‘फ्रेन्च न्यू वेव्ह’ची जागतिक सुनामी येण्याआधी हॉलीवूडचा सुवर्णकाळ म्हणून जो भाग ओळखला जातो त्याच्या उभारणीत येऱ्यागबाळ्यांचा वाटा नव्हता. चित्रपटांच्या काल्पनिकांहून अधिक विस्मयकारक वास्तव आयुष्य अनुभवलेल्या कलावंतांच्या फौजेची ती एकसंध निर्मिती होती. महायुद्धाच्या, आर्थिक मंदीच्या, देशोधडीच्या गाथा अंगात भिनवूनही निर्मितीच्या झपाटलेपणाने यशाच्या शिखराला सर करण्याची ताकद अंगी बाणलेल्या कलाकारांची ती गरज होती. हॉलीवूडच्या या सुवर्णकाळापासून यशाचा सर्व कोनाकोपरा मोजलेला दिग्दर्शक म्हणून माइक निकोलस यांची ख्याती होती.
१९६०च्या दशकात बिनीचा विनोदकार म्हणून मान्यता पावलेल्या या कलाकाराने विनोद, नाटक, संगीत, अभिनय आणि दिग्दर्शन अशा विविधांगी प्रांतांमध्ये आपले (दत्तक) नाव गाजवून सोडले. संगीतातील ग्रॅमी, नाटकातील टोनी, टीव्हीमधील एमी आणि चित्रपटांतील एक नव्हे, तर तब्बल सात ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले. अभिजात साहित्यलेण्यांना रंगभूमीवर लोकप्रिय करून मग ‘हूज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ या चित्रपट पदार्पणापासूनच डझनांहून अधिक ‘कालजयी’ सिनेमे माइक निकोलस यांनी बनविले.
१९६६ साली चित्रपटांशी त्यांचे जेव्हा काही घेणे-देणे नव्हते, तेव्हा ‘टाइम’ साप्ताहिकाने अमेरिकेतील सर्वात चलनी नाणे असलेला नाटय़ दिग्दर्शक म्हणून त्यांचा गौरव केला होता. युरोपातील दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत जन्मलेल्या मिखाइल इगोर पेश्कोव्हस्की यांना नाझीसंहारामुळे सातव्या वर्षी जर्मनी सोडून अमेरिकेत दाखल व्हावे लागले. वडिलांनी स्वीकारलेल्या नव्या अमेरिकी नावामुळे त्यांनीही माइक निकोलस हे नाव धारण केले. पुढे कॉलेजपासूनच नाटक आणि विनोदबाजीमध्ये रमलेल्या निकोलस यांनी रंगभूमीवर साहित्यलेण्यांना अजरामर करण्याचा विडा उचलला. पहिल्याच चित्रपटाला १३ ऑस्कर नामांकने खिशात घेऊन त्यांनी ‘ग्रॅज्युवेट’, ‘सिल्कवूड’, ‘कॅच-२२’, ‘क्लोजर’सारख्या विस्मृतिभय नसलेल्या सिनेमांना बनविले.  बदलत्या नीतिमूल्यांपासून ते नातेसंबंधांच्या संक्रमणावस्थांचा गेल्या पाच दशकांचा आढावा अभ्यासण्यासाठीही त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेता येऊ शकतो. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्याशी दूरचे नातेसंबंध असलेल्या या दिग्दर्शकाने मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्कर, एमी, टोनी आणि ग्रॅमी अशा चारही पुरस्कारांवर नाव कोरल्या जाणाऱ्या अंमळ भाग्यवंतांच्या पंक्तीत स्वत:ची जागा बनविली. त्यांच्या मृत्यूमुळे हॉलीवूडचा सुवर्णकाळ ते आजचा (तंत्र)सुलभकाळ सारख्याच ताकदीने वापरणारा चित्रकर्ता वजा झाला, एवढेच म्हणता येईल.