चीनने दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रातील काही बेटांच्या ‘मालकी’च्या मुद्दय़ावरून पूर्व आशियात युद्धज्वर निर्माण करणे आणि अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर भारताचे राष्ट्रपती जाताच प्रसिद्धी माध्यमांतून कावकाव करणे या दोन भिन्न गोष्टी असल्या, तरी त्यात एकच सूत्र आहे. ते म्हणजे चीनच्या ‘साम्राज्यवादी’ धोरणाचे. हे धोरण काही आजचे नाही. भारतास त्याचा अर्धशतकाचा अनुभव आहे. ज्या अरुणाचल प्रदेशच्या मुद्दय़ावरून चीनची अधिकृत ‘शिन्हुआ’ वृत्तसंस्था थयथयाट करीत आहे, या प्रदेशात भारताने अतिक्रमण केले असा अपप्रचार करीत आहे, तो म्हणजे आपला जुना नेफा विभाग. २० ऑक्टोबर १९६२च्या भल्या पहाटे चीनने आक्रमण केले ते याच नेफावर हक्क सांगत. त्या युद्धात भारताचे मोठे नुकसान झाले, पण त्यामुळे चीनचाही फायदा झाला नाही. गतवर्षी या युद्धास ५० वष्रे पूर्ण झाली, त्यावेळी चिनी साम्यवादी पक्षाच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या चिनी वृत्तपत्रातील एका लेखात याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. ‘या युद्धाने चीनला आपला गमावलेला प्रदेश हस्तगत करता आला नाहीच, पण त्याने एक नवा स्पर्धक निर्माण केला,’ असे त्या लेखात शांघाय इन्स्टिटय़ूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे लिवू झोंगी यांनी म्हटले आहे. तथापि भारतातील या ‘उगवत्या सूर्याच्या प्रदेशा’वर हक्क सांगणे चीनने सोडलेले नाही. चीनच्या म्हणण्यानुसार, १९१४ मध्ये ब्रिटिशांनी गुपचूप ‘मॅकमहॉन रेषा’ निर्माण केली आणि चिनी-तिबेटमधील मोन्यूल, लोयूल आणि लोअर सायूल हे तीन भाग भारतास दिले. त्यामुळे या किंवा अन्य वादग्रस्त सीमाभागात चीन अधूनमधून घुसखोरी करीत असते. गेल्या एप्रिलमध्ये लडाखमध्ये चिनी सनिकांनी आपले तंबू उभारले होते, तर ऑगस्टमध्ये अरुणाचलमध्ये घुसखोरी करून तीन दिवस तळ ठोकला होता. भारताच्या दबावानंतर त्यांनी माघार घेतली, पण या प्रदेशावरील दावा मात्र सोडलेला नाही. त्यातही अरुणाचलमधील तवांगवर चीनचा डोळा आहे. ही सहाव्या दलाई लामांची जन्मभूमी. हा भाग तिबेटला खेटूनच आहे. त्यामुळे तो चीनच्या दृष्टीने महत्त्वाचा. आपल्या ताज्या अरुणाचल दौऱ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी चीनच्या या दाव्यालाच सुरुंग लावला. अरुणाचल विधानसभेत बोलताना राष्ट्रपतींनी हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे ठणकावून सांगितले. आणि ते सांगताना या भागाशी भारताचे कसे पौराणिक नाते आहे हेही सांगितले. या भाषणामुळेच चिनी माध्यमांचे पित्त खवळले  असावे. मात्र २००९ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यानंतरची आणि आताची चीनची प्रतिक्रिया यांत खूप फरक आहे. तेव्हा चीनने भारताला ‘वाईट परिणामां’ची धमकी दिली होती. त्यामानाने आताचा थयथयाट खूपच मवाळ आहे. त्याला कारण चिनी समुद्रातील घडामोडी हे असावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतावर आक्रमण करणे हे आता सोपे राहिलेले नाही. हे लिवू झोंगी यांच्यासारख्या चिनी विश्लेषकांचेच मत आहे. भारत-चीन सीमाप्रश्न सोडविण्यासाठी वाटाघाटी हाच सोपा मार्ग आहे आणि त्या सुरू आहेत. त्यात अडथळा आहे, तो तवांगचा. तेथील एक इंच भूमी सोडण्यासही भारताची तयारी नाही. त्यामुळे भारत-चीन सीमाप्रश्नाचे उत्तर कोणाच्याही दृष्टिपथात नाही. सध्या चिनी माध्यमांत सुरू आहे तो थयथयाट निष्फळच आहे.