अलीकडे आपल्यातील संतप्त, व्यवस्थाविरोधी तरुणाचे प्रदर्शन राहुल गांधी वारंवार घडवतात. पण ते अगदीच केविलवाणे ठरते. कारण एका बाजूला व्यवस्था सुदृढ व्हायला हवी असा शहाजोग सल्ला देत असताना त्याच वेळी दुसरीकडे ते या व्यवस्थेच्या विरोधातही बंड करताना दिसतात. त्याहीपेक्षा, ‘मी सोडून अन्य सर्वानी व्यवस्थेचे नियम पाळायचे’ असे त्यांना अभिप्रेत आहे का, ही शंकाच रास्त ठरावी असे ते वागतात!
काँग्रेसच्या बहुचर्चित राष्ट्रीय अधिवेशनाचे विश्लेषण दोन पातळ्यांवर करावे लागेल. राहुल गांधी यांना काँग्रेस पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करणार किंवा काय याबाबत त्या पक्षाचा निर्णय हा पूर्वार्ध आणि त्यानंतर सोनिया गांधी- राहुल गांधी या मायलेकरांनी या अधिवेशनास केलेले मार्गदर्शन हा या विश्लेषणाचा उत्तरार्ध.
प्रथम राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर न करण्याच्या निर्णयाचे स्वागत करावयास हवे. याचे कारण तशी घोषणा झाली असती तर काँग्रेसने विरोधकांच्या कार्यक्रम पत्रिकेसमोर मान तुकवली असा संदेश गेला असता. युद्धामध्ये आपली कार्यक्रम पत्रिका विरोधकाच्या इच्छेनुसार न आखणे हे कौशल्य असते. ते या प्रसंगी काँग्रेसने दाखवले. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केले गेले असते तर निवडणुकीच्या रिंगणातील सामना भाजपचे घोडय़ावर बसलेले पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे घोडय़ावर मांड टाकण्याची खात्री नसलेले राहुल गांधी यांच्यात झाला असता. ही मांडणी मोदी यांच्यासाठी सोयीची ठरली असती. कारण समोर नक्की कोणाला आव्हान द्यावयाचे हे स्पष्ट झाले असते. परंतु राहुल यांस पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करून काँग्रेसने शहाणपणा दाखवला आणि राहुल यांस मोदी यांच्या तोंडी देण्याची संधी विरोधकांना मिळू दिली नाही. खेरीज, दोन कारणांसाठी असे करणे अनावश्यक होते. यातील पहिले म्हणजे समजा काँग्रेस पक्षास सत्ता स्थापण्याची संधी मिळाली तर राहुल गांधी त्या सत्तेचे सूत्रधार असतील यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे त्यांचे नाव जाहीर केले काय वा न केले काय, काहीच फरक पडत नाही. शरीरास एकसंध ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे पाठीच्या कण्याची आवश्यकता असते त्याप्रमाणे काँग्रेस पक्षास बांधून ठेवण्यासाठी नेहरू घराण्यातील व्यक्ती केंद्रस्थानी असावी लागते हा इतिहास, वर्तमान आणि अर्थातच भविष्यदेखील आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची भूमिका काय असेल याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे या संदर्भातील दुसरा मुद्दा हा की आगामी निवडणूक काँग्रेस हरेल असे खुद्द काँग्रेसजनांनाच वाटत असताना या हरत्या युद्धाचे सेनापतिपद राहुल गांधी यांच्या गळ्यात कशाला मारा, असा विचार काँग्रेस धुरिणांनी नक्कीच केला असणार. राहुल ही काँग्रेसची नियती आहे. तेव्हा या नियतीच्या कपाळावर पहिल्या संघर्षांतच पराभवाची खोक पाडणे हास्यास्पद ठरले असते. काँग्रेसमधल्या काहींच्या आणि संपूर्ण विरोधकांच्या इच्छेनुसार राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आणि पराभव पत्करावा लागला तर आगामी निवडणुकांची जबाबदारी या पराभूत नेत्याच्या पडलेल्या खांद्यावर कोणत्या तोंडाने देणार? तेव्हा काँग्रेसने जे काही केले ते योग्यच. त्यामुळे निदान आगामी निवडणुकांपर्यंत तरी राहुल गांधी यांची झाकली मूठ सव्वा लाखाची आहे, असे काँग्रेसजन म्हणू शकतात.
परंतु पंचाईत ही की या अशा धोरणी शहाणपणांत खुद्द राहुल गांधी यांनाच कितपत रस आहे, असा प्रश्न पडावा असे त्यांचे भाषण होते. आवेश आणि आक्रमकता यातील फरकाचे सुटलेले भान आणि आपण सत्ता खेचून आणण्यासाठी त्वेषाने हल्ला करणारा विरोधी पक्षनेता नसून सत्ताधारी आहोत याची नसलेली जाणीव ही राहुल गांधी यांच्या भाषणाची वैशिष्टय़े म्हणावी लागतील. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी यांनी जी काही नाटय़पूर्णता आणण्याचा प्रयत्न केला ती अस्थानी होती. ज्याच्या हाती सत्तेची दोरी असते त्याने कृती करावयाची असते, आक्रमक भाषणे ही विरोधकांना शोभून दिसतात. पण तरीही राहुल गांधी आक्रमकतेच्या प्रेमात पडले. याबाबत मात्र ते विरोधी नेते नरेंद्र मोदी यांच्या सापळ्यात अडकले. सत्ताधारी केवळ वक्तृत्वात आक्रमक झाला तर ती आक्रमकता निष्क्रियता दर्शविणारी असू शकते. राहुल गांधी यांच्याबाबत हे झाले आहे. गेली दहा वर्षे सत्तेची सूत्रे हाती असताना खात्यावर काहीही भरीव कामगिरी नोंदलेली नसल्यामुळेच त्यांना या लटक्या आक्रमकतेचा आधार घ्यावा लागत आहे. अलीकडे आपल्यातील संतप्त, व्यवस्थाविरोधी तरुणाचे प्रदर्शन राहुल गांधी वारंवार घडवतात. पण ते अगदीच केविलवाणे ठरते. कारण एका बाजूला व्यवस्था सुदृढ व्हायला हवी असा शहाजोग सल्ला देत असतानाच त्याच वेळी दुसरीकडे ते या व्यवस्थेच्या विरोधातही बंड करताना दिसतात. कायदे, नियम वगैरे लोकप्रतिनिधींनी बनवावयास हवेत असे त्यांचे म्हणणे. असे करणे म्हणजे व्यवस्था पाळणे. परंतु पंतप्रधान मनमोहन सिंग वा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे हीच व्यवस्था पाळत असतील तर राहुल गांधी त्यांचा जाहीर अपमान करावयास मागेपुढे पाहात नाहीत, असेही दिसते. भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईसंदर्भात वटहुकूमाचा मुद्दा असो वा आदर्श चौकशी समितीचा अहवाल पाळणे वा न पाळणे असो. राहुल गांधी जे काही वागले ते व्यवस्था पाळणे होते काय? की व्यवस्थेचे नियम मला लागू होत नाहीत तेव्हा मी सोडून अन्य सर्वानी व्यवस्थेचे नियम पाळायचे असे त्यांना अभिप्रेत आहे? पक्षाचे नेतृत्व करावयाची वेळ आल्यास सत्ता हे विष आहे असे भंपक उद्गार काढावयाचे आणि काही काळाने सत्ता मिळावी यासाठी मिळेल त्या मार्गाने प्रयत्न करायचे, हा विरोधाभास काय दर्शवतो? भ्रष्टाचाराविरोधात राणा भीमदेवी थाटाची भाषणे ठोकायची आणि त्याच वेळी आपल्या मेहुण्याच्या जमीन बळकाव उद्योगांकडे दुर्लक्ष करायचे, हा काय योगायोग समजायचा काय? तेव्हा आपण जे काही सल्ले देतो ते स्वत: किती पाळतो याचा हिशेब एकदा राहुल गांधी वा त्यांच्या सल्लागारांनी करावयास हवा.
पण तो केला जाणार नाही. याचे कारण कितीही वेळा नापास झाल्यावरही पुन:पुन्हा परीक्षेस बसावयाची संधी मिळणाऱ्या शिक्षणसम्राटाच्या चिरंजीवांसारखे राहुलबाबांचे झाले आहे. पक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून राहुल गांधी सर्वच परीक्षांत भरघोसपणे अनुत्तीर्ण ठरले आहेत. एकटय़ा उत्तर प्रदेशचे उदाहरण घेतले तर राहुल गांधी यांच्या अनुत्तीर्णतेचा ढासळता आलेख उल्लेखनीय म्हणावा लागेल. सर्वाधिक खासदार पाठवणाऱ्या या सर्वात मोठय़ा राज्यातून काँग्रेसच्या पदरात २५ टक्के मते पडत. आता ते प्रमाण सात टक्के इतके ढासळले आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांच्यासमोरचे खरे आव्हान असणार आहे ते लोकसभेत काँग्रेसच्या आहेत त्या जागा तरी किमान राखल्या जाव्यात हे. त्याही राखता आल्या नाहीत तर अधिवेशनातील आक्रमकपणा पोकळ होता हेच पुन्हा एकदा सिद्ध होईल. या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भलामण केली. ते योग्यच. पण ती करताना आपण त्यांच्या मागे आहोत, असेही त्यांनी सूचित केले. त्याबाबतही काही गैर नाही. परंतु हे सर्व त्यांच्या चिरंजीवांस ठाऊक नाही काय, हा प्रश्न पडतो.
तेव्हा काँग्रेस पक्षाचे हे अधिवेशन असे विरोधाभासांनी भरलेले होते. राहुल गांधी यांच्या भाषणाने काँग्रेसजनांना प्रेरणा वगैरे मिळाली असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचे भाषण हे अनुत्तीर्णाचा आत्मसंवाद होता, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.