‘पोलीस हा जनतेचा मित्र असतो’ असे पोलीस खात्यातील वरिष्ठ कित्येकदा कानीकपाळी ओरडून सांगत असतात. पण त्यावर समाजाचा फारसा विश्वास नसतो, असा निष्कर्ष कुणीतरी मागे केव्हातरी केलेल्या सर्वेक्षणातच निघाला होता. त्यामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी, पोलीस हा मित्र वाटावा यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी शिफारसही त्या सर्वेक्षणानंतरच्या अहवालात करण्यात आली होती. पण बहुधा इतर अनेक सर्वेक्षणांचे आणि त्यांच्या अहवालांचे पुढे जे होते, तेच या अहवालाचेदेखील झाले असावे. म्हणून वर्दीधारी पोलिसास मित्र मानताना सामान्य माणूस अजूनही बिचकतो. दहादा विचार करतो. पोलीस दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आजवर जवळपास प्रत्येक दलप्रमुखाने जनतेसोबत सौहार्दाचे नाते निर्माण करण्याचा संकल्प सोडलेला सर्वानाच ऐकिवात असेल. आपण सोडलेला हा संकल्प पुरा करू शकलो नाही याची खंत उराशी घेऊनच अनेकांची प्रमुखपदाची कारकीर्द संपते. निवृत्तीनंतर अनेक पोलीस अधिकारी खासगीत ही खंत व्यक्त करतानाही दिसतात. पोलीस आणि जनता यांचे नाते मैत्रीचे का असू शकत नाही हे कोडे या खात्याभोवती कायमचे घिरटय़ा घालत असते.. आता मात्र, पोलीस हा सर्वात जवळचा मित्र वाटावा अशी परिस्थिती उदयास येऊ पाहते आहे. माणसाच्या आयुष्यातील काही क्षण अतीव आनंदाचे असतात. तो आनंद एवढा टोकाचा असतो, की तो साजरा करण्यासाठी सारे काही विसरावे लागते. पण कटकटी, चिंता आणि रोजचे तेच ते जगणे विसरून त्यापासून लांब जाण्यासाठी फारच मोजके उपाय हाताशी असतात. असा आनंद साजरा करण्यासाठी आजकाल खिसादेखील खुळखुळता असावा लागतो. वर्षअखेरची आणि नववर्षांच्या आगमनाची रात्र हा असे आनंदक्षण उपभोगण्याचा एक अनोखा मुहूर्त आणि नव्या जमान्यातील जगण्याचा अविभाज्य भाग आहे. हा आनंद साजरा करण्याची प्रथादेखील आता चांगलीच प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे, ख्रिसमसच्या दिवसापासूनच ३१ डिसेंबर साजरा करण्याची चर्चा आसपास सुरू होते, आणि पोलिसांनाही जाग येते. या वेळी ३१ डिसेंबरची रात्र धुंदपणे साजरी करण्याचा संकल्प ज्यांनी ज्यांनी सोडला, त्या सर्वाच्या धुंदीला पोलीस खात्याच्या सहकार्यामुळे आनंदाची किनार चढणार आहे. नववर्षांची पहाट उजाडेपर्यंत ३१ डिसेंबरची रात्र जागविण्यासही परवानगी देण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे, पोलीस हाच सच्चा मित्र असल्याची भावना आता ठरावीक वर्गात दृढ होण्याची दाट शक्यता आहे. नववर्षांचा जल्लोष साजरा करताना मनावर धुंदीचा अंमल असेल, तर अशा अवस्थेत वाहन चालविणे धोकादायक असते. अशा वेळी, अशा आनंदधुंद तळीरामांना सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार आणि हॉटेलमालकांनी घ्यावी, असा फतवाच पोलिसांनी काढला आहे. विरंगुळ्याचा आणि आनंदक्षणाचा हा मुहूर्त साधूनच पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे पोलीस पाहताच रस्ता बदलणाऱ्याच्या मनातही पोलिसाशी मैत्रीचे नाते जडल्याची जाणीव जागी होऊ शकते. अलीकडे ‘स्वच्छता अभियान’ आणि ‘घरवापसी’ हे मुद्दे चवीने चर्चिले जात आहेत. धुंद तळीरामांना नववर्षांच्या पहिल्याच पहाटे आपले घर शोधण्याची वेळ येऊ नये आणि तळीरामांच्या ‘घरवापसी’च्या वाटेवर कोठेही जनतेला नाक धरावयास लागून या मोहिमेला बाधा येऊ नये, यासाठी हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह ठरणार आहे. या निमित्ताने नववर्षांच्या पहिल्या पहाटे सुरक्षित ‘घरवापसी’चा अनोखा अनुभवही तळीरामांना अनुभवता येणार आहे. नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी, जेव्हा सारे काही ‘नेहमीसारखे’ भासू लागेल, तेव्हा या अनुभूतीच्या आविष्काराने भारावलेल्यांपैकी प्रत्येकाला पोलीस हा मित्र भासू लागेल यात शंका नाही!