गणनायकाचे अर्थात गणेशाचे वर्णन ‘सुखकर्ता’, ‘विघ्नहर्ता’ असे केले जाते. असे असले तरी आता बदलत्या परिस्थितीत या मंगलदायी सणाच्या काळात विघ्न येऊ नये याची अधिक काळजी घ्यावी लागते. इतर सण-उत्सव आणि गणेशोत्सव साजरे करण्याच्या बाबतीत काही मूलभूत फरक आहेत. इतरही अनेक सण सार्वजनिक पातळीवर साजरे केले जातात. तरीसुद्धा गणेशोत्सवात होणारी गर्दी, मिरवणुका, त्याला मिळणारा प्रतिसाद यांची इतर सणांशी तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे हा उत्सव सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाचा ठरतो. समाजकंटक आणि आता अतिरेक्यांसाठीसुद्धा या गर्दीचा गैरफायदा उठवून विघातक कृत्य करणे सोयीचे ठरते. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवात पुणे आणि इतर शहरांनासुद्धा दहशतवादी कारवायांचा धोका होता, तो आजही कायम आहे. पुण्यासारख्या शहरात हजारो गणेशोत्सव मंडळे आहेत. हीच स्थिती आता इतर शहरांमध्येही आहे. इतक्या मंडळांना संपूर्ण सुरक्षा पुरविणे आणि प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी सर्वकाळ पोलीस बंदोबस्त ठेवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळे आणि कार्यकर्त्यांवर महत्त्वाची जबाबदारी पडते. उत्सवात उत्साह तर हवाच. त्याचबरोबर तो अधिकाधिक सुरक्षित कसा असेल, याला सर्वोच्च प्राधान्य हवे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, अजूनही काही अपवाद वगळता या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. विसर्जन मिरवणुकीत तर कर्कश्य आवाजातील स्पीकर्स, धांगडधिंगा आणि अंगविक्षेप करत केला जाणारा नाच या गोष्टी पाहायला मिळतात. त्या वेळी सुरक्षेचे भान ना कार्यकर्त्यांना असते, ना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना! अशा वेळी गर्दीचा फायदा उठवून काही दहशतवादी कृत्य केले गेले तर आश्चर्य वाटायला नको. उत्सवात काळानुसार बदल अपेक्षित असतात. आपला उत्सव बदलला खरा, पण तो नेमका उलटय़ा दिशेने गेला. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्तम उपयोग करून घेतला. पण आता हा उत्सव सार्वजनिक असला, तरी त्यात समाजाच्या फारच थोडय़ा लोकांचे प्रतिनिधित्व असल्याचे पाहायला मिळते. उत्सवाच्या सध्याच्या स्वरूपापासून मोठा वर्ग दूरच राहतो. ही बाबसुद्धा सुरक्षेसाठी योग्य नाही. समाजाचे जेवढे जास्त घटक सहभागी असतील, तेवढा उत्सव सर्वव्यापी होईल आणि त्याच्या सुरक्षेची काळजी सर्वचजण घेतील. सध्या तरी अशी स्थिती नसल्याने आव्हान मोठे आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी यासिन भटकळ आणि लष्करे तय्यबाचा दहशतवादी अब्दुल करीम टुंडा यांना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या काही आगामी योजना रोखणे शक्य होणार आहे. मात्र, असे असले म्हणून यंदाच्या उत्सवावरील दहशतवादाचा धोका संपला, असे नाही. गुप्तचर यंत्रणांकडून सातत्याने दहशतवादी कृत्यांबाबत इशारे दिले जात आहेत. गुन्हेगारी आणि दहशतवाद्यांच्या छुप्या कारवायांबाबत स्थानिक पातळीवर गुप्तवार्ता मिळवण्याच्या सक्षम यंत्रणाच उभ्या नसल्याने या कामात पोलिसांना फारसे यश आलेले नाही. राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांवरून हे स्पष्टच झाले आहे. तरीही गणेशोत्सवाच्या काळात गावोगावचे पोलीस शांतता राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या स्थितीत मंडळे आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी आणखी वाढते. उत्सव साजरा करत असताना ही जबाबदारी उचलली जाणार का, हे आता पाहायचे आहे.