिकारी अशी होती. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांनाच याविषयी विचारणे बरे. वरवर चारित्र्यसंपन्न वाटणारे कितीतरी अधिकारी प्रशासनात उच्चपदस्थ म्हणून काम करताना दिसतात. सर्वच गोष्टींना पुरावे देण्याची गरज नाही, पण देवयानीला आदर्शमध्ये गाळा उपलब्ध करून देताना त्यांच्या पिताश्रींची मदत झाली नसावी, असे कसे म्हणावे. सध्या खोब्रागडे हे मागासवर्गीय युवकांनी प्रशासनात कसे यावे, यासंबंधी अधूनमधून मार्गदर्शन करीत असतात, ही तशी चांगलीच गोष्ट आहे. दलितांनी राज्यकर्ती जमात बनावे, हे बाबासाहेबांचे स्वप्न होतेच.
नुकताच आदर्शचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. तो नाकारण्यात आला असला तरी सत्य काय ते किमान समोर आलेच आहे. त्यात देवयानी यांनी आदर्शमध्ये गाळा मिळण्यासाठी कशा प्रकारे खोटी माहिती दिलेली आहे, हे साक्षात समोर आले आहे. अमेरिकेतले प्रकरण आणि आदर्श अहवाल हे एकाच वेळी घडणे यात योगायोग मानला तरी खोटी माहिती देणे, या दोन्ही प्रकरणांतला अधोरेखित भाग आहे. भारतीय विदेश सेवेतील अशा प्रकारे स्वत:च्या स्वार्थासाठी देवयानीसारख्या अधिकाऱ्यांनी खोटे बोलणे, हा गुन्हा मानला तर त्यांना एवढय़ा ‘महान’ नोकरीत राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का, हा खरा प्रश्न आहे. खोटे बोलणे, तेही भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना स्मरून, ही यांची उपजत वृत्ती असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. बाकी तपशिलात मला जावयाचे नाही. अमेरिकेचा माजोरीपणा वगैरे गोष्टी आहेतच, पण कायद्याचे समानत्व स्वीकारले पाहिजे. देवयानीवर अमेरिकेत अन्याय होऊ नये हे भारतीय म्हणून मलाही वाटतेच. त्याचबरोबर आपल्या कुठल्याही कृत्याने आपल्या देशाची प्रतिमा मलिन होऊ नये, याची देशात आणि देशाबाहेरही खऱ्या भारतीयाने काळजी घ्यायला हवी. देवयानी खोब्रागडेंचे बेजबाबदारपण देशात आणि देशाबाहेर दोन्ही ठिकाणी अधोरेखित होतेय, याचे नवल वाटते. खरे तर अशा अधिकाऱ्यांना कायमचा थेट घरचा रस्ता दाखवायला हवा. उच्चपदस्थांचा माजोरीपणा आणि कायद्याला बेदखल करण्याची वृत्ती आपल्याकडे खपवून घेतली जाते, एवढेच नाही तर गोंजारली जाते, हे दुर्दैव आहे.
मीही एक मागासवर्गीयच आहे. खोब्रागडे, कांबळे, मेश्रामवर अन्याय झाल्यास दलितांवर अन्याय म्हणून ऊर बडविला जातो. खरे तर दलितांनी बाबासाहेब, महात्मा गौतमबुद्ध यांना वेठीला धरणे सोडावे. आज दलितांकडे इतर समाजवर्ग संशयाने पाहतात त्याची कारणे शोधणेही गरजेचे आहे. म. गौतमाने दिलेला पंचशील आणि त्रिसरणाचा मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या खोब्रागडे प्रवृत्ती यांचा काय संबंध? केवळ दलित आहेत म्हणून लाड कशासाठी? उच्चपदस्थ दलितांचा आणि खेडय़ापाडय़ातल्या कष्ट करणाऱ्या दलितांचा जाणिवांच्या पातळीवरचा संबंध पूर्णपणे संपुष्टात आला आहे. पण सर्वार्थाने सत्ताहीन असणाऱ्या दलितांना जो बाबासाहेब आणि महात्मा गौतम समजतो तो खोब्रागडे वगैरे मंडळींना नाही. असे हजारो खोब्रागडे आहेत. तूर्तास हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आंबेडकरी चळवळीचे नाव बदनाम करणाऱ्या ‘आदर्श’ प्रवृत्तीला खऱ्या आंबेडकर भक्ताने कधीही थारा देऊ नये.
बाबासाहेबांआधी अस्पृश्यतेचे ‘हीन’ या वर्गाने शतकानुशतके डोक्यावर वागविले. आताचे ब्राह्मण्यवादी दलितांचे ‘हीन’ त्यापेक्षाही वाईट आहे. मी ब्राह्मणांना कधीही दोष देत नाही, वृत्तीला देतो. आंबेडकरी चळवळीतील दलितेतरांना मूर्ख समजणारे लोकही मला चळवळीचे खरे मारेकरीच वाटतात. दैनिक ‘लोकसत्ता’ने ज्या रीतीने खोब्रागडे प्रकरणाचा लेखाजोखा मांडला, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.

हीच कारणे गुणवत्ता कमी होण्याची
शाळा चालतात किती दिवस? हा हेरंब कुलकर्णी यांचा लेख (२१ डिसेंबर) वाचण्यात आला. कोणीतरी प्राथमिक शाळांची वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे   पाहून आनंद झाला. आधीच असलेल्या भरपूर सुटय़ांमध्ये नाताळच्या सुटय़ांची भर घालून शिक्षक, विद्यार्थ्यांना चक्क मोकळे रान उपलब्ध केले आहे. मुळात कामाच्या      दिवसांत पण बऱ्याच शाळांत आनंदीआनंदच असतो. शिवाय शिक्षकांनाही इतर अवांतर कामे. आपण म्हटल्याप्रमाणे शिक्षकांना जर आठवडय़ाचे १५ तास चिंतनच करावे    लागत असेल तर इथे येण्यापूर्वी त्यांनी केले तरी काय हा  प्रश्न उपस्थित होतो. आणि मग उरलेल्या वेळेत केलेल्या अध्यापनाचे चिंतन मुलांनी केव्हा करायचे? आणि जरी     त्या तथाकथित चिंतनाला वेळ दिला तर खरोखर ते शिक्षक चिंतन करतात का? आणि करतही असतील तर         त्यांच्या ‘प्रभावी’ अध्यापनाने गुणवत्ता का वाढत नाही? एकंदरीत कामचुकारपणा मग तो विद्यार्थ्यांचा किंवा शिक्षकांचा आणि सुटय़ांचे लोण तसेच मुलांच्या गुणांना जोपर्यंत       वाव मिळत नाही तोपर्यंत तरी गुणवत्ता वाढणे शक्य नाही  असे वाटते.
मंगेश कर्डिले

शिक्षकांवरील असूयेचा आणखी एक नमुना
‘शाळा चालतात किती दिवस’ हा हेरंब कुलकर्णी यांचा लेख वाचला. लेखातील काही बाबींमध्ये तथ्य आहे. मात्र अनेक बाबी अवास्तव, एकांगी व अतिविशालित आहेत. लेखाऐवजी लेखकाच्या विचारप्रक्रियेविषयी काही शंका निर्माण होतात. या शंका लेखकास आत्मपरीक्षणासाठी उपयुक्त वाटतात.
१) नक्षलवादी हा मुळात अत्यंत संवेदनशील माणूस असतो. व्यवस्थेतील त्रुटींवर तो प्रहार करू लागतो. हळूहळू याच त्रुटी त्याच्या अस्तित्वाचा आधार बनतात. व्यवस्थेतील सुधारणा, व्यावहारिक बाबी त्याच्या अव्यक्त मनाला नकोशा हेतात आणि संपूर्ण व्यवस्थेला तो शत्रू मानू लागतो आणि तो खऱ्या अर्थाने नक्षलवादी विचारांचा होतो. संबधित लेखकाचा प्रवास याच मार्गाने तर नाही ना?
२) मी या लेखकाचा पहिल्यापासून वाचक आहे. शिक्षणाविषयी परखड विश्लेषण करणारा म्हणून त्यांच्याविषयी आदरही आहे. हळूहळू त्यांची शिक्षणव्यवस्थेऐवजी शिक्षकांवरच टीका वाढत गेली. नंतर शिक्षकांविषयी राग जाणवू लागला. या लेखाचा शेवट वाचताना शिक्षकांविषयी रागाची पातळी तिरस्कार व संतापाच्या पातळीवर तर गेली नाही ना अशी शंका येऊ लागली. स्वत: शिक्षक असणाऱ्या व्यक्तीतील या तिरस्काराची उपपत्ती सिग्मंड फॉइडच्या प्रेक्षपणक (प्रोजेक्शन) या संरक्षण यंत्रणेत तर नाही ना?
३) आज वास्तवात असणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थ्यांच्या वर्गावर आठवडय़ात ४८ तास किंवा ३० तास अध्यापन करण्याचा प्रयोग स्वत: वर्ष दोन वर्ष करून निष्कर्ष काढण्याऐवजी केवळ आकडेमोड करण्याचा प्रयत्न म्हणजे पॅसिव्ह अ‍ॅग्रेशन तर नाही ना?
या फक्त शंका आहेत. योग्य वाटल्या तर लेखक विचार करतीलच, नाही तरी पुढचे लेख आम्ही वाचणार आहोतच.
राजा दीक्षित

अमेरिकेचे समर्थन का?
मागील काही दिवसांपासून ‘लोकसत्ता’ संपादकीयमध्ये एकांगी लिखाण केले जात आहे. उदा. अण्णा हजारे, अरिवद केजरीवाल आणि आता देवयानी खोब्रागडे. देवयानीबद्दल लिहिताना अमेरिकेची आणि भराराची बाजू जबरदस्त उचलून धरली. असे लिखाण करताना दोन्ही बाजूंचा अभ्यास करायला पाहिजे होता. एका सर्वात मोठय़ा लोकशाही देशाच्या प्रतिनिधीला बेडय़ा ठोकून गुन्हेगार आणि चोरांच्या कोठडीमध्ये तेसुद्धा इतर कोठडी रिकामी असताना ठेवणे. दिवाणी गुन्हा जो सिद्ध व्हायचा आहे, त्यासाठी डीएनए टेस्ट करणे जे ड्रग तस्करांचे केले जाते. याला घमेंड, मग्रुरी आणि सत्तेची नशा कारणीभूत आहे आणि ती उतरवायला पाहिजे. जे काम भारत सरकारकडून होत आहे, त्याचे समर्थन करण्याऐवजी अमेरिकेचे कशासाठी?
डॉ. संदेश भगत, यवतमाळ.

संधी घालवू नका
प्रीत भरारा यांनी देवयानी यांना अटक करून एक चांगला ‘आदर्श’ घालून दिला आहे. भारतातील या नवसंस्थानिकांना कायद्याची भीती मुळीच नाही. आपण काही केले तरी चालून जाते असे यांना वाटते. भरारा यांचे विश्लेषणही अचूक आहे. संगीता रिचर्ड भारतात असत्या तर त्यांच्यावर यांनी नक्कीच दबाव आणला असता. या लोकशाही असणाऱ्या, उद्याची महासत्ता, उज्ज्वल आणि महान परंपरा वगरे असणाऱ्या देशातल्या लोकांना, कायदा काय असतो, त्याची अंमलबजावणी काय असते आणि कायद्यासमोर सर्व समान असतात, हे दाखवून देण्याची खूप मोठी संधी आहे. ही संधी घालवू नका.
सचिन पवार