30 March 2020

News Flash

१७२. भाव-मेळा

चोखामेळा यांचा उल्लेख होताच कर्मेद्र उद्गारला.. कर्मेद्र - शाळेत त्यांची कविता होती.. ऊस डोंगा..

| September 1, 2015 03:54 am

चोखामेळा यांचा उल्लेख होताच कर्मेद्र उद्गारला..
कर्मेद्र – शाळेत त्यांची कविता होती.. ऊस डोंगा..
योगेंद्र – कविता नाही रे, अभंग म्हण.. अर्थात शाळेतलं अभ्यासाचंही तुला आठवतंय हेही कौतुकास्पद आहे!
हृदयेंद्र – (हसत) हा अभंग सर्वपरिचित आहेच..
योगेंद्र – पण त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणा वगैरे म्हणतोस त्याची तितकीशी माहिती नाही..
हृदयेंद्र – माहिती नाही, असं नाही, पण बरेचदा आपल्या ते  लक्षात येत नाही.. पण थांबा ‘सकल संत गाथे’चा आधार घेतो.. (गाथा काढतो.. त्यातला परिच्छेद वाचू लागतो) संत चोखामेळा हे ज्ञानदेव- नामदेव यांच्या समकालीन होते. ते मंगळवेढय़ाला रहात, पण त्यांचा बराचसा काळ पंढरपूर येथे जात असे.. चोखोबांची पत्नी सोयराबाई हीदेखील अभंग करीत असे. चोखोबांची धाकटी बहिण निर्मला मेहूणपूरला राहात असे. तिनंही चोखोबांकडून उपदेश घेतला होता. चोखोबांचा मुलगा कर्ममेळा हाही पांडुरंग भक्तीत रंगून जात असे. त्यांचेही अभंग प्रसिद्ध आहेत. सोयराबाईंचा भाऊ बंका यांचेही अभंग प्रसिद्ध आहेत.. त्या काळची सामाजिक परिस्थिती आणि जातीच्या उतरंडीतलं चोखामेळा महाराजांचं स्थान लक्षात घेतलं तर त्यांच्या वाटय़ाला किती अवहेलना, त्रास आणि छळ आला असेल, याची कल्पना आपण करू शकतो. त्या छळाची वर्णनं चोखामेळा, सोयराबाई, कर्ममेळा यांच्या अभंगांमध्ये आली आहेतच. पण त्याचवेळी नामदेव, ज्ञानदेव अशांचं मोठं पाठबळ चोखामहाराजांना लाभलं होतं. नामदेव तर त्यांचे गुरूच होते.
योगेंद्र – खरंच इतकी माहिती आपल्याला नसतेच..
हृदयेंद्र – त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग हे खरी भक्ती कशी असते आणि खऱ्या भक्ताला भगवंत कसा सांभाळतो, याची जाणीव करून देणारे आहेत.. नामदेव महाराजांनीही त्या प्रसंगांचं वर्णन केलं आहे.. चोखामेळा महाराजांची पत्नी म्हणजे सोयराबाई गर्भवती होती. तेव्हा प्रसूतीसाठी आवश्यक साहित्य आणायला तिनं पतीला म्हणजे चोखामेळा यांना पाठवलं. ते गेले, पण त्यांचा काही पत्ता नाही! सोयराबाई चिंतेत पडल्या. नामदेव महाराज म्हणतात – विरक्तासी मी सांगितले काम। कैसा झाला भ्रम माझे बुद्धी।। अहो पांडुरंगा आणा त्यासी आतां। न सांगे मी वार्ता संसाराची।। मी काय करून बसले? विरक्त पतीला मी संसाराचं काम सांगितलं.. हे पांडुरंगा त्यांना परत आणा, मी त्यांना पुन्हा सांसारिक गोष्टींत गुंतवणार नाही.. या आळवणीनं विठोबानं चोखोबांच्या बहिणीचं रूप घेतलं! नामदेव महाराज म्हणतात- झाली तेव्हां श्रमी प्रसूत वेळा आली। विठाई धांवली तेचि वेळां।। चोखोबाची बहिण झाला सारंगधर। वहिनी उघडा द्वार हांका मारी।। दोघीही भेटल्या तेव्हां आनंदानें। आलें तें रुदन चोख्याकांते।। बरें बाई तुम्हां देवानें धाडिलें। पती माझा गेला कोणीकडे।। बहिणीच्या रुपातल्या विठ्ठलानं दार वाजवलं.. निर्मलेला पाहून सोयराबाईंना आनंद वाटला.. मग निर्मलानं सांगितलं की भाऊ माझ्या घरी आला आणि त्यानंच मला इकडे पाठवलं, आता चिंता करू नका.. मग सोयराबाईंचं बाळंतपण विठ्ठलानंच केलं.. तिच्या मुलाचं बारसंही थाटात केलं.. कर्ममेळा हे नावंही त्यानंच ठेवलं.. इकडे निर्मलेच्या घरी राहून महिना उलटला तेव्हा चोखामेळांना आठवण झाली! सोडोनियां आलो प्रपंचाचें भयें। अंतरले पाय देवाजीचे।। प्रपंचाचं भय वाटून कर्तव्यत्याग माझ्या हातून घडला.. त्यामुळे देवच अंतरला, या भावनेनं व्याकूळ होऊन ते घराकडे निघाले. इकडे बहिणीच्या रुपातील विठ्ठलही परत निघाले. पती येईपर्यंत थांबण्याची विनवणी करणाऱ्या सोयराबाईंची समजूत काढत ते म्हणाले, ‘‘दादा माझा असे पांडुरंग भक्त। सदा त्याचें चित्त देवावरी।। मान्य करी वहिनी तयाचें वचन। तेणेंचि कल्याण असें तुमचें।।’’ खऱ्या भक्ताच्या बोधानुसार वागण्यातही मोठं हित असतं.. चोखामेळा परतले तेव्हा सोयराबाईनं विचारलं, बाई आत्ताच गेल्या. तुम्हाला भेटल्या का? आश्चर्यचकित झालेल्या चोखामेळांना सर्व वृत्तांत कळला. सद्गदित होऊन ते म्हणाले, कैंची बाई येथें आले पांडुरंग। धन्य तुझें भाग्य भेटी झाली।। माझी बहिण नव्हे, साक्षात पांडुरंगच धावून आला.. तुझं भाग्य थोर म्हणून तुझी भेट झाली! चोखोबांच्या रोमारोमांत विठ्ठल कसा भरला होता, याचा दाखला नामदेवांनीच एका अभंगात दिला आहे..
चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2015 3:54 am

Web Title: fair prices
टॅग God
Next Stories
1 देवा तुझे द्वारी..
2 भाव-संस्कार १७०.
3 १६९. रहस्य
Just Now!
X