अभिजात भारतीय संगीताच्या सादरीकरणात सातत्यानं सर्जन घडत असतं. कलावंताला नेमक्या याच सर्जनाची आवश्यकता असते. त्यासाठीच त्याच्या कलाजीवनाची धडपड असते. सहगानात अशा सर्जनाला सहकलावंताकडून मिळणारी दाद म्हणूनच अधिक मोलाची. सहप्रतिभेला साद घालणाऱ्या अशा प्रयोगातून भारतीय संगीताला एक नवं परिमाण मिळालं आणि त्यातून ते समृद्धही झालं.
भारतीय अभिजात संगीतात कलावंताच्या स्वप्रतिभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत व्यक्त करण्याची जबाबदारी या प्रतिभेच्याच आधारे कलावंतावर येऊन पडते. एकटय़ावरच हा प्रतिभेचा सारा भार पेलण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी कलावंताला केवळ गळय़ाचीच मशागत करून भागत नाही. त्याला आपल्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा सतत विचार करावा लागतो. ती सतत परजत राहावी लागते. नवीन काही सुचणं हे साऱ्यांच्याच भाळी लिहिलेलं नसतं, हे खरं असलं, तरी सतत सुचणं हेही कुणाच्या हाती नसतं. एखादाच कलावंत आपली प्रतिभा नवनवोन्मेषी असल्याचं सिद्ध करू शकतो. नवसर्जनाच्या धुमाऱ्यांना सौंदर्याच्या कोंदणात बसवून आपली कला अधिक उठावदार करण्याचं कसब सगळय़ांकडेच असतं असं घडत नाही. प्रत्येक कलाकाराला हेच घडावं असं वाटत असतं. त्याची सारी धडपड त्यासाठीच असते. सारं आयुष्य दावणीला बांधून तो आपल्या सर्जनाला शरण जाण्याचीच तयारी करत असतो. ‘हे कसं काय सुचतं’, यासारख्या प्रश्नांना कोणत्याच कलावंताकडे सरळ उत्तर नसतं. त्यामुळे रसिकांप्रमाणेच, त्याचाही अंतर्मनातील सर्जनाचा शोध कधीच संपत नाही. एकटय़ानेच संगीताचा सारा पसारा मांडायचा, तर त्यासाठी सर्जनाची क्षमता हवी. संगीतात सतत डुंबत राहिल्याशिवाय ते शक्य नसतं. अन्य काही उद्योग करून चूष म्हणून संगीत करणं आणि जगण्याचं एकमेव केंद्र म्हणून संगीताकडे पाहणं, या दोन टोकाच्या गोष्टी असतात. जे कलावंत तहानभूक विसरून कलेच्याच पाठीशी लागतात, त्यांच्या हाती काही पडू शकतं आणि ते या अभिजाततेच्या अंगणात पारिजातकाचा सडा टाकू शकतात. संगीत एकटय़ानं सादर करताना होणारी सर्जनाची दमछाक कित्येक वेळा कलावंताला ‘एक्झॉस्ट’ करून टाकत असावी. जगातल्या कोणत्याही मानवी समूहात अभिजात संगीताची पहिली पायरी समूह संगीताची असली, तरीही भारतानं त्यातून स्वत:ची वेगळी वाट चोखाळली आणि अभिजाततेच्या पायरीवर जाताना समूहाला दूर ठेवून स्वसर्जनाचीच कास धरली. अशा परिस्थितीत दोघा कलावंतांनी एकत्र येऊन संगीत सादर करण्याच्या जुगलबंदी या प्रकारातून संगीत नामक गोष्ट सुटत चालल्याची भावना निर्माण होत गेल्यानं असेल कदाचित, परंतु भारतीय संगीतानं सहगानाचा अभिनव प्रयोग केला.
दोन कलावंतांनी एकमेकांना पूरक राहून सादर केलेला स्वरसंवाद म्हणजे सहगान. हे ‘गान’ संगीत व्यक्त करतं. त्यामुळे त्याला केवळ गायनाचाच संदर्भ नसतो. दोन वादक एकत्र येऊनही असं सहगान सादर करतात. त्याला व्याकरणापुरतं सहवादन म्हटलं जातं. पण खरंतर ते सहगानच. कारण त्यातही संवादच असतो. जुगलबंदीमधील स्पर्धा केवळ प्रतिभेची नव्हती. त्यात जिंकण्याची जिद्द होती आणि हरण्याची भीतीही. कलेत जिकणं आणि हरणं या कल्पनांना खरंतर थाराच नसतो. कारण कलावंताला कलेतून जे मिळवायचं असतं, ते भौतिक म्हणजे वस्तुरूप असं नसतंच. त्याचा ध्यास कैवल्याच्या आनंदाचा असतो. जुगलबंदीतून असा आनंद किती मिळत असेल? सहगानातून आपापल्या प्रतिभेला सावरत आणि सांभाळत त्या आनंदापर्यंत जाण्याची शक्यता तरी असते. गाणाऱ्या कलावंताला स्वर भरण्यासाठी साथीला सारंगी, हार्मोनिअम यांसारख्या वाद्याची गरज वाटू लागली, तेव्हाही हा साथीदार त्या कलावंताला साथीतून कलात्मक प्रोत्साहनच देत असतो. निदान तसं अपेक्षित तरी असतं. उत्तम साथीदार मुख्य कलावंतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. तो कलावंताच्या सर्जनाचा केवळ साक्षीदारही नसतो, तर त्या सर्जनातील काही हिश्शाचा वाटेकरीही असतो. सहगानाच्या कल्पनेत नेमकं हेच अधिक स्पष्टपणे अधोरेखित होतं. दोन गायक शेजारी बसून जेव्हा एकाच शैलीतलं गायन सादर करायला लागतात, तेव्हा त्यांच्या मनात धूसर का होईना, पण एक आराखडा असतो. एकमेकांचा अंदाज असतो आणि एकमेकाला सांभाळून घेण्याची जाणही असते. बहुधा मैफलीत मुख्य कलावंताच्या मागे बसलेला शिष्य मधल्या शांततेच्या काळात आपल्या गुरूची थोडीफार नक्कल करतो. पण स्वतंत्रपणे काही सादर करण्याची परवानगी त्याला नसते. सहगानामध्ये मात्र दोघेही एकाच पायरीवर असतात. त्यांना एकमेकांबद्दल कमालीचा आदर असतो. त्यातील कुणीही स्वतंत्रपणे आपली कला समर्थपणे सादर करू शकेल, असा विश्वास असल्यानं मीच श्रेष्ठ अशा वल्गनेत कुणीच राहात नाही. त्यामुळेच दोघांनी मिळून संगीत साजरं करण्यात मिळणारा आनंद त्यांच्याएवढाच रसिकांसाठीही अप्रूपाचा ठरतो.
‘एकमेका साहय़ करू अवघे धरू सुपंथ’ हे या सहगानाचं वैशिष्टय़. समानधर्मी असलेल्या अशा दोन कलावंतांच्या प्रतिभेचा हा संयुक्त आविष्कार एकमेकांच्या प्रतिभादर्शनाच्या मध्ये येत नाही. एकमेकांना पूर्ण समजून घेतल्याशिवाय आणि एकमेकांच्या संगीतात पूर्ण बुडल्याशिवाय सहगान सहज शक्य नसतं. भारतीय संगीतात प्रत्यक्ष सादरीकरणात होणाऱ्या नवसर्जनाला फार महत्त्व असतं. रियाजात जे करून पाहिलं, त्यापेक्षा वेगळं अगदी ऐन वेळी सुचलेलं सादर करताना एक प्रकारची भीती असते. मेंदूत जे तयार झालं आहे, ते गळय़ातून जसंच्या तसं येईल का, असं त्या भीतीचं स्वरूप असतं. सततच्या रियाजामुळे कलावंताला आपल्या गळय़ाचा नेमका अंदाज आलेला असतो आणि त्यामुळेच गळय़ातून काय ‘जाईल’, याचीही त्याला खात्री असते. त्यामुळेच सादरीकरणात असं सर्जन सातत्यानं घडत असतं. कलावंताला नेमक्या याच सर्जनाची आवश्यकता असते. त्यासाठीच त्याच्या कलाजीवनाची धडपड असते. सहगानात अशा सर्जनाला सहकलावंताकडून मिळणारी दाद म्हणूनच अधिक मोलाची. सहप्रतिभेला साद घालणाऱ्या अशा प्रयोगातून भारतीय संगीताला एक नवं परिमाण मिळालं आणि त्यातून ते समृद्धही झालं. प्रत्येक कलावंताचा एक स्वभावधर्म असतो. एकटय़ानंच संगीत व्यक्त करण्याची ऊर्मी असणाऱ्या कलावंताला सहगानात सहभागी होताना जशी काळजी वाटू शकेल, तशी प्रत्येकाला वाटेलच असं नाही. कव्वाली या संगीतप्रकारात एकाच वेळी अनेक कव्वाल स्वरमंचावर गायन सादर करतात. हीच पद्धत अभिजात संगीतात रुजण्यासाठी अनेकांनी योगदान दिलं. डागर हे ध्रुपद शैलीतील एक अतिशय तालेवार घराणं. त्यातील दोन डागर बंधूंनी एकत्र येऊन सहगान लोकप्रिय केलं. पंजाबातल्या सिंग बंधूंनीही आपलं गायन याच पद्धतीनं सादर केलं. सलामत अली आणि नजाकत अली हेही पंजाबातीलच. सध्या लोकप्रिय असलेल्या राजन-साजन मिश्रा यांनीही सहगानाची ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. या सगळय़ा कलावंतांमध्ये पंडित कुमार गंधर्व यांनी केलेला प्रयोग अधिक अनोखा म्हणायला हवा. वसुंधराताई या त्यांच्या शिष्या आणि सहधर्मचारिणी. कुमारजींनी त्यांच्याबरोबर सहगानाचा एक अतिशय लोभस आविष्कार घडवला. स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र गायनाची परंपरा भारतीय संगीतात नाही. त्याचं कारण दोघांच्या आवाजाचे पोत वेगळे असतात आणि त्यांचे स्वर एकमेकांशी जुळणारे नसतात. त्यासाठी कुणाला तरी वरच्या किंवा खालच्या पट्टीत गाणं आवश्यक ठरतं. कुमारजींनी असा प्रयोग करताना आपल्या अनवट प्रतिभेचं दर्शन घडवलं आणि त्यात त्यांच्या बरोबरीनं वसुंधराताई सहभागी झाल्या. ‘साथ देणं’ या शब्दांचा तो स्वरवाही अर्थच होता. वाद्यसंगीताच्या दुनियेत सतार, सरोद, संतूर, गिटार आणि तबला यांनी एकत्र येऊन जे स्वराकार निर्माण केले, ते अप्रतिम आहेत. उंचीच्या कलावंतांनी एकत्र येण्यानं संगीत चार अंगुळे कसं वर उचललं जातं, याचं दर्शन, रविशंकर, अली अकबर खाँ, शिवकुमार शर्मा, अमजद अली, झाकीर हुसेन, ब्रीजभूषण काब्रा यांच्यासारख्या दिग्गजांनी घडवलं आहे. चित्रपट संगीतात मात्र सहगान ही अत्यावश्यक घटना बनून गेली. त्यातही ‘युगुलगीत’ ही संकल्पना चित्रपटाच्या कथेमुळे अपरिहार्य ठरली आणि गेल्या आठ दशकांत सहगानाचे अक्षरश: दीपून जावेत असे आविष्कार आपल्याला ऐकायला मिळाले. भावगीतातही हेच घडलं. ललित संगीतात हे सारं घडण्यासाठीची आवश्यक कारणं तरी असतात. ते आधीच ठरवलेलं किंवा लिहिलेलं असतं. त्यात ऐन वेळी बदल करण्याला म्हणजे नवसर्जनाला वावही नसतो. सर्जनाची जबाबदारी गायकांऐवजी संगीतकारावरच असते. त्यात शब्द हाही स्वरांएवढाच महत्त्वाचा घटक असतो. स्वरांत भिजलेल्या शब्दांचा अर्थ प्रवाही होण्याची ती एक संधी असते.
अभिजात संगीतात प्रत्येक कलावंताला आपल्या आतमध्ये डोकावून पाहिल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. असं अंतर्मुख झाल्यानंतर स्वसंगीताची जाणीव दृढ होते, त्यातून सर्जनाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. असं स्वत:ला घडवत राहिल्यानंतरच सहगानामध्ये सहकलावंताला मन:पूर्वक दाद देता येते. स्वर एकमेकात विरघळून जाताना अधिक सुंदर होत असल्याचं हे अपूर्व दर्शन रसिकाला वेगळय़ा उंचीवर नेतं.