कलाकृतीवर ती घडवणाऱ्या कलाकाराचा कायदेशीर हक्क असतो हे ठीक, पण हा कायदा आर्थिक हितरक्षणापुरताच असतो की नैतिक हक्काचेही संरक्षण करतो? या कायद्याचा रोख युरोपात आणि अमेरिकेत निरनिराळा आहे.. भारतात मात्र नैतिक हक्काचे संरक्षण होत असल्यामुळेच, कलाकृतीची आबाळ झाल्याबद्दल तिच्या मूळ कर्त्यांला आक्षेप घेता येतो.
आपले मूल एखद्याला दत्तक दिले तरी ते आपले मूल असायचे थांबते का? भले कायद्याने ते दुसऱ्याचे झाले असेल. पण त्याची नाळ जोडलेली असते ज्या आईशी ती कशी तुटणार, नाही का? कलाकार आणि त्याची कलाकृती यांचे नातेही असेच काहीसे असते. कलाकृतीला खरे तर कलाकाराचे आध्यात्मिक मूलच समजतात! एखादी कलाकृती बनवून कुणाला विकून टाकली तर भले कायद्याने त्या कलाकाराची राहत नसेल.. पण तिला चारचौघांत आपली म्हणवण्याचा, तिचे बीभत्सीकरण थांबविण्याचा अधिकार कलाकाराला असलाच पहिजे! आणि या अधिकाराचा संबंध आहे कॉपीराइट या बौद्धिक संपदेशी. मागच्या लेखात आपण पाहिले की देशांच्या संस्कृती, चालीरीती आणि प्रगतशीलता निरनिराळी असल्याने त्या त्या देशाचे बौद्धिक संपदा कायदे कसे वेगवेगळे असतात आणि म्हणून बौद्धिक संपदा हक्क हे कसे स्थानिक असतात ते. त्या संदर्भातील पेटंट विषयीची उदाहरणे आपण प्रमुख्याने पाहिली. पण कॉपीराइट ही दुसरी बौद्धिक संपदा आहे, ज्यात कलाकारांच्या या अधिकाराबाबत वेगवेगळे देश वेगवेगळ्या तऱ्हेने विचार करतात.
जगभरातले देश दिवाणी खटल्यांसाठी सिव्हिल लॉ म्हणजे लिखित कायदे किंवा कॉमन लॉ म्हणजे इंग्लिश अलिखित कयद्यापकी एक कायदेपद्धतीचा अवलंब करतात. इंग्लंड आणि इंग्रजांच्या वसाहती असलेले भारतासारखे इतर अनेक देश आणि अमेरिका हे कॉमन लॉ वापरतात तर संपूर्ण युरोप आणि इतरही काही देश मात्र सिव्हिल लॉ वापरतात. कॉपीराइट कायद्याकडे पाहण्याचे या दोन समूहांतील देशांचे दृष्टिकोन पूर्णपणे भिन्न आहेत. युरोपीय देश या स्वामित्व हक्कांना लेखकांचे हक्क (ऑथर्स राइट्स) म्हणून संबोधतात तर कॉमन लॉ देश मात्र यांना कॉपीराइट्स म्हणतात यावरूनच काय तो फरक लक्षात यावा. म्हणजे कॉमन लॉ देशांसाठी हा ‘प्रती काढणाऱ्यांचा’ म्हणजे प्रकाशकांचा हक्क आहे तर सिव्हिल लॉ देशांसाठी मात्र हा लेखकांचा हक्क आहे.
मुळात कुठल्याही कलाकृतीवरील, मग ते लिखाण असो किंवा चित्र किंवा शिल्प किंवा चलत्चित्र किंवा तत्सम इतर काही.. यावरच्या कॉपीराइटमध्ये दोन प्रकारच्या हक्कांचा समावेश होतो : एक झाला आíथक हक्क (इकॉनॉमिक राइट्स). म्हणजे त्या कलाकृतीमुळे होणाऱ्या धनलाभावरचा हक्क आणि दुसरा म्हणजे नैतिक हक्क ( मॉरल राइट्स). या नतिक हक्कांच्या कल्पनेचा उदय फ्रान्समधला, जिथे त्याला ‘ड्रॉइटे मॉरल’ म्हणून संबोधले जायचे.
नतिक हक्कांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो तो त्या कलाकृतीचा निर्माता म्हणून श्रेय मिळण्याचा अधिकार आणि कलाकृतीला मिळणारी हीन वागणूक, किंवा तिच्यात कलाकाराला अपेक्षित नसलेले बदल होण्यापासून थांबवण्याच्या अधिकाराचा. काही वर्षांपूर्वी ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाबाबत झालेला निर्माता विधू विनोद चोप्रा प्रॉडक्शन्स विरुद्ध चेतन भगत यांच्यामधील वाद आठवतो का? यात चित्रपटाची पटकथा ही चेतन भगत यांच्या ‘फाइव्ह पॉइंट सम वन’ या कादंबरीवर बेतलेली होती. आणि त्याबद्दल योग्य ते मानधनही चेतन भगत यांना मिळालेले होते. मग वाद काय होता? लेखकाचे म्हणणे असे होते की, या चित्रपटाची कथा माझ्या कादंबरीवर बेतलेली आहे याचे योग्य श्रेय मला मिळाले नाही. चित्रपटाच्या श्रेयनामावलीमध्ये माझे नाव येते ते शेवटी, आणि तेही इतक्या लहान अक्षरात आणि इतक्या लहान ओळीत की त्याकडे माझ्या आईचेही लक्ष गेले नाही. पण शेवटी हा वाद त्यांनी सामंजस्याने मिटवला..
..या वादात चेतन भगत ज्या अधिकारासाठी भांडत होते तो आहे कलाकाराचा नैतिक अधिकार! आणि आधी सांगितल्याप्रमाणे भारत आणि इतर कॉमन लॉ देश हे कॉपीराइट कायद्यातल्या आर्थिक अधिकारांवर जास्त लक्ष देतात; तर सिव्हिल लॉ वापरणारे देश मात्र कॉपीराइट कायद्यातल्या नैतिक अधिकारांवर फारच भर देतात. अर्थात सर्व बौद्धिक संपदांचे समानीकरण करणाऱ्या ट्रीप्स करारानंतर नैतिक हक्कांचा थोडय़ा फार प्रमाणात समावेश सर्वच देशांना करावाच लागला, पण मुळात त्यांचे याकडे पाहण्याचे तत्त्वज्ञानच निरनिराळे आहे. म्हणजे कॉमन लॉमध्ये ‘पशासाठी कला’ आणि सिव्हिल लॉमध्ये मात्र ‘कलेसाठी कला’ या तत्त्वावर विश्वास आहे. सिव्हिल लॉ देश हे कलेला कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार मानतात. आणि त्याच्या रक्षणाचे काम नैतिक हक्क करतात. कलाकाराने त्याची कलाकृती आर्थिक मोबदला घेऊन कुणाला दिली तरी त्यावरील त्याचा नैतिक हक्क कायम राहतो. तो हक्क कुणीही विकत घेऊ शकत नाही. कलाकाराने देतो म्हटले तरी त्याला तो देता येत नाही.
हे नैतिक हक्क नेमके कोणते असतात? दोन महत्त्वाचे हक्क म्हणजे एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचे श्रेय घेण्याचा हक्क आणि दुसरा म्हणजे आर्थिक हक्क विकून टाकल्यानंतरही त्या कलाकृतीमध्ये कलाकाराला काही अपेक्षित नसलेले बदल केले गेले असतील, ज्यामुळे कला म्हणून तिची गुणवत्ता कमी झाली असे कलाकाराला वाटले, तर ते थांबविण्याचा हक्क.
अमेरिकेसारख्या देशाला कॉपीराइटमधल्या फक्त आíथक हक्कांमध्ये रस आहे. आपली कलाकृती विकून टाकल्यावरही तिच्यात बदल केला गेला तर त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कलाकाराला दिला तर त्याचे आर्थिक परिणाम वाईट होतील, असे अमेरिकेला वाटते. म्हणजे शेवटी पुस्तकाचा प्रकाशक किंवा चित्रपटाचा निर्माता यांचा कल जास्तीत जास्त पसे कमाविण्यासाठी कलाकृतीमध्ये जनतेला आवडतील असे बदल करण्याकडे असू शकतो. आणि या बदलांना विरोध करण्याचा हक्क कलाकाराला दिला तर त्याने आर्थिक बाजू लंगडी पडू शकते. इंग्लिश कायद्याचे असे म्हणणे आहे की, असे काही बदल केले गेले आणि त्याने आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागला तर त्यासाठी अब्रूनुकसानीचा दावा करता येतो. मग नैतिक हक्कांचा समावेश कॉपीराइट कयद्यात करण्याची गरजच काय?
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलाकाराला आपल्या कलाकृतीवरच्या नैतिक हक्कांना सोडचिठ्ठी देता येते का? आता यातही देशोदेशीच्या कायद्यांत फरक आढळतो. अमेरिकेच्या कायद्यात हे सरळसरळ लिहिलेले आहे की जेव्हा कलाकार पसे घेऊन आपला कॉपीराइट विकून टाकतो तेव्हा त्याला आपला नैतिक हक्कही सोडता येतो. आता यातली चलाखी बघा.. एखाद्या नवख्या कलाकाराने लिहिलेल्या कादंबरीवर समजा एखाद्या बलाढय़ चित्रपट निर्मात्याने चित्रपट काढायचा ठरवला.. आणि करारामध्ये लेखकाकडून असे लिहून घेतले की मी या कादंबरीवरील नैतिक हक्क सोडतो आहे. नंतर चित्रपटात लेखकाला अजिबात अपेक्षित नसलेले बदल केले गेले तर त्याविरुद्ध आवाज उठविण्याचा कोणताही हक्क लेखकाकडे अमेरिकेत शिल्लक राहत नाही. युरोपातील देशांत मात्र नैतिक हक्क कलाकार सोडायचे म्हटले तरी सोडू शकत नाहीत.. ते नेहमीच कलाकाराकडे राहतात.
भारतीय कॉपीराइट कायद्यानुसारही कलाकाराला आपल्या नैतिक हक्कांचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबाबत १९९०मध्ये घडलेला एक खटला फार बोलका आहे. एका कलाकाराने बनवलेला एक धातूचा पुतळा त्याने केंद्रसरकारच्या अखत्यारीतील विज्ञानभवनाला मोबदला घेऊन विकला. पाच वर्षांनंतर विज्ञानभवनाने तो पुतळा अडगळीत टाकला.. माझ्या कलाकृतीला हीन वागणूक दिली गेली, असा या कलाकाराने केंद्र सरकारवर दावा केला आणि तो जिंकलादेखील.. कारण भारतीय कॉपीराइट कायदाही नैतिक हक्क मानतो. नैतिक हक्कांना सोडचिठ्ठी देण्याबाबत मात्र आपल्या कायद्याचे धोरण ‘नरो वा कुंजरो वा’ असे आहे. नैतिक हक्क सोडता येतात की नाही यावर भारतीय कॉपीराइट कायदा काहीही भाष्य करत नाही.
अशा रीतीने प्रत्येक देशाच्या इतिहासात, चालीरीतींमध्ये आणि संस्कृतीमध्ये त्याच्या कॉपीराइट कायद्याचे मूळ दडलेले आहे.. आणि म्हणूनच इथेही बौद्धिक संपदा कायद्याची स्थानिकता
समर्थनीय आहे.
‘थ्री ईडियट्स’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा आणि निर्माते राजकुमार हिराणी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला खरा, पण त्यापूर्वी ‘माझ्या कथेवर अन्याय केला’ या आक्षेपाशी त्यांना सामना करावा लागला होता!
*लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Constitutional ethics Prime Minister and Chief Minister A political and constitutional issue
समोरच्या बाकावरून: घटनात्मक नैतिकता पणाला..
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा